आई मज ह्मणसील अवगुणा
229.
आई मज ह्मणसील अवगुणांचे । तरी मी काय करितो कोणाचे । जे जे होणार जयाचे । ते का मजवरी घालिसी ॥१॥
भट आलासे माभळ । तेणे वर्णिल जन्मकाळ । तो चुकला ग्रहमूळ । तेणे त्यासी पाडिले ॥२॥
माये तीच मावशी । तिने मज घेतले वोसंगासी । तिचे अंगी होती विवशी । तिने तिसी ग्रासिले ॥३॥
दही भात रत्नताटी । कालवूनि लावी माझे ओंठी । जेविता काग घाली मिठी । धरूनि मुष्टी रगडिला ॥४॥
कैसी पाठविली रिठा-गांठी । ती घातली माझे कंठी । तेणे माझ्या गळा मिठी । मग म्या दाढे रगडिली ॥५॥
खेळत होतो यमुनेतटी । बक लागला माझे पाठी । मग मी धरूनि चंचु उपटी । धरणीवरी आपटिला ॥६॥
आई म्या तुझे काय केले । त्वा मज उखळासी बांधिले । रांगत रांगत अंगणी आलो । तेणे वृक्ष उन्मळिले ॥७॥
ऐसा नाटकी ह्लषिकेशी । परब्रह्म दावी यशोदेसी । विष्णुदास नामा अह-र्निशी । ह्लदय कमळी पाहातसे ॥८॥
