जेणे होय हित । ते तू
2950.
जेणे होय हित । ते तू जाणसी उचित ॥१॥
मज नको लावू तैसे । वाया जाये ऐसे पिसे ॥धृपद॥
धरितोसी सत्ता । होसी सकळ जाणता ॥२॥
चतुराच्या राया । अंगीकारावे तुकया ॥३॥
अर्थ :
देवा ज्या योगाने माझे हित होईल व जे उचित आहे ते तू जाणतो आहेस. देवा मी उगाचच वायाला जाईन असले भलतेसलते काही वेड तू मला लावू नकोस. देवा सर्व सत्ताधारी व सर्व जाणता तू आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, हे चतुरांच्या राजा तू माझा अंगीकार कर.
