केशव म्हणे नाम्या खं
935.
केशव म्हणे नाम्या खंती वाटे माझ्या मनी | निद्रा न लगे नयनी पाहता वाट ॥१॥
तुजविण उदास वाटे ही पंढरी | न पडे क्षणभरी विसरु तुझा ॥२॥
डोळीया वेगळा नवजे कोठे दुरी | चित्त मजवरी ठेवुनि राहे ॥३॥
तुज माझी सवे मज तुझी आवडी | गुळासी न सोडी गोडी जैसी ॥४॥
तैसे तुम्ही आम्ही एकमेकांमाजी | विचारिता सहजी दुजे नाही ॥५॥
येतया जातया पुसे तुझी गोष्टी | म्हणे माझे नामे दृष्टि पडिले होते ॥६॥
वाटे तहानभूक पीडिल्या जाणे कोण | एका मजविण गूज त्याचे ॥७॥
रात्रंदिवस खेद करुनि आपुल्या जीवा | असेल माझा धांवा पोकारीत ॥८॥
मजवीण कोणाचिये साउली बैसेल | कोण त्या पूसेल शीणभागु ॥९॥
संतांपासी सांगे शिणले मजविण | कंठी धरिला प्राण मजलागी ॥१०॥
धरुनी हनुवटी दिधले आलिंगन | कुरवाळोनी वदन नेत्र पुशी ॥११॥
मग काढोनी कंठीची सुमनतुळशीमाळा | घातलिसे गळा नामयाच्या ॥१२॥
सर्वांगसुंदर पाहे कृपादृष्टी | पुसे जीवीची गोष्टी कृपासिंधू ॥१३॥
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान खेचर | नरहरि सोनार आदिकरोनी ॥१४॥
समस्त भक्त मिळोनी लोटांगणी येती | आलिंगन देती नामयासी ॥१५॥
अनिवार सुमने वर्षती सुरवर | गगनी जयजयकार शब्द होती ॥१६॥
ऋषिगण गंधर्व मिळोनि सकळीक | येती दृष्टिसुख घ्यावयासी ॥१७॥
रुक्माई आरती घेऊनी आली वेगे |ओंवाळीले दोघे देवभक्त ॥१८॥
कवतुके नाम्याची धरिली हनुवटी | पाहे कृपादृष्टी घडिये घडिये ॥१९॥
