योगी परम ध्यानी बैसल
933.
योगी परम ध्यानी बैसलिया जाणा | कांही या रे मना विश्रांति नुपजे ॥१॥
तुजवीण दुसरे कांहीच नाठवे | लागली तुझी सवे विष्णुदासा ॥२॥
कवण कुळी तू जन्मलासी नामा | केशव परमात्मा तुज जवळी ॥३॥
धेनु वसे वनी वत्स असे घरी | चित्त तयावरी ठेवुनी चरे ॥४॥
ते तया देखोनी संतोषली मनी | तैसा तुझ्या गुणी वोल्हावलो ॥५॥
तीर्थयात्रे जाणे न लगे कांही करणे | ऐकोनी तुझे गाणे सुखरूप ॥६॥
वेडावल्या श्रुतिस्मृति आणि पुराणे | योगियांची ध्याने विसर्जिली ॥७॥
तुझे प्रेम सांडावे आणि मने कोठे जावे | जावोनिया पाहावे काय कोठे ॥८॥
समाधिसोहळा लय लक्ष वैराग्य | आम्हालागी भाग्य आणियेले ॥९॥
ऋषि गणगंधर्व ब्रह्मादिक सर्व | लक्षिताती ठावो अरूपाचा ॥१०॥
तो तुवा आम्हा सन्मुख उभा केला | चरणासी लागला ज्ञानदेव ॥११॥
