गुणा आला विटेवरी । प
3226.
गुणा आला विटेवरी । पीतांबरधारी सुंदर जो ॥१॥
डोळे कान त्याच्या ठायी । मन पायी राहो हे ॥धृपद॥
निवारोनी जाय माया । ऐसी छाया जयासी ॥२॥
तुका म्हणे समध्यान । हे ते चरण सुकुमार ॥३॥
अर्थ :
निर्गुण निराकार असलेला हरी आज गुणाला आला असून सगुण साकार होऊन विटेवर अवतरला आहे पितांबरधारी हरी अतिशय सुंदर दिसत आहे. अशा या हरीच्या ठिकाणी माझे डोळे कान राहो व त्याच्या पायाच्या ठिकाणी माझे हे मन राहो. या हरीची कृपेची छाया अशी आहे की ती भ्रम उत्पन्न करणारी जी माया आहे तिचेच निवारण करते. तुकाराम महाराज म्हणतात, या हरीचे दोन्हीही चरण विटेवर समान आहेत व या सुकुमार चरणांचे ध्यान करण्यास अगदी योग्य आहे.
