काय मागावे कवणासी ।
3297.
काय मागावे कवणासी । ज्यासी मागो तो मजपाशी ॥१॥
जरी मागो पद इंद्राचे । तरी शाश्वत नाही त्याचे ॥धृपद॥
जरी मागो धृवपद । तरी त्यासी येथील छंद ॥२॥
स्वर्गभोग मागो पूर्ण । पुण्य सरल्या मागुती येणे ॥३॥
मागो जरी पद वैकुंठ । ते तव येकदेशी करंटे ॥४॥
आयुष्य मागो चिरंजीव । जीवा मरण नाही स्वभावे ॥५॥
तुका म्हणे एक मागे । एकपणे नाही भंग ॥६॥
अर्थ :
कोणाला काय मागायचे ज्याला मागायचे तोच माझ्याजवळ आहे. इंद्राचे पद मागावे तर त्याचेच पद शाश्वत नाही. जरी धुव्रपद मागावे तरी त्याला येथील म्हणजे त्याच्या बापाच्या मांडीवर बसण्याचा छंद होता नक्की. जर परिपूर्ण भोग जेथे मिळतो तो स्वर्ग मागावा तर पुण्य संपले तर पुन्हा या पृथ्वीलोकात यावे लागते. जर वैकुंठपद मागावे तर ते एकदेशी असून करंटे आहे म्हणजेच भिकारडे आहेत. चिरंजीव पद मागून दीर्घायुष्य मागावे तर त्याला वस्तुत: स्वभावाने मरणच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी काही मागायचे असेल तर हरीशी एकरुपता होणे हेच मागेल कारण त्या एकरुपतेला कोणत्याही प्रकारे भंग नाही.
