कासया व्हावे आम्ही ज
3168.
कासया व्हावे आम्ही जीवन्मुक्त । सांडुनिया थीत प्रेमसुख ॥१॥
वैष्णवाचा दास झाला नारायण । काय त्या मिळोन असो सुखी ॥धृपद॥
काय त्या गाठीचे पडले सुटोन । उगलाचि बैसोन धीर धरू ॥२॥
सुख आम्हासाठी केले हे निर्माण । निर्दैव तो कोण हाणे लाता ॥३॥
तुका म्हणे मज न लगे सायुज्यता । राहेन या संता समागमे ॥४॥
अर्थ :
देवा तुझे चांगले प्रेमसुख सोडून आम्ही जीवन मुक्त कशासाठी व्हावे ? हा नारायणच जर वैष्णवाचा दास होत असेल तर मग त्याच्यामध्ये एकरुप होऊन त्याच्यात मिसळून काय सुख मिळणार आहे ? अहो आम्हाला नारायणाचे सुख आमच्या पदरात मिळाले आहे तर मग असे असताना आमच्या पदरचे असे काय हरवले आहे काय, की आम्हाला मुक्तीची अपेक्षा करावी लागेल आम्ही नारायणाचे प्रेमसुख प्राप्त व्हावे यासाठी उगाचच धीर धरुन बसून राहू. खरे तर हे सुख देवाने आमच्यासाठीच निर्माण केले आहे मग या जगात असा कोण दुर्दैवी आहे की देवाच्या प्रेमसुखाला लाथा हाणेल. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला सायुज्यमुक्ती नको आहे मी संतांच्या सहवासातच राहीन.
