ब्रह्मांड उतरंडी ज्य
99.
ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इच्छे घडी । ती उच्छिष्टे काढी धर्माघरी ॥१॥
देखिला वो माये चक्रभुज स्वभावी । वारु ते वागवी अर्जुनाचे ॥२॥
याज्ञिक अर्पिती मंत्रांच्या आहुती । तो द्रोपदियेप्रती भाजी मागे ॥३॥
निवृत्तिदैवत पूर्ण मनोरथ । पांडव कृतार्थ कृष्णनामे ॥४॥
अर्थ:
जशी हंड्यांची उतरंड रचतात तसे हे ब्रह्मांड ज्याच्या इच्छेने रचले गेले तो धर्माच्या घरी उष्ट्या पत्रावळी गोळा करत आहे. हे माझे आई ज्याच्या भुजांवर चक्र आहेत असा तो कृष्ण अर्जुनाची घोडी सांभाळत आहे. ज्याच्या नावे याज्ञिक यज्ञात आहुत्या देतात तो द्रौपदीच्या ताटाला लागलेले भाजीचे पान मागुन खातो व संतुष्ट होतो. निवृतिनाथ म्हणतात, ज्याचे नाम घेत पांडव पुण्यवंत झाले त्याच दैवताचे नाम माझे मनोरथ पूर्ण करतील.
