होईन खडे गोटे । चरणर
3167.
होईन खडे गोटे । चरणरज साने मोठे । पंढरीचे वाटे । संतचरणी लागेन ॥१॥
आणीक दुजे काही । मी मागे न तुजपासी । आठविता सुख । भय नास नाही ज्यासी ॥धृपद॥
होइन मोचे वाहणा । पायी सकळा संतजना । मांजर सुकर सुणा । जवळी शेष घ्यावया ॥२॥
सांडोवा पायरी । वोहळ बावी गंगातिरी । होइन तयावरी । संतसज्जन चालती ॥३॥
लागे संता पायी । ऐसा ठेवी भलते ठायी । तुका म्हणे देई । धाक नाही जन्माचा ॥४॥
अर्थ :
पंढरीला जाणाऱ्या मार्गामध्ये मी लहान मोठे खडे होईल, पायाला लागणारी बारीकशी धूळ देखील होईल. कारण त्या वाटेने संत नेहमी जात असतात व त्या निमित्ताने त्यांचा स्पर्श मला होईल त्यांचे पाय माझ्या अंगाला लागतील. यापेक्षा वेगळे काहीही देवा मी तुझ्याजवळ मागणार नाही. संतांचे स्मरण केले असता जे सुख प्राप्त होते ते अविनाशी सुख असते व त्या सुखामुळे भय देखील वाटत नाही. मी सर्व संतांच्या पायात घालणाऱ्या मोची (वाहाणा) होईल. एवढेच नाही तर त्यांचे उच्चिष्ट सेवन करण्यास मिळावे यासाठी मी त्यांच्याजवळ मांजर सुकर किंवा कुत्रा देखील होऊन जवळ राहीन. मी पायरी होऊन विहीरीच्या, ओढयाच्या, गंगातीराच्या ठिकाणी राहीन कारण संत तेथे येतील व त्यांचे पाय माझ्यावर ठेवतील. मग त्यांवरुन संत सज्जन चालत जातील. तुकाराम महाराज म्हणतात, देवा ज्या ठिकाणी मला संतांच्या पायाचा स्पर्श होईल संतांचे पाय माझ्या अंगाला लागतील अशा भलत्या ठिकाणी का होईना पण ठेव. दयायचे असेल तर हेच दान मला दे त्यामुळे मला जन्माचे कोणत्याही प्रकारचे भय किंवा धाक राहाणार नाही.
