॥ श्रीएकनाथमहाराजकृत
4.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय चौथा ॥
सुकेशाची जन्मकथा
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
श्रीविष्णूंनी रावणाचा वध का केला असा रामांचा अगस्तिमुनींना प्रश्न :
ऐकोनि अगस्तीचें वचन । कर जोडोनि रघुनंदन ।
विनीतवृत्ती करोनि नमन । काय आपण बोलत ॥१॥
अगा ये अगस्ति महामुनी । पूर्वी लंकादुर्गभवनीं ।
राक्षस वसती हे तुमच्या वचनी । आजि म्या श्रवणीं ऐकिलें ॥२॥
ब्रह्मादिकांचा नियंता । चराचर वर्ते ज्याचिये सत्ता ।
यज्ञरूप जो अयोनिजेचा भर्ता । डोलवी माथा ऋषिवाक्यें ॥३॥
कुंभोद्भवाच्या वचनासी । ऐकोनि विस्मय श्रीरामासी ।
म्हणे स्वामी मांसभक्षक कपटवेषी । राक्षस लंकेसी वर्तती ॥४॥
पुलस्तिवंशीं राक्षस झाले । हे तुमचेनि मुखें ऐकिलें ।
रावणकुंभकर्ण जन्मले । प्रहस्तादि विकटादिक ॥५॥
आणि रावणाचे सुत । होते पराक्रमवंत ।
याहूनि ते राक्षस बळवंत । किंवा अशत्क सांगावे ॥६॥
अगा स्वामी महामुनी । तुम्ही समुद्र प्राशिला आचमनीं ।
तयांचे नाम तयांची करणी । मजलागूनी सांगावी ॥७॥
तया पूर्वज कोण । वर देता काय देखोन ।
तया विष्णूच वधी काय कारण । ते समूल निरूपण मज सांगा ॥८॥
हे कथा ऐकावयासी । उल्लास उपजतो मानसी ।
कृपा करोनि तुम्ही ऋषी । मजपासीं सांगावे ॥९॥
मुनी त्या प्रश्नाने चकित, त्यांच्याकडून रामस्तुती :
ऐकोनि श्रीरामवचन । अगस्ति झाला विस्मयापन्न ।
म्हणे वेदांसी न कळे महिमा जाण । तो तू ब्रह्म पूर्ण श्रीरामा ॥१०॥
तू चिदाकाशीं चिद्धन । तू योगियांमानसींचें चिद्रत्न ।
तू सुखसागरींचें सुधापान । तू निजजीवन संतांचे ॥११॥
श्रीरामा तू आदीचा आदी । तू मोक्षाची मोक्षसिद्धी ।
तू निधीचा परमनिधी । तू समाधि श्रीरामा ॥१२॥
तू तपाचे परम तप । तू भक्तांचा परम दीप ।
तू सदाशिवहृदयींचा जप । तू सुखस्वरूप सर्वांसी ॥१३॥
ध्येय ध्याता आणि ध्यान । तयांहून अससी भिन्न ।
सच्चिदानंद हे अरूतें जाण । तू परेहून परात्पर ॥१४॥
निर्गुण होत्साता अवतार धरिसी । तू अकर्मा होईनी कर्मे करिसी ।
अभक्ता भोग भोगिसी । तुझे निजमायेसी हे न कळे ॥१५॥
ऐसे असोनि रघुनाथा । आमुचे मुखींहून इच्छिसी कथा ।
तुझा महिमा न कळे तत्वता । परी वचन सर्वथा नुल्लंघी तुझे ॥१६॥
सृष्टीरक्षणार्थ ब्रह्मदेवाकडून भूतांची निर्मिती :
पूर्वी विष्णूचे नाभिकमळी । ब्रह्मा उपजला कमळदळीं ।
तेणे सॄष्टीसर्जनाचे काळी । भूते निर्मिली अनेक ॥१७॥
तया म्हणे चतुरानन । तुम्ही सृष्टीचें करा रक्षण ।
एक म्हणती करु रक्षण । ते रक्षोगण पै केले ॥१८॥
प्रजापतिस्तु तानाह सत्वांस्तु प्रहसन्निव ।
बभाष वाचा यत्नेन रक्षध्वमिति मानवाः ॥१॥
रक्षण करणारे ते राक्षस व पालन करणारे ते यक्ष या नावाने प्रसिद्ध झाले :
प्रजापति म्हणे भूतांसी । तुम्ही रक्षावे सृष्टीसी ।
येर म्हणती आज्ञा शिरसीं । रक्षूं सृष्टीसी स्वामिनाथा ॥१९॥
जे बोलिले करु रक्षण । तयांचेनि मुखे तयांसी जाण ।
नाम ठेविले रक्षोगण । भूतांचे रक्षण करिते झाले ॥२०॥
रक्षाम इति यैरुक्त राक्षसास्ते भवंति वै ।
यक्षाम इति यैरुक्त ते यक्षाः संभवंति वै ॥२॥
सृष्टि रक्षू म्हणोनि बोलिले । तेणे नांवे ते राक्षस झाले ।
तयांचे बोलणें तया फळले । करु लागले निजकर्मा ॥२१॥
यक्षाम गेले बोलून । ते झाले यक्षगण ।
चतुराननवचन प्रमाण । यक्ष अभिधान तया झाले ॥२२॥
सुकेशाची जन्मकथा :
तेथे हेति प्रहेति राक्षस । दोघे बंधु अति कर्कश ।
तयांचे कुळूं मधुकैटभांस । जन्मप्रकाश पै झाला ॥२३॥
प्रहेति अति धर्मिक तेथ । महावैराग्य उदासभूत ।
दार गृह नांगीकारित । परमेश्वररत पै झाला ॥२४॥
दुसरा हेति दारागृहार्थी । अत्यंत आसक्ति तयाचे चित्ती ।
प्रश्न करी ये काकुळती । ऋषिमुनी प्रती मागे कन्या ॥२५॥
मग काळाची भगिनी राक्षसी । भया नामे अतिकर्कशीं ।
तिणे आपुली कन्या हेतीसी । विधिपूर्वक दीधली ॥२६॥
हेति राक्षस स्त्रीसमवेत । कामी होऊन आसक्त ।
गृहाश्रमीं असे वर्तत । तंव एक सुत तया झाला ॥२७॥
विद्युत्केश नामे प्रख्यात । अत्यंत तेजस्वी बळवंत ।
अग्नीसारखा उग्र भासत । दिवसेंदिवस तेथे वाढिन्नला ॥२८॥
दिसे अत्यंत तरुण । रूपरेखागुणलक्षण ।
ठाणमाणगुणलक्षण । शोभा संपूर्ण शोभत ॥२९॥
मग हेति देखोनि पुत्रासी । झाला अत्यंत संतोषी ।
करावया पुत्रविवाहासी । कन्याविचारणेसी लागला ॥३०॥
तंव संध्या नामे राक्षसी । जाऊन तिचिया गृहासी ।
कन्या मागे निजपुत्रासी । अवश्यतेसीं दीधली ॥३१॥
संधेची कन्या अति सुंदर । संध्यारागासारिखें शरीर ।
तियेसी विद्युत्केश वर । लग्न सत्वर लाविले ॥३२॥
मग ती दोघें जणें । क्रीडा करिती वनोपवने ।
जैसे शचीसहित सहस्रनयनें । नाना स्थानी विचरिजे ॥३३॥
ऐसे बहुत दिवस लोटले । तंव पुढे काय वर्तले ।
एके दिवशी क्रीडेसी गेले । मंदरागिरिपर्वतीं ॥३४॥
तेथे ऋतुस्नान झाली । भर्तारा व्यवस्था कळो आली ।
क्रमिलें दिनत्रय ते काळी । ऋतु दिधला चवथे दिवसी ॥३५॥
उदरी प्रवेशतां रेत । गोठोनियां शुक्रशोणित ।
गर्भ संभवला त्वरित । प्रसवली सुत तत्काळ ॥३६॥
पर्जन्य वर्षे जळधारीं । तोय प्रसवे सागरी ।
पुनरपि मेघमुखेंकरीं । पृथ्वीवरी वर्षत ॥३७॥
तैसे तियेसी झाले । विद्युत्केशवीर्यातें धरिले ।
पुनरपि ते त्यागिले । मंदरागिरीं श्रीरामा ॥३८॥
ते बाळक शैलशिखरीं । अंगुष्ठ घालोनि मुखामाझारीं ।
चोखी चुरचुरा रुदन करी । जेविं अंबरीं घन गर्जे ॥३९॥
तंव भवानीसहित त्रिपुरारी । आरूढोन गोवाहनांवरी ।
क्रीडा करिता वनांतरीं । बाळकावरी दृष्टि पडली ॥४०॥
उमा विनवी महेशासी । बाळक अपूर्व तेजोराशी ।
कोणे त्यागिले अवगुणेंसीं । की पुत्र मूळेसीं लागला ॥४१॥
किंवा जननीस झाले भारी । म्हणोनि त्यागिले वनांतरीं ।
याच्या त्यागाची नवलपरी । मज त्रिपुरारी वाटते ॥४२॥
उचलोनि उत्संगावरी घेतलें । उमेने तया चुंबन केले ।
स्तन पाजून करे कुरवाळिलें । कृपेनें पाहिले निजदृष्टीं ॥४३॥
अमर करोनिया त्यासी । महादेवें दिधले वरासी ।
वाढता झाला अति वेगेंसीं । दिवसेंदिवसीं पै अधिक ॥४४॥
मग तो त्र्यंबक त्रिपुरारी । वसविता झाला गगनोदरी ।
गंधर्वनामें भ्रमत नगरी । राक्षसात्मजाकारणें ॥४५॥
पार्वतीचा सुकेशाला वर :
उमा म्हणे राक्षसात्मजा । जैसा तू वाढलासी वोजा ।
तैशाचि होती तुझ्या प्रजा । ऐसा शैलजा वर दिधला ॥४६॥
विद्युत्केशापासून उत्पन्न । म्हणोनि सुकेश नामधारण ।
शिवसेवें नित्य सावधान । राक्षस जाण पै असे ॥४७॥
हिंडे त्रैलोक्याभीतरी । क्रीडा करी वनांतरी ।
मागुता येत जेथे त्रिपुरारी । दर्शनगजरीं राक्षस ॥४८॥
जैसा अमरेश शचीसहित । वनोपवनीं क्रीडा करीत ।
तैसा तो राक्षस हिंडत । मागुता येत येथे पिनाकपाणि ॥४९॥
श्रीरामायणीं ऋषिनिर्मित । उत्तरकांडकथामृत ।
सज्जनीं सेवावें सावचित्त । श्रवणद्वारेंकरोनी ॥५०॥
श्रीरामकथा द्रुम केवळ । त्यावरी आरूढ वाल्मीक कविकोकिळ ।
टाहो करितसे रसाळ । श्रीराम येणे शब्दकल्लोळें ॥५१॥
एका जनर्दन शरण । पुढे गोड आहे निरूपण ।
श्रीरामकथा परम पवन । श्रोती अवधान पै दिजे ॥५२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
सुकेशजनमकथनं नाम चतुर्थोऽध्यायः ॥४॥
ओंव्या ॥५२॥ श्लोक ॥२॥ एवं ॥५४॥
