धन्यधन्य ज्यास पंढरी
3024.
धन्यधन्य ज्यास पंढरीसी वास । धन्य ते जन्मास प्राणी आले ॥१॥
बहु खाणीमध्ये होत कोणी एक । त्रिगुण कीटक पक्षिराज ॥धृपद॥
उत्तम चांडाळ नर नारी बाळ । अवघेचि सकळ चतुर्भुज ॥२॥
अवघा विठ्ठल तेथे दुजे नाही । भरला अंतर्बाहि सदोदीत ॥३॥
तुका म्हणे तेथे होउनी राहेन । सांडोवा पाषाण पंढरीचा ॥४॥
अर्थ :
ज्यांना पंढरीचा वास घडतो ते धन्य धन्य आहेत आणि जे प्राणी पंढरीतच जन्माला आहेत तेही धन्य आहेत. पंढरीमध्ये कोणीही जन्माला येवो मग ते कीटक असो, पक्षीराज असो, दीन असो, हीन असो, दरिद्री असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो किंवा राजस, तामस, सात्विक यापैकी कोणीही असो ते सर्व धन्यच आहेत. पंढरीमध्ये सर्वत्र एक विठ्ठलच आहे दुसरे तेथे काहीही नाही आतरबाह्य सर्वत्र सर्वकाळ विठ्ठलच तेथे भरलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जसा एखादा दगड टाकून द्यावाना तसा दगड सुध्दा होऊन मी त्या पंढरीत राहीन.
