संत कान्होबाराय (तुक
58.
संत कान्होबाराय (तुकयाबंधु) यांचे वासुदेव
मनु राजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासि दोघी नारी ।
पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणे कृपा केली आह्मांवरी गा ॥१॥
ह्मणउनि आलो या देशा । होतो नाही तरी भुललो दिशा ।
दाता तो मज भेटला इच्छा । येउनि मारग दाविला सरिसा गा ॥धृ॥
सवे घेउनि चौघेजण । आला कुमर सुलक्षण ।
कडे चुकवुनि कांटवण । ऐका आणिली ती कोण कोण गा ॥२॥
पुढे भक्तीने धरिले हाती । मागे ज्ञान वैराग्य धर्म येती ।
स्थिर केली जी आचपळे होती । सिद्ध आणुनि लाविली पंथी गा ॥३॥
केले उपकार सांगो काय । बाप न करी ऐसी माय ।
धर्मे त्याच्या देखियेले पाय । दिले अखय भय वारुनि दान गा ॥४॥
होतो पीडत हिंडता गांव । पोट भरेना राहावया ठाव ।
तो येणे अवघा संदेह । म्हणे फेडियेला तुकयाचा बांधव गा ॥५॥
