उठोनिया तुका गेला नि
4005.
उठोनिया तुका गेला निजस्थळा । उरले राउळा माजी देव ॥१॥
नेउल झाले सेवका स्वामींचे । आज्ञे करुनी चित्त समाधान ॥धृपद॥
पहुडलिया हरी अनंतशैनावरी । तेथे नाही उरी काही काम ॥२॥
अवघी बाहेर घालूनि गेला तुका । सांगितले लोका निजले देव ॥३॥
अर्थ :
आता मी तुकाराम उठून आपल्या निजस्थळाला म्हणजे घरी गेलो त्यामुळे देवळामध्ये देव एकटेच राहिले आहेत. स्वामींनी माझ्यासारख्या सेवकाला घरी जाण्याची आज्ञा केली त्यामुळे माझे चित्त समाधानी झाले आणि या गोष्टीचे मला नवल वाटते. अनंत शय्यावर हरी निजले असून तेथे काही कामाची ऊरीच राहिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व लोकांना मी बाहेर काढले आणि देव निजले आहेत असे सर्वांना सांगितले.
