आम्हा हेंचि थोर सद्
186.
आम्हा हेंचि थोर सद्गुरुविचार । नलगे संप्रधार नानामते ॥१॥
नेघो ते काबाड न करू विषम । ब्रह्मांड हे होम आम्हा राम ॥२॥
नेदू यासि दुःख उन्मनीचे सुख । न करू हा शोक आला गेला ॥३॥
निवृत्ति म्हणे आम्हा सद्गुरु उपदेश । सर्व भूती वास हरि असे ॥४॥
अर्थ:
आमच्या साठी श्री गुरुनी दिलेला विचार सर्वश्रेष्ट आहेत त्यापुढे आम्ही दुसऱ्या कोणत्याही विचाराला मानत नाही त्याची आम्हाला गरज नाही. श्री गुरुनी सांगितल्या प्रमाणे आम्ही रामनाम यज्ञ करत असल्याने दुसऱ्या विचारांचे काबाड म्हणजे कष्टाचे ओझे आम्हाला वागवावे लागत नाही. साधनेचे कष्ट देहाला न देता आम्ही नामजपाने उन्मनी अवस्थेचे सुख भोगतो त्यामुळे कोणताही शोक आम्हा जवळ येत नाही. निवृतिनाथ म्हणतात सर्वाठायी हरि हा गुरु गहिनीनी दिलेला आम्हाला उपदेश आहे.
