चिंता नाही गांवी विष
2258.
चिंता नाही गांवी विष्णुदासांचिये । घोष जयजयकार सदा ॥१॥
नारायण घरी साठविले धन । अवघे चि वाण तया पोटी ॥धृपद॥
सवंग सकळा पुरे धणीवरी । सेवावया नारी नर बाळा ॥२॥
तुका म्हणे येणे आनंदी आनंदु । गोविंदे गोविंदु पिकविला ॥३॥
अर्थ :
विष्णुदासांच्या गावाला कोणत्याही प्रकारची चिंता नसते कारण तेथे अखंड हरिनामाचा घोष व जयजयकार चालू असतो. नारायण रूपी धन त्यांच्या घरामध्ये साठवलेले असते त्यामुळे जगातील सर्वच गोष्टी त्यांच्या घरी असतात. विष्णुदासांच्या घरी नर, नारी, बाळ सर्वच नारायणाचे नांव सेवन तृप्ती होईपर्यंत करतात. तुकाराम महाराज म्हणतात या गोविंदाने सर्वत्र स्वतःलाच गोविंद रूपाने विकून टाकले आहे म्हणजे सर्वत्र गोविंदच गोविंद झालेला आहे त्यामुळे सगळीकडे आनंदीआनंद झाला आहे.
