आम्हा काही आम्हा काह
3296.
आम्हा काही आम्हा काही । आता नाही या बोले ॥१॥
मोल सांगा मोल सांगा । घेणे तीही गा पुसावे ॥धृपद॥
कैसे घडे कैसे घडे । बडबड तुज मज ॥२॥
मुद्दले साठी मुद्दले साठी । लाभ पोटी त्यामध्ये ॥३॥
तुका म्हणे साठवू घरी । आडल्या काळे पुसती तरी ॥४॥
अर्थ :
आम्हाला थोडा परमार्थ घडावा आम्हाला थोडा देव देव घडावा अशी व्यर्थ बडबड काही लोक करतात परंतू त्यांच्या या व्यर्थ बोलण्याने त्यांना काहीच प्राप्त होत नाही. काही लोक केवळ आम्हाला या देवाची किंमत सांगा किंमत सांगा असे व्यर्थ प्रश्न विचारतात परंतू खरोखर ज्यांना देव हवा आहे त्यांनीच असे प्रश्न विचारावे. काही लोक म्हणतात, परमार्थ कसा घडेल देव देव कसा घडेल परंतू त्यांना एकच उत्तर दयावे ते म्हणजे असे की, अरे तुझ्या अंत:करणात या गोष्टीविषयी जिव्हाळाच नाही त्यामुळे तुझी आणि माझी ही बडबड व्यर्थच आहे. ज्याने भक्तीरुपी मुद्दलाचे जतन करुन ठेवले त्यालाच परमार्थरुपी मालाचा लाभ होतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देवाची भक्ती करुन देवाला आम्ही आमच्या ह्दयामध्ये साठवून ठेवू मग अडल्यावेळी कोणीतरी मला त्याविषयी विचारीलच.
