हेचि माझे तप हेचि मा
2915.
हेचि माझे तप हेचि माझे दान । हेचि अनुष्ठान नाम तुझे ॥१॥
हेचि माझे तीर्थ हेचि माझे व्रत । सत्य हे सुकृत नाम तुझे ॥धृपद॥
हेचि माझा कर्म हाचि माझा धर्म । हाचि नित्यनेम नाम तुझे ॥२॥
हाचि माझा योग हाचि माझा यज्ञ । हेचि तपध्यान नाम तुझे ॥३॥
हाचि कुळाचार हाचि कुळधर्म । हाचि नित्यनेम नाम तुझे ॥४॥
हा माझा आचार हा माझा विचार । हा माझा निर्धार नाम तुझे ॥५॥
तुका म्हणे दुजे सांगायासि नाही । नामेविण काही धनवित्त ॥६॥
अर्थ :
देवा तुझे नाम घेणे म्हणजे हेच माझ्यासाठी तप हेच दान आणि हेच माझ्यासाठी अनुष्ठान आहे. देवा तुझे नाम हेच माझ्यासाठी तीर्थ हेच माझ्यासाठी व्रत सत्य आणि सुकृत हे देखील तुझे नामच आहे. देवा तुझे नाम म्हणजे माझे कर्म तोच माझा धर्म आणि नित्य नेम देखील हेच आहे. देवा तुझे नाम म्हणजे हाच माझा योग हेच माझे यज्ञ हेच तप आणि ध्यान आहे. देवा हाच माझा कुळाचार, कुळधर्म हाच आणि नित्य नियम देखील हाच आहे की तुझे नाम घ्यावे. देवा तुझे नाम म्हणजे हाच माझा आचार आहे हाच माझा विचार आहे आणि हाच माझा निर्धार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या नामावाचून माझ्याजवळ दुसरे काहीही सांगण्यासारखे धन वित्त नाही.
