करिती तया वेवसाव आहे
2259.
करिती तया वेवसाव आहे । येथे व्हा रे साहे एक एका ॥१॥
गाता आइकता समान चि घडे । लाभे लाभ जोडे विशेषता ॥धृपद॥
प्रेमाचे भरते भाते घ्यावे अंगी । नटे टाळी रंगी शूरत्वेंसी ॥२॥
तुका म्हणे बहुजन्मांचे खंडण । होईल हा सीण निवारोनि ॥३॥
अर्थ :
ज्यांना परमार्थरूपी व्यवहार करायचा असेल त्यांनी खुशाल करावे आणि हा व्यवसाय करताना एकमेकांना साह्य करावे. हरी चे गुणगाण ऐकले किंवा गायले तरी पुण्य समानता होते आणि लाभाने लाभ जोडून विशेष फळाची प्राप्ती होते. आपल्या हृदयामध्ये हरीचे प्रेमसुख भरून घ्यावे म्हणजे हृदयाचे भाते हरीच्या प्रेम सुखाने भरून घ्यावे आणि शुर शिपाई जसा रणांगणामध्ये विविध अलंकार चढवून शस्त्र घेऊन तयार होतो त्याप्रमाणे हरिकीर्तनात आपण हरीचे प्रेम, नाम घेऊन रंगात रंगून टाळी वाजवावी. तुकाराम महाराज म्हणतात असे केल्याने तुमच्या अनेक युगाचे जन्ममरण खंडित होईल आणि सर्व शीणभाग निवारून जाईल.
