वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 134. रुक्मिणीस्वयंवर हळदुली - अभंग ३४८७

रुक्मिणीस्वयंवर हळदु

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086592 · अभंग क्र. ३४८७

3487.
रुक्मिणीस्वयंवर हळदुली - अभंग ३४८७

काढिली हळदुली लखलखीत सोज्वळी । जन्म ब्रह्मचळी झाले तिये ॥१॥
अति सूक्ष्म सुरंग शोभिवंत अंग । ज्यासी होय भाग्य त्यासीच लागे ॥२॥
शेष कूर्मासनीं सतशक्तिपासुनी । भूमिका शोधूनि शुध्द केली ॥३॥
तयावरी देख बहुलें सुरेख । देखतांची सुख होय मना ॥४॥
उठिती वधूवरें हळदुली स्वानंदे । लाज मध्ये मध्ये परम प्रीती ॥५॥
नोवरा मेघश्याम बहुलाल पुरुषोत्तम । उटणी या संभ्रम मूळ केले ॥६॥
कृष्णमेचु अलंकार लेवूनि सनागर । बैसली सुंदर वामभागी ॥७॥
वराअंगी भली नोवरी बिंबिली । म्हणती प्रकाशली पुरुषोत्तमें ॥८॥
नोवरी शहाणी आपुला निजगुणी । वश्य चक्रपाणी करुनी ठेली ॥९॥
मुळें पाठविल्या आल्या बारा सोळा । करवली वेल्हाळा उन्मनी चाले ॥१०॥
पदोपदीं त्याग करितसे आनेग । वराचें ते अंग टाकूनि आली ॥११॥
आणिक नवजणी आल्या व-हाडिणी । जयाच्या वचनी वरु वर्ते ॥१२॥
त्या हितगुजाचिया वरा निजाचिया । सदा यशाचिया काय समीप असती ॥१३॥
सकलांमाजीं वृध्द शांति पै प्रबुध्द । ते म्हणे हा विध ऐसा आहे ॥१४॥
सर्व स्वयंवरा कुरवंडी करा । मग पाय धरा उटणीया ॥१५॥
उजळूनियां वाती अक्षता पै देती । भीमकीये म्हणती वेगु करी ॥१६॥
तंव भवया देऊनिया गाठीं न पाहे ते दिठी । सखी म्हणे गोठी कळली मज ॥१७॥
तंव शांति म्हणे सरा सांगेन ते करा । कुरवंडी या वरा ऐसी नोहे ॥१८॥
जया दीपमेळी नाही धूम काजळी । तो दीपु उजळी निरंजना ॥१९॥
ऐकोनि ते बोली भीमकी आनंदली । मनी म्हणे भली साधु होसी ॥२०॥
मनोगत कळे ऐसे संवाद जे मिळे । ते दैव न कळे काय वश्य झाली ॥२१॥
तेज बीज रुप प्रकाश अमुप । चिद्रत्नाचे दीप भीमकी लावी ॥२२॥
ते प्रकाशता प्रभा सूर्या लोपे उभा । कोंदलेसे नभा लखलखीत॥२३॥
तो पाहता प्रकाशु अवघा ह्रषीकेशु । तंव तंव उल्हासु भीमकीयेसी ॥२४॥
त्या प्रकाशावेगळी न निवडे ते बाळी । निजभावें वोवाळी प्राणनाथा ॥२५॥
धन्य तुझे दैव सिध्दी गेले भाव । घेऊनियां नांव पाय मागे ॥२६॥
येरी म्हणे पोटी काय बोलो ओठी । नांवांची हे गोठी नाही यासी ॥२७॥
याच्या नामभेदा नेणवेचि वेदा । नेती म्हणोनि सदा परतला तो ॥२८॥
जेथे रुपाचा दुष्काळू नामाचा विटाळू । उच्चारीचा चळू केवी चळे ॥२९॥
म्हणे कळलें आता गो इंद्रिया नियंता । गोवळा म्हणता दोष नाही ॥३०॥
ऐसे विचारुनि बाळा न्याहाळी चरणकमळा । मग म्हणे गोवळा पाय देसी॥३१॥
तंव पिटली टाळ्या टाळी होसीजे सकळी । भीमकीया रांडोळी भली केली॥३२॥
त्या वचना संतोषला देतुसे पाउला । वर्तती आंतुला खुणा दोघे॥३३॥
कृष्ण बहु काळा उटी वेळोवेळा । उठुनी सोज्वळा करु पाहे॥३४॥
जै कृष्ण अंगी लागे ते मागुते न निघे । मळी लागवेगें निघेल कैंची॥३५॥
मळी काढावयालागीं पाहे नख भागीं । अभिन्नव ते अंगी देखियेलें॥३६॥
सहित रवि चंद्र आणि क्षीरसागर । बिंबसे अरुवार नखामाजीं॥३७॥
शेषाचिया बहुला श्रीकृष्ण नोवरा । उटणे सुंदरा करवी त्या ती॥३८॥
तेथे व-हाडी हे देव बैसलेजी सर्व । अक्रुर उध्दव चवरे ढाळा॥३९॥
देवकन्या व-हाडिणी भोंवल्या सवासिणी । हळदी लावी चरणी क्षीरात्मजा॥४०॥
ऐसे कृष्णनखी देखे एकाएकी । देखता भीमकी मूर्च्छित झाली॥४१॥
तेथे आश्वासित गुरु म्हणे स्थिरु स्थिरु । निर्धारेंसी धरी धिरु बाळे॥४२॥
तंव बाष्प दाटे कंठी कंप जाली गोरटी । उन्मळितां दृष्टी होउनी ठेली॥४३॥
तंव धांविन्नली धाये म्हणे झाले काये । झणे तुज माये दिठी लागे॥४४॥
जे दृष्टी देखिले ते न बोलवे बोले । धायें ते वरिलें संज्ञेनें॥४५॥
कृष्ण ओहणीचें बिरडें फ़ेडी आपुले चाडे । सुभद्रा हे लाडे बोलतीसे॥४६॥
मेहुणे म्हणती जगजेठी जाणे हातवटी । यमुनेच्या तटीं अभ्यासू केला॥४७॥
तंव यादव म्हणती कृष्णा उशीर का येसणा । बिरडिया फ़ेसण पाहू आम्हां॥४८॥
झुंझारा विराचें बिरडें फ़ेडिलें । मग इथें परणीलें राजबाळें॥४९॥
कृष्ण पाहे दृष्टी तंव बिरडें सुटे गांठी । कांचोळी समदृष्टी द्वैताची फ़ेडी॥५०॥
पाहा गे नवल केले डोळांचि उगविले । बिरडें काढिले नयनबळें॥५१॥
कृष्णदृष्टीपुढें फ़िटे संसार बिरडें । मग हे केवढें नवल त्यासी॥५२॥
व्रत तप याग करिता न टिके अंग । परि भाग्य सभाग्य भीमकी्चें॥५३॥
मुखां मुख सन्मुखी बैसविली भीमकी । लाजे अधोमुखी होउनी ठेली॥५४॥
तंव तळी कृष्णमुख देखिले सन्मुख । पाठिमोरी देख होउनी ठेली॥५५॥
मागाहीं ते मूर्ति सन्मुख श्रीपती । म्हणे मी केउती रिघो आतां॥५६॥
वाम सख्य दिशा पडिला कृष्ण ठसा । लाज ह्रषीकेशा माजी नुरे॥५७॥
यापरी गोरटी कृष्णी लाजे भेटी । मग उघडियेली दृष्टी स्वरुप बळें॥५८॥
सुभद्रा म्हणे चांग उटी ईचें आंग । स्वलीला श्रीरंग हळदी घेती॥५९॥
तंव रेवती म्हणे देवा आधी घ्यावें नांवा । हळदुली मग लावा उटी इसी॥६०॥
मज नांव घेता लाज नाही आता । सावधान चित्ता ऐका तुम्ही॥६१॥
नामा हे रुपाची गुणमयी गुणाची । प्रिया हे कोणाची कवण जाणे॥६२॥
माझे येथे लक्ष वधुवरासी साक्ष । पुसा पा प्रत्यक्ष रुक्मिणीसी॥६३॥
ऐकोनी तया नांवा गहिंवरु उध्दवा । तटस्थ यादवा सुरवरांसी॥६४॥
कवण जाणे लीळा आकळ याची कळा । हांसती सकळ व-हाडिणी॥६५॥
यावरी श्रीरंगे हळदी घेऊनि स्वांगे । उटीतु अष्टांगे रुक्मिणीचीं॥६६॥
कृष्णकरयोगें सबाह्य निवों लागे । जाणतील अंगे अनुभवीये॥६७॥
लाभु चरणकमळा जाणे ब्रम्हबाळा । त्याचिया करतळा वैदर्भी भोगी॥६८॥
हा ईशु ब्रम्हादिकी तो सेवक भीमकी । केलासे कवतीकी हळदी मिसें॥६९॥
दासाचाही दासु साचा ह्रषीकेशु । भीमकीया उल्हासु देतु असे॥७०॥
जया जैसा भावो तया तैसा देवो । भक्तीचा निर्वाहो हाचि जाणें॥७१॥
कृष्णचरणावरती सुरंग अक्षता । भीमकीये माथा ठेवी वेगीं॥७२॥
येरी आनंदली रोमांचित जाली । कपाळा पै आली दशा आजी॥७३॥
तंव सखीया देखोन दिठी लाज आली पोटी । तोचि भेदु दृष्टी आशंकेचा॥७४॥
तेणे चुकविले समचरण तत्वता न लगती अक्षता । नमस्कारी माथा भूमि लागे॥७५॥
तंव अभिमानली बाळी धरी अंगुष्ठ करतळी । नमन इये वेळीं चुकों नेदी॥७६॥
मस्तक जंव लोटी तंव पाया पडे फ़ुटी । अभिमानें तुटी चरणकमळा॥७७॥
नमस्कार भले मागुतें अवंगिलें । तंव समचरणीं पाउले दिसो नेदी॥७८॥
अभिमानाचे बळ ते जाली पटळ । नेणे चरणकमळ अंतरले॥७९॥
उश्वासें निश्वासें स्फ़ुंदे ते कामिनी । आसुवें लोचनीं पूर्ण आलीं॥८०॥
मनी ऐसी आस नमीन सावकाश । ते दैव उदास आजी जालें॥८१॥
म्हणे कटकटा धांत्रया विकटा । चरण लल्लाट न भेटती॥८२॥
आजि हे कपाळ जाले हे निर्फ़ळ । कृष्णचरणकमळ नातळती॥८३॥
चंडवातें केळी कांपे चळचळी । त्याहुनी वेगळी भीमकी दिसे॥८४॥
गळती कांकणें अवस्था भूषणे । अवशेष प्राणें मूर्च्छित जाली॥८५॥
देखोनि तो भावो गहिंवरे उध्दव । एकाएकी देव निष्ठुर जाले॥८६॥
भीमकी आनंद मेळी न संडे उकळी । उध्दव ते वोसंडला॥८७॥
नेत्री आनंदजळ वहातसे सोज्वळ । म्हणे धन्य बाळ भीमकाची॥८८॥
धरुनी तिची बाहे म्हणी उठी माये । नमस्कारी पाये या वरिष्ठाचे॥८९॥
सांडिली लाज अभिमान निर्विकल्प मन । मस्तकी श्रीचरण धरुनी ठेली॥९०॥
यापरी कामिनी घाली लोटांगणी । जडली कृष्णचरणी उठवेना॥९१॥
ते अभिनव मुख फ़िटलें जन्मदु:ख । विसरली नि:शेख देहभावा॥९२॥
तेथे सुखे वांकुलिया बोधाच्या गुतकुलीया । उसळती उकलीया आनंदाच्या॥९३॥
अहं सोहं गांठी सुटल्या चरणभेटी । आनंदुची सृष्टी हेलावतु॥९४॥
सेव्य सेवक भावो नाठवे विवाहो । देवी आणि देवो एक जाली॥९५॥
सच्चिद पाउली स्वानंदु तळवटी । जाहली उठाउठी सहजीं निज॥९६॥
तेथे वाच्यवाचक मौन ना जल्पक । म्हणावें ते एक म्हणतें नाहीं॥९७॥
हरी म्हणे वेल्हाळ झणी होय बरळ । करिती कोल्हाळ सोयरे या॥९८॥
उपराटी विकडी देवासी सांकडी । सावध हे किडी केवी होय॥९९॥
त्या सुखाचे अंतरी प्रवेशले हरी । तंव विसरली सुंदरी सावध करुं॥१००॥
दोघा एक सुख लागली टकमक । चेतविते देख कवणा कवण ॥१॥
त्या मुखा वेगळी न निवडे ते बाळी । सुखेसी वेल्हाळी उठविली ॥२॥
त्या देहा जरी येणे तरी देह मी न म्हणे । अवघी कृष्णपणे रचली असे ॥३॥
चराचर दिसे ते मजमाजींच असे । रचले मदांशे ब्रह्मगोळ ॥४॥
ऐसी कृष्ण रुक्मिणी बैसली ऐक्य होउनी । तटस्थ अस्तानी काय सकळीकेसी ॥५॥
तो सोहळा देखोनि एका जनार्दनी । उल्हासु जनी वनी साठवेना ॥६॥
त्या आनंदाचा लोंढा न कळे उदंडा । तेणे सुखे झेंडा नाचतसे ॥७॥
एका जनार्दनी बोलतांची मौनी । हळदुली कैसेनी हाता आली ॥८॥
पितामहाचा पिता सुभानु तत्वता । हळदुली हे कथा येथुनी जाली ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग