चित्ती तुझे पाय डोळा
3201.
चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान । अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥
हेचि एक तुम्हा देवा मागणे दातारा । उचित ते करा माझा भाव जाणूनि ॥धृपद॥
खुंटली जाणींव माझे बोलणे आता । कळो यावी तैसी करावी बाळकाची चिंता ॥२॥
तुका म्हणे आता नको देऊ अंतर । न कळे पुढे काय बोलो विचार ॥३॥
अर्थ :
देवा माझ्या चित्तामध्ये तुझे पाय, डोळयामध्ये तुझे रुपाचे ध्यान आणि मुखामध्ये अखंड तुझे नाम व तुझे गुणगान मी अखंडपणे वर्णन करावे. हे उदार दातारा देवा एवढे एकच मागणे माझे तुमच्याजवळ आहे माझ्या अंत:करणातील भक्तीभाव जाणून जे उचित आहे जे योग्य आहे तेच तुम्ही करा. देवा माझे नेणतेपण व बोलणे आता खुंटले आहे त्यामुळे तुम्हाला जसे कळेल तसे या बाळाची चिंता तुम्ही करा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा त्यामुळे आता तुम्ही मला तुमच्यापासून अंतर देऊ नका तुमच्यापुढे मला कोणते विचार बोलावेत हेच कळत नाही.
