नामरूपा गोडी ब्रह्मा
127.
नामरूपा गोडी ब्रह्मांडा एवढी । द्वैताची परवडी हारपली ॥१॥
ते रूप सुंदर कॄष्णाचे सकुमार । सेविती निर्मळ भक्तराज ॥२॥
विराटे अनंत ज्या माजि विरते । नव्हेचि पुरते शेषादिका ॥३॥
निवृत्ति लक्ष्मी गरूड चिंतिती । तयांचिये मति आकळ हरि ॥४॥
अर्थ:
त्या परमात्माच्या नामाची व्यापकता येवढी आहे की त्या ठिकाणी सर्व भेद अभेद होतात.अशा त्या सुंदर, सगुण रुपातील श्रीकृष्ण पूजेच्या सेवेचा लाभ भक्त घेतात. त्या रुपात प्रचंडा पासुन सुक्ष्मा सारखी सर्व जगतातील स्वरुपे लय पावतात. ते रुप ज्याच्यावर पहुडले आहे त्या शेषाला ही त्याचे स्वरुप सांगता येत नाही. निवृत्तिनाथ म्हणतात, विष्णुप्रिय निकट असणारे लक्ष्मी व गरुड त्याचे सतत स्मरण करतात.तरी त्यांना ही तो अकळ च राहिला आहे.
