भावे आळविता देवा ।
841.
भावे आळविता देवा ।
लागला हाती जुनाट ठेवा ।
दैव मोडीनी आले दैवा ।
सुख विश्रांती पावलो ॥१॥
आता वेचूं खाऊ जेऊ ।
शोभती अळंकार ते लेऊ ।
आपुले सुहद गौरवू ।
हरिभक्त वैष्णव साबडे ॥२॥
अपार संपत्ती आली घरा ।
नाही आता वोढावारा ।
नलगे जाणे आणिकांच्या घरा ।
काही मागावे यासाठी ॥३॥
खरे नाणे खरे केणे ।
खरिया मोले घेणे देणे ।
खरे विके खरेपणे ।
न पडे उणे भरलेंसे ॥४॥
निळा म्हणे माझिया दैवे ।
जोडिले होते पडिले ठावे ।
कृपा केली विठ्ठल देवे ।
दिधले भांडार ॥५॥
