आरुषा वचनी मातेची आव
2858.
आरुषा वचनी मातेची आवडी । म्हणऊनि तांतडी घेत नाही ॥१॥
काय होईल माझे मांडिले कवतुक । आदराची भूक रडारोवी ॥धृपद॥
लपोनिया करी चुकुर माऊली । नाही होती केली निष्ठा सांडी ॥२॥
तुका म्हणे करी पारखी वचने । भेवउनि तान्हे आळवावे ॥३॥
अर्थ :
लहान मुल आपला हट्ट गोड बोबड्या शब्दात आईजवळ बोलतो परंतू तो त्याचा हट्ट आईला इतका गोड वाटतो की त्यामुळे त्याची समजूत काढण्यासाठी ती तातडी करत नाही. लहान बाळ रडू लागले जास्त हट्ट करु लागले तर आईला त्याचे कौतुक वाटते गंमत वाटते व नंतर त्याची समजूत काढण्याचाही फार आनंद होतो त्याप्रमाणेच देवाने देखील माझे कौतुक करायचे ठरवले की काय हे मला कळत नाही. एखादे वेळी आई मुलाची गंमत करण्यासाठी लपून बसते थोडासा चुकारपणाही करते परंतू मुलाविषयी असलेल्या प्रेमाची निष्ठाला धक्का लागावा असा हेतू मात्र तिच्या मनात नसतो. तुकाराम महाराज म्हणतात, एखादया वेळी आई आपल्या तान्ह्या बाळाला कठोर शब्दात बोलते देखील त्याला भीती देखील दाखवते परंतू पुन्हा त्याला जवळ घेऊन प्रेमाने आळवते.
