करी आणिकाचा अपमान ।
2964.
करी आणिकाचा अपमान । खळ छळवादी ब्राम्हण । तया देता दान । नरका जाती उभयता ॥१॥
तैसे झाले दोघाजणा । मागतिया यजमाना । जाळियेले वना । आपणासहित कांचणी ॥धृपद॥
घडिता दगडाची नांव । मोल क्लेश गेले वाव । तरता नाही ठाव । बुडवी तारू तरतीया ॥२॥
चोरा दिधला साटा । तेणे मारियेल्या वाटा । तुका म्हणे ताठा । हे तव दोघे नाडती ॥३॥
अर्थ :
जो नेहमी इतरांचा अपमान करतो खळ म्हणजे जो दुष्ट आहे व इतरांना जो ब्राम्हण छळत असतो, त्याला कोणी दान दिले तर देणारा आणि घेणारा दोघेही नरकात जातात. अगदी त्याप्रमाणे दान देणारा दाता आणि दान मागणारा याचक हे दोघेही जर छळवादी दुष्ट आणि इतरांचे अपमान करणारे असतील तर तेही नरकाला जातात. अहो लाकडावर लाकडाचे घर्षण केले की अग्नी उत्पन्न होतो व ते लाकूड स्वत:ही जळते व इतरांनाही जाळते. जर दगडाची नांव तयार केली तर त्याचे मोलही वायाला जाते व केलेले कष्टही वायाला जातात. अहो ती नांव स्वत:ही तरु शकत नाही आणि त्याच्यात जे तरुन जाणारे आहेत त्यांनाही तारु शकत नाही उलट ती स्वत:ही बुडते व इतरांनाही बुडवतेच. तुकाराम महाराज म्हणतात, जर एखादया चोराला आपण थोडयाशा धनासाठी सहकार्य करण्याचे ठरवले व त्याच्याबरोबर जाऊन चोरी केली तर ते दोघेही फसतात व दोघानाही शिक्षा होते.
