(काला व खेळया संबंधी
3675.
(काला व खेळया संबंधीचे अभंग)
बैसवुनि फेरी । गडिया मध्यभागी हरी । अवघियांचे करी । समाधान सारिखे ॥१॥
पाहे तो देखे समोर । भोगी अवघे प्रकार । हरुषे झेली कर । कवळ मुखी देती ते ॥धृपद॥
बोले बोलतिया सवे । देतील ते त्यांचे घ्यावे । एक एका ठावे । येर येरा अदृश्य ॥२॥
तुका म्हणे देवा । बहु आवडीचा हेवा । कोणाचिया जीवा । वाटो नेदी विषम ॥३॥
अर्थ :
गोलाकार फेर धलेल्या गोपाळांच्या समवेत श्रीहरि मध्यभागी बसला. त्यामुळे त्याने सर्व गोपाळांचे सारखे समाधान केले. जो कुणी हरिकडे पाहत होता त्या प्रत्येकाला हरी आपल्या समोरच आहे, असे वाटत होते, प्रत्येकाच्या शोदोरित ज्या ज्या प्रकारचे अन्न होते, ते ते सेवन करीत होता. काही सवंगडी श्रीकृष्णच्या मुखात घास भरवित होते व तो घास ते हि खात होते. श्रीकृष्ण बोलणाऱ्या गोपाला बरोबर बोलत होता, ते जे काही प्रेमाने देतील, ते घेत होता. काहींना श्रीहरिच्या तात्विक स्वरुपाच्या खुणांचे ज्ञान होत होते. काहिना ते समजने शक्य होत नव्हते. तुकाराम महाराज म्हणतात, देवांना गोपाळांच्या प्रेमाची खुप आवड होती. त्यामुळे कोणाच्याही जीवाला परकेपना वाटत नव्हता.
