येतील अंतरा शिष्टाचे
2945.
येतील अंतरा शिष्टाचे अनुभव । तळमळी जीव तया सुखा ॥१॥
आता माझा जीव घेउनिया बळी । बैसवावे वोळी संतांचिये ॥धृपद॥
विस्तारिली वाचा फळेंविण वेल । कोरडेचि बोल फोस वांझे ॥२॥
तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी । राहो नेदी उरी नारायणा ॥३॥
अर्थ :
पूर्वी जे ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत मुनी होऊन गेले त्यांना जो ब्रम्हानुभवाचा अनुभव आला तोच अनुभव माझ्या अंतरंगात येईल काय आणि त्या सुखासाठीच माझा जीव तळमळत आहे. अहो देवा आता माझ्या सुखाचा बळी तुम्ही घ्या आणि परंतू संतांच्या मात्र रांगेमध्ये मला बसवा. एखादा वेल फळावाचून नुसताच विस्तार पावावा त्याप्रमाणे माझे बोलणे हे खूपच विस्तार पावले आहे परंतू ते अनुभवाने खोल कोरडे वांझ राहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा मी आता अगदी निर्वाणीवर आलो आहे आता मी काहीही बाकी राहू देणार नाही.
