वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

शृंगार करूनि हरिनाम

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074304 · अभंग क्र. ७०१

701.
शृंगार करूनि हरिनाम ।
तांबूल गुरूअंजन लेऊन डोळा ।
भातारू होता तो निःशब्दी ।
खिळिला परतोनी माघारी ठेलिये ॥१॥
काम निदसुरा कामिनी जागे ।
कांही के विपरीत गमे ।
भोग त्याच्या ठायी निशब्दी ।
खिळिला आपआपण्याते रमे ॥२॥
पति पद्मिणीविणे गर्भ संभवला ।
सवेंचि प्रसूत जाली ।
तत्त्वबोध उपजला तेणे गुढी उभाविली ॥३॥
तया पुत्राचेंनि सुखे ।
सर्वहि विसरले देहभाव पडला विसरु ।
बापरखुमादेविवरू विठ्ठली ।
तेथे आणिकाचा नव्हे संचारू गे बाईये ॥४॥

अर्थ :
शमदमादि जी ज्ञानप्राप्तीची साधने त्याचा मी शृंगार केला आहे. व हरिनामाचा तांबूल खाऊन गुरूमंत्राचे अंजन डोळ्यांत घातले आहे. याप्रमाणे थाट करून ती गोपी म्हणते, माझा भ्रतार जो परमात्मा तो शब्दातीत आहे. म्हणून त्याची प्राप्ती न होता ती माघारी फिरली. परंतु त्या कामीनीच्या ठिकाणी त्याच्या प्राप्तीची कामना कायमच होती. अशा वेळेला काय विपरीत प्रकार झाला पहा त्या निःशब्द परमात्म्याचा, ती आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी रमून भोग घेऊ लागली. पति पत्नी संबंधावाचून तिचे ठिकाणी गर्भ उत्पन्न होऊन ती प्रसूतही झाली व तत्त्वबोध उत्पन्न झाला. त्यामुळे तिने आनंदाची गुढी उभारली. त्या पुत्र उत्सवाच्या आनंदाने देहभावाचाही विसर पडून गेला. अशा प्रकारचा रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या ठिकाणी इतर कोठल्याही साधनांचा उपयोग नाही. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग