होरा भारुड
1.
होरा भारुड
मी आलो रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ॥धृ॥
तेथूनि पुढे बरे होईल । भक्तिसुखे दोंद वाढेल ।
फेरा चौऱ्यांशीचा चुकेल । धनमोकासी ॥१॥
मनाजी पाटील देहगांवचा । विश्वास धरु नका त्याचा ।
हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारीण । झगडा घाली मोठी दारूण ।
तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३॥
एकाजनार्दनी कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी ।
जा शरण सद्गुरुसी । फेरा चुकवा चौऱ्यांयशी ॥४॥
