चराचरी हरि गुरुमुखे
187.
चराचरी हरि गुरुमुखे खरा । माजि ब्रह्म सैरा विचरो आम्ही ॥१॥
आम्हा ऐसे व्हावे तरीच हे भोगावे । निरंतर ध्यावे पोटाळूनि ॥२॥
नाही येथे काळ अवघे शून्यमये । निर्गुणी सामाये तुन माझी ॥३॥
निवृत्ति म्हणे परत्रिंकूटगोल्हाट । त्यावरील नीट वाट माझी ॥४॥
अर्थ:
ह्या चराचरात हरि भरल्याचे स्वतः गुरु गहिनीनाथानी सांगितले असल्याने त्या ब्रह्म स्वरुपा बरोबर स्वछंदाने फिरत असतो. आम्हा आत्मस्वरुपाने ब्रह्मरुप झाल्याने त्या ब्रह्म स्वरुपाला भोगत असतो व ते आत्म स्वरुप व ब्रह्मस्वरुप एकच झाल्याने एकमेकाला पोटाळुन असल्यासारखे वाटते. ते ब्रह्म स्वरुप शुन्यमय असल्याने शुन्याला कालाचे परिमाण नाही म्हणुन आम्ही देहासह त्या शुन्य स्वरुप ब्रह्मात एकरुप असतो. निवृतिनाथ म्हणतात, आकार मात्रेने झालेला स्थुल देह, उकार मात्रेने झालेला सुक्ष्म देह व मकार मात्रेने झालेला कारण देह वरिल टिंब म्हणजे महाकारण देह ही ओमकाराची रचना आहे. मी ह्या त्रिकुट गोल्हाटाचे म्हणजेच ॐचे ध्यान केल्याने मी ब्रह्म रुपाशी एकरुप झालो आहे. व हाच सरळ मार्ग आहे स्वस्वरुपाची खुण पटवण्याचा
