वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › १६. हनुमंत जन्मकथा

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088364 · अभंग क्र. १६

16.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय सोळावा ॥
शंकराचे रावणाला वरदान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

मागिले प्रसंगी वैश्रवण । रणभूमीस झाला भग्न ।
मागे रावणे पुष्पक हिरोन । वरी आरूढोन निघाला ॥१॥
सवे प्रधान थोर थोर । मारीच प्रहस्त महावीर ।
विमानी आरूढोन वने घोर । लंघिते झाले ते काळी ॥२॥
षडाननाचें जन्मस्थान । ते देखिले शरवण वन ।
तेथे शर होती उत्पन्न । यालागी शरवण बोलिजे ॥३॥
तदनंतरे पौलिस्तिकुमर । देता झाला वन सुंदर ।
वृक्ष वल्ली अपार । अति मनोहर देखिले ॥४॥
तेजे अत्यंत साजिरे । सुवर्णमयचि साकारें ।
उपमा देता भास्करें । किरणाजाळ सोडिले ॥५॥
तया वनप्रदेशीं कैलासगिरी । असे जैसा मेरू धरित्रीं ।
त्याच भागीं शोभा साजिरी । पुष्पक तेथे येते झाले ॥६॥

कैलासपर्वतावर येताच पुष्पक विमान एकाएकी थांबले :

पुष्पकें दिखिला कैलास । पुढे न चाले राहिले सावकाश ।
गति खुंटली देखोनि राक्षस । थोर आश्चर्य पावला ॥७॥
अत्यंत प्रतापी रावण । चिंताक्रांत म्लानवदन ।
प्रधानाप्रति काय वचन । बोलता झाला ते समयी ॥८॥
हे पुष्पक विमान । न चाले गति खुंटोन ।
येथे राहिले कोण कारण । निर्धार पूर्ण लक्षेना ॥९॥
पर्वतासारिखें पुष्पकविमान । पर्वतमाथां राहिले जाण ।
कोण कर्म वैभव कोण । काय कारण राहिले ॥१०॥

रावणाची चिंता ओळखून त्याचे कारण मारीचाने सांगितले :

दशग्रीव ऐसे बोलिल्यावरी । ऐकोनि मारीच सारांश उत्तरीं ।
बोलता झाला शब्दचातुरीं । म्हणे अवधारा लंकेशा ॥११॥
हे जे पुष्पक विमान । निष्कारण का पतन ।
पर्वतमाथा वळंघोन । कोणे कर्मे राहिले म्हणसी ॥१२॥
निश्चितेसीं राजचूडामणी । पुष्पक कुबेराचें म्हणोनी ।
पुढे न चालें मार्ग खुंटोनी । राहिले हे पर्वतमाथां ॥१३॥
कुबेराचें विमान । तेथे आरूढे वैश्रवण ।
तयावीण न चाले जाण । रहावया मूळ हेंचि यासी ॥१४॥

इति वाक्यांतरे तस्य करालः कृष्णपिंगलः ।
वामनो विकटो मुंडी दंडी हस्वभुजो बली ॥१॥
ततः पार्शमुपागम्य भवस्यानुचरोऽब्रवीत ।
नंदीश्वरो वचश्चैनं राक्षसेंद्रशंकितः ॥२॥

आकाशातून आलेल्या प्रचंड गर्जनेने रावणादि सर्व राक्षस भयभीत :

इतुके मारीच बोलिल्या - वरी । तंव गगनमार्गी एक्सरी ।
हाक फुटली तेणेंकरी । रावण थोर गजबजिला ॥१५॥
ऊर्ध्व अव्लोकिती राक्षसगण । तंव अकराळ विकराळ वदन ।
प्रभा कृष्ण पिंगळ पूर्ण । स्वरूप भयानक देखिले ॥१६॥
खुजट शरीर विकट वदन । मस्तकी बोलता हाती दंड जाण ।
भुजा लहान पराक्रम गहन । येवोनि गर्जन तेणे केले ॥१७॥
तदनंतरे ईश्वरसेवक । पार्श्वभागीं आला एक ।
नंदिकेश्वरनामें देख । बोलता झाला ते वेळी ॥१८॥
नंदिकेश्वराचें वचन ऐकोन । दशग्रीव शंकित होवोन ।
पुढे काय बोलिला ईश्वरगण । श्रोती सावधान अवधारिजे ॥१९॥

निवर्तस्य दश्ग्रीव शैले क्रीडति शंकरः ।
सुपर्णनागयक्षाणां देवगंधर्वरक्षसाम् ॥३॥
सर्वेषामेव भूतानामगस्यः पर्वतः कृतः ॥४॥

नंदीने रावणाला तेथून ताबडतोब निघून जाण्यास सांगितले :

वदता झाला नंदिकेश्वर । रावणा येथोनि परता सर ।
पर्वती क्रीडती श्रीशंकर । सवे भवानीं पै असे ॥२०॥
उमेसहित चंद्रमौळी । आनंदे क्रीडती ये शैलीं ।
तू येथोनि शीघ्रकाळीं । जय आणिके स्थळाप्रति ॥२१॥
गरूडयक्षसर्पांसी । देवगंधर्वराक्षसांसी ।
आणिक भूते भूमंडळवासी । त्यांसहि पर्वत हा वर्जिला ॥२२॥
नंदिकेश्वराचें वचन । ऐकोनि दशग्रीव कोपायमान ।
क्रोधे मस्तक डोलवोन । कानींची कुंडले झळकती ॥२३॥
क्रोधे थरथरां कांपत । नेऋ करोनि आरक्त ।
पुष्पकावरोनि बोलत । कोण शंकर कैंचा रे ॥२४॥

रावणाच उन्मत्तपणा :

कैंचा शंकर कोण उमा । शैलीं का क्रीडतसे अधमा ।
तयाचे भय दाविसी आम्हा । इये पर्वतापाठारीं ॥२५॥
दुरक्ती रावणाचे वचन । तेणे नंदिकेश्वरें ऐकोन ।
दिव्यशुळ करी घेवोन । क्रोधे नयन वटारी ॥२६॥
ऐशियाते रजनीचर । देखोनि म्हणती हे वानर ।
आम्हांसि भेडसावितें थोर । म्हणोनि हेळणा मांडिली ॥२७॥
पहा हो कैसे आश्चर्य वाटे । आम्हासिं भेडसावितें मर्कट ।
याचे मुखावलोकन पहाटे । करिता प्राणी कष्टी होय ॥२८॥

नंदीची भविष्यवाणी :

ऐकोनि दशग्रीवाचें वचन । क्रोधे नंदिकेश्वर आपण ।
बोलता झाला सावधान । श्रवण कीजे सादरें ॥२९॥
तू माझी हेळणा करिसी । नेणसी माझ्या प्रतापासी ।
मारिता तुज या समयासी । मद्भक्तींसी उचित पै नाही ॥३०॥
तुझ्या वधालागीं दशानना । मजसारिखे मुख्य जाणा ।
बळे पालथें करिती त्रिभुवना । यद्वीर्या सरी नसे कोठे ॥३१॥
बळरूप पराक्रम जाण । वानर होती अति दारूण ।
ते तुझिया कुळाचें नाशन । निमेषें पूर्ण करितील ॥३२॥
नख दंष्ट्रा हातियेर । संग्रामी मदन्मत्त थोर ।
एकैक वानर पर्वताकार । अगणित वीर उपजती ॥३३॥
ते वानर बळेंकरीं । तुझिया कुळाची बोहरी ।
करितील क्षणामाझारीं । राक्षसा उरी नुरेल ॥३४॥
मज मारिता तुम्हांसी । अशक्य नाही निश्चयेंसी ।
परी ये समयी मी न मारीं तुम्हांसीं । कार्यकारण पुढे असे ॥३५॥
स्वर्गी देवविमानपंक्ती । नंदिकेश्वराच्या वचना मानवती ।
पुष्पवर्षाव सुरवर करिती । नाना शब्दे स्तवोनियां ॥३६॥
नंदी म्हणे दशानन । तुझे पूर्व कर्म जाण ।
मारिले असता मी आपण । बोल लागेल भविष्या ॥३७॥
नंदीचें वचन ऐकोन । कोपे खवळला रावण ।
मग केले गडगर्जन । नादें पर्वत दुमदुमिला ॥३८॥

रावणाच कैलास उपटण्याचा निश्चय :

मज जाता आकाशपंथें । खुंटविलें माझ्या विमानतें ।
तरी मी या पर्वताते । मूळासहित उपडीन ॥३९॥
पर्वत उपडोनि सागरी । निमग्न करीन निर्धारी ।
काय कारण त्रिपुरारी । नृपासरिखा क्रीडतसे ॥४०॥
राक्षसांसी हे भयानक स्थान । ते मी निर्भय करीन जाण ।
ऐसे बोलोनिया आपण । काय करिता जाहला ॥४१॥
रावणभुजबळाची थोरी । विसां भुजीं कैलासगिरी ।
वेढिला तेणे अंदोळेंकरीं । एकवीस स्वर्गें डळमळलीं ॥४२॥

रावणाच्या अद्‌भूत पराक्रमाने कैलास डळमळू लागाला :

भुजाबळेंकरोनि दशानन । कैलास कालविला परक्रमें जाण ।
देव झाले कंपायमान । कोण विघ्न ओढावलें ॥४३॥
ऋषीश्वरा सुटला पळ । म्हण्ती ओढावला प्रळयकाळ ।
पालथा होऊं पाहे ब्रह्मांडगोळ । भंगा भूगोळ जाऊ पाहे ॥४४॥
उमा झोंबे नीळकंठा । रमा थापटी वैकुंठा ।
कोणे मांडिलें संकटा । सुरश्रेष्ठा चिंतामणे ॥४५॥
तदनंतरे श्रीरघुपती । काय करिता झाला कैलासपती ।
अंगुष्ठ चेपूनि पर्वती । सुरव्यथा निवारण करी ॥४६॥

शंकराने अंगठ्याचे कैलास चेपून रावणाला पर्वतातळी दडपला :

लीलेकरोनि महेश । अंगुष्ठे चेपितां पर्वतास ।
रावण झाला कासावीस । मेटें वळलीं तयांसी ॥४७॥
रावण भुजा परत्या करी । तंव त्या जडल्या बळे भारी ।
सुटका नव्हे कवणेपरी । दांत चावी राक्षस ॥४८॥
भुजा नसुटती तेथ । सर्व शक्ती जाहली व्यर्थ ।
दशानन अति आक्रंदत । ओरडत अति दुःखे ॥४९॥
हांक फोडितां लंकापती । त्रैलोक्य भयभीत चित्ती ।
हांक ऐकोनि प्रधान भीती । मांडला म्हणती प्रळय आजी ॥५०॥
हांक ऐकोनि दुर्शर । आसन सांडोनि देवेंद्र ।
म्हणे फुगला समुद्र । मर्यादा सांडूं पाहतसे ॥५१॥
पर्वताचे हृदय तडाडिलें । वायुमंडळ स्तब्ध झाले ।
कळिकाप कांपे चळचळे । नभीं अभ्रें दाटलीं ॥५२॥
मंगळाची जननी थरारली । नभींची नक्षत्रे च्यवली ।
दिग्गजांचीं दोंदें तडाडिलीं । कापों लागले शशिसूर्य ॥५३॥
यक्ष आणि विद्याधर । सिद्ध चारण किन्नर ।
बोलते झाले प्रळय थोर । चंद्रशेखर निवारिता ॥५४॥
समस्त करिताती स्तवन । गिरिजापति तुज अनन्यशरण ।
आम्हांसि रक्षिता तूंचि जाण । कायावाचामनेंसी ॥५५॥
कृपाळुवा उमाकांता । त्रिपुरांतका विश्वनाथा ।
तुजवांचोनि आम्हा तारिता । नाही दुजा भूमंडळी ॥५६॥
प्रधान म्हणती दशानना । तू जाय शिवासि शरणा ।
तो हे निवारील विघ्ना । अनमाना नको करू ॥५७॥

रावणाची शिवस्तुतू व शरणागती :

येरीकडे दशानन । करिता झाला शिवस्तवन ।
नाना स्तोत्रें मंत्रे जाण । शिव प्रसन्न तेणे केला ॥५८॥
प्रेमसिधुं गिरिजापती । कैलासींचा भोळा चक्रवर्तीं ।
ऐकोनि रावणाची स्तुती । तत्काळ उडी घातली ॥५९॥
मस्तकी जटाजूट साजिरा । तया तळी नेत्र तिसरा ।
जेणे जाळिलें रतिवरा । जो योगीश्वरा निजवंद्य ॥६०॥
मुकुटी मंदाकिनी पापनाशिनी । जे जन्मली विष्णूच्या चरणी ।
जिचें नाम घेता वदनी । पापें दिशा लंघिती ॥६१॥
भाळीं विभूतिलेपन । तयावरी चंद्र विराजमान ।
शोभे हाती नरकपाळ घेऊन । रुंडमाळा कंठी रुळे ॥६२॥
अंगी भस्म चर्चिलें । वरी रुद्रक्ष मिरवले ।
व्याघ्रांबर परिधान केले । तत्काळ आला समीप ॥६३॥
रावणे देखोनि उमापती । प्रणिपात करी नम्रवृत्ती ।
म्हणे स्वामी कृपामूर्ती । त्राहि महादेवा ॥६४॥
सहस्र वर्षेपर्यंत । रडत होता दशानन तेथे ।
महादेव होवोनि विस्मित । थोर आश्चर्य मानिलें ॥६५॥

रावणाच्या स्तुतीने शंकर प्रसन्न :

महादेव म्हणे तुझे स्तवन । ऐकोनि झालो सुप्रसन्न ।
या पर्वतापासोनि मुक्त जाण । भुजा तुझ्या होतील ॥६६॥
तुवा केली दीर्घ रव दारूण । त्रैलोक्य झाले कंपायमान ।
तस्मात् तुझे नाव रावण । देवयक्षगण म्हणतील ॥६७॥
शीघ्र येथोनि लंकापती । जाई आपुल्या स्वस्थळाप्रती ।
जे वांच्छा असेल चित्ती । ते पावसी शीघ्रकाळें ॥६८॥
ऐसे महेश बोलिल्यानंतरें । रावण म्हणे जी दातारें ।
कृपा केली तरी माझी वचनोत्तरें । सावकाश ऐकावीं ॥६९॥

रावणाची मागणी :

प्रसन्न झालासि महादेवा । तरी मज बरवा वर द्यावा ।
पूर्वी म्या तपोबळे ब्रह्मदेवा । अवध्यता मागितली ॥७०॥
चतुरानने वरदान । मज दिधले जे यक्षगण ।
विद्याधर देव राक्षस दारूण । यांचेनि तुज मृत्य नाही ॥७१॥
दीर्घ आयुष्य मज झाले । ते भोगितां चित्त उबगले ।
आता काही असेल जे उरले । लाविले मी तुझ्या ध्यानीं ॥७२॥

शंकराने रावणाला खड्ग देऊन विष्णुहस्ते मरण येईल असे सांगितले :

ऐसे रावणाचे वचन । ऐकोनिया शैलजारमण ।
चंद्रहास्य खड्.ग दारूण । रावणालागीं दिधले ॥७३॥
आयुष्याचे अंतीं जाण । तुज विष्णुहस्तें मरण ।
अंतकाळीं माझ्या समीपतेस । तू येशील लंकापति ॥७४॥
याउपरी त्रिपुरांतके जाण । दशानना नाम रावण ।
ठेवोनि चंद्रहास्य खड्ग देवोन । आपण कैलासाप्रति गेला ॥७५॥
रावण आरुढोनी विमानावरी । चंद्राहास्य खड्‍ग घेवोनि करी ।
विचरता झाला सवे मंत्री । प्रहस्तादिक मारीच ॥७६॥
अगस्ति म्हणे श्रीरामा । मग तो रावण पापकर्मा ।
प्रवर्तला थोर अधर्मा । क्षत्रियांतें जिंकिता जाहला ॥७७॥
क्षत्रिय राजे थोर थोर । तया बाधा करी दशशिर ।
कोणी भयकरोनि देशांतर । करिते झाले रावणधाकें ॥७८॥
कोणी म्हणती रावण । आम्ही तुम्हा सेवकांसमान ।
ऐसी सॄष्टि जिंकीत रावण । पुढे पुढे चालिला ॥७९॥
एका जनार्दना शरण । पुढे वेदवती आख्यान ।
रसाळ आणि रम्य जाण । सावधान अवधारा ॥८०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावणशिववरदो नाम षोडशोऽध्यायः ॥१६॥ ओंव्या ॥८०॥ श्लोक ॥४॥ एवं ॥८४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग