तीर्थे करोनी नामा पं
934.
तीर्थे करोनी नामा पंढरीये आला | जिवलगा भेटला विठोबासी ॥१॥
सद्गदित कंठ वोसंडला नयनी | घातली लोळणी चरणावरी ॥२॥
शिणलो पंढरिराया पाहे कृपादृष्टि | थोर जालो हिंपुटी तुजविण ॥३॥
अज्ञानाचा भाग होता माझे मनी | हिंडविले म्हणोनि देशोदेशी ॥४॥
परि पंढरीचे सुख पाहता कोटि वाटे | स्वप्नीही परि कोठे न देखेंची ॥५॥
उदंड तीर्थाची ऐको जाय प्रौढी | परि चित्त माझे वोढी चंद्रभागा ॥६॥
म्हणोनि चरणांची ठाकोनि साउली | आलो मज सांभाळी मायबापा ॥७॥
तया देवाची वास न पाहती माझे नयन | न करिती पूजन कर त्यांचे ॥८॥
तेणे पंथे माझे न चलती चरण | नाइकती श्रवण कीर्ति त्यांची ॥९॥
कटी तटी जेणे कर नाही ठेविले | न देखे पाउले विटेवरी ॥१०॥
त्यांते म्हणता देव लाजे माझे मन | ते कष्ट दारूण कवणा सांगू ॥११॥
जये गांवी नाही वैष्णवांचा मेळु | न देखे सुकाळु हरिकथेचा ॥१२॥
कुंचे गरुड टके न देखो पताका | त्या देवाची शंका वाटे थोर ॥१३॥
हे जेथे न देखे तेथे खंती वाटे जीवी | ते वेळी आठवी रूप तुझे ॥१४॥
इष्ट मित्र बंधु तू कुळदेवता | नामा म्हणे आवडता प्राणी माझा ॥१५॥
