गुरूकृपा जरि पूर्ण अ
338.
गुरूकृपा जरि पूर्ण असे जया ।
शरण त्या श्रुतिशास्त्रकथा तया॥
हरिहरादिक किंकर दास हे ।
म्हणतसे बहेणि कवतूक हे ॥१॥
असे ते गुरू रे मना वोळखावे ।
अशाचे बरे दास्य भावे करावे॥
जेणे ज्ञानतत्त्वार्थ साधे स्वभावे ।
म्हणे बहेणि त्या सद्गुरू शरण जावे ॥२॥
गुरू तो खराजो बरा ज्ञाननिष्ठ ।
स्वधर्म-क्रिया पाळी जो वेदनिष्ठ॥
जया ज्ञानतत्त्वार्थ शुद्ध प्रकाशे ।
म्हणे बहेणि ज्या ब्रह्म सर्वत्र भासे ॥३॥
गुरू गुरू करिताति कलीवरे ।
विषयसंभरणी बहु आस रे॥
उकिरडा फिरती जशि सूकरे ।
म्हणतसे बहेणि त्रिमिरा भरे ॥४॥
जेथे ज्ञानवैराग्य भक्ती ठसावे ।
क्षमा शांति देही दया हे विसावे॥
दिसे ब्रह्मचर्य स्व-आंगासि आले ।
म्हणे बहेणि तो सद्गुरू स्वभावे ॥५॥
निजगुरू निजदाता भेटता कोण चिंता ।
भवतमशमकर्ता शोकसंतापहर्ता॥
त्रिभुवनिसुखदानी भक्तदासाभिमानी ।
म्हणतसे बहेणि तो रामतूका निदानी ॥६॥
