कोणे साक्षीविण । केल
2916.
कोणे साक्षीविण । केले उद्धारा भजन ॥१॥
ऐसे सांगा जी दातारा । माझी भक्ति परंपरा ॥धृपद॥
कोणे नाही केली आळी । ब्रम्हज्ञानाहुनि वेगळी ॥२॥
कोणाचे तो कोड । नाही पुरविला लाड ॥३॥
कोणाच्या उद्धारा । केला विलंब माघारा ॥४॥
तुका म्हणे भिन्न । काहो बोले साक्षीविण ॥५॥
अर्थ :
देवा तुझे भजन केल्याने उध्दार होतो अशी संतांची यापूर्वी साक्ष मिळाली, त्यामुळेच का कोणी तुझे भजन करीत आहे ? देवा माझी कुळ परंपरा भक्तीची आहे त्यानुसारच मी चालत आहे मग याविषयी हे दातारा तुम्हीच अधिक मला सांगावे. देवा ब्रम्हज्ञानावाचून दुसरा काही हट्ट यापूर्वी कोणी केलाच नाही की काय ? आणि देवा यापूर्वी तू कोणाचे लाड कोड कौतुक पुरवले नाही काय ? देवा तुम्ही आजपर्यंत तुमच्या भक्तांचा उध्दार करण्यासाठी केव्हा माघार घेतली आणि केव्हा विलंब केला आहे ते सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, मी जे काही बोलतो आहे देवा ते संतांच्या साक्षेवाचून काही वेगळे भिन्न बोलत आहे काय ?
