प्रवृत्तिनिवृत्तीचे
3276.
प्रवृत्तिनिवृत्तीचे आटूनिया भाग । उतरिले चांग रसायण ॥१॥
ज्ञानाग्निहुताशी कडशिले वोज । आत्मसिद्धिकाजा लागूनिया ॥धृपद॥
ब्रम्ही ब्रम्हरस सिध्द झाला पाक । घेतला रुचक प्रतीतीमुखे ॥२॥
स्वानुभवे अंगी झाला समरस । साधनी निजध्यास ग्रासोग्रासी ॥३॥
अरोग्यता तुका पावला अष्टांगी । मिरविला रंगी निजात्मरंगे ॥४॥
अर्थ :
प्रवृत्ती व निवृत्ती यांचे भाग आटवून चांगले भक्ती रसायन तयार होते व ते कसाला उतरते. प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्ही भागांना ज्ञानरुपी अग्नीवर चांगल्या प्रकारे कढविले केवळ आत्मसाक्षात्कार होण्याकरीता. त्यामुळे उत्तम प्रकारचे ब्रम्हरसरुपी भोजन तयार झाले व अनुभवरुपी मुखाने हे रुचकर ब्रम्हरसाचे भोजन मी अतिशय प्रेमाने सेवन केले. मग ते ब्रम्हरसाचे भोजन मी सेवन करत असताना प्रत्येक घासाघासाला मला आत्मसाक्षात्काराचा अनुभव येऊ लागला व तो आत्मसाक्षात्काराचा अनुभव माझ्या अंगी समरस झाला. तुकाराम महाराज म्हणतात, या ब्रम्हरसाच्या सेवनाने माझे सर्वांग निरोगी झाले मला समाधानाचे आरोग्य लाभले व माझे सर्वांग निजात्म रंगामध्ये रंगून गेले व सर्वत्र मी शोभिवंत दिसू लागलो.
