संचित प्रारब्ध क्रिय
2.
संचित प्रारब्ध क्रियमाण । न सुटे प्राणिया भोगिल्याविण ।
यालागी कारावे हरिचे स्मरण । तुटेल बंधन मग त्याचे ॥१॥
सत्कर्म करिता विधियुक्त । माजी निषेधाचा पडे आघात ।
सांग अथवा व्यंगा होत । होय ते संचित निश्र्चयेसी ॥२॥
उत्तम अधम कर्मे घडती । जाणता नेणता पदरी पडती ।
तेचि संचित होऊनि जाती । पुढे भोग द्यावया ॥३॥
पापपुण्यात्मक कर्मे घडली । भोगिता उर्वरीत जी राहिली ।
फळ द्यावया उभी ठाकली । प्रारब्धे लाभालाभ दायके ॥४॥
क्रियमाणे जे आता आचरे । सत्कर्मे अथवा अकर्माकारे ।
जे जे निपजे नित्य व्यवहारे । क्रियमाण ऐसे बोलिजे ते ॥५॥
आता तिहींचेही निस्तरण । घडे जेणे ते ऐक खुण ।
संचिते घडे जन्ममरण । उत्तम अधम योनिव्दारे ॥६॥
जे जे योनी धरी जो जन्म । तेथीचे विहित तोचि त्य स्वधर्म ।
सांग नव्हता भोगणे कर्म । नव्हेचि सुटिका कल्पांती ॥७॥
आता भलतेही योनि जन्म होता । अनुतापे भजे जो भगवंता ।
नामे त्याची गाता वानिता । दहन संचिता भक्तियोगे ॥८॥
यावरी प्रारब्धे भोग येती अंगा । भोगिता स्मरे जो पांडुरंगा ।
निस्तरे प्रारब्धा तो वेगा । पावो अंतरंगा श्रीहरिते ॥९॥
जे जे नित्याने आचरत । ते ब्रह्मार्पण जो करित ।
अहंकृति न धरी फळ काम रहीत । क्रियामाण जाळीत निष्कामता ॥१०॥
याचि लागी निळा म्हणे । कर्मपाश तुटती येणे ।
विठोबाच्या नामस्मरणे । यातायाती चुकती ॥११॥
