असंत लक्षण भूतांचा म
3025.
असंत लक्षण भूतांचा मत्सर । मनास निष्ठुर अतिवादी ॥१॥
अंतरीचा रंग उमटे बाहेरी । वोळखियापरी आपेआप ॥धृपद॥
संत ते समय वोळखती वेळ । चतुष्ट निर्मळ चित्त सदा ॥२॥
तुका म्हणे हित उचित अनुचित । मज लागे नित्य विचारावे ॥३॥
अर्थ :
असंतपणाचे लक्षण म्हणजे भूतमात्रांचा मत्सर करणे, मनामध्ये निष्ठूरपणा असणे आणि नेहमी वाद करत राहाणे. त्याच्या अशा या वागण्याने त्याच्या अंतरंगात त्याचा मूळ रंग कोणता आहे ते आपोआपच बाहेर दिसून येतो व तो मनुष्य कसा आहे हे त्याच्या वागण्यावरुनच आपोआप ओळखले जाते. संत कोणाला म्हणावे तर जे वेळप्रसंग ओळखतात, नेहमी संतुष्ट व ज्यांचे चित्त नेहमी निर्मळ आहे त्यांनाच संत म्हणावे. तुकाराम महाराज म्हणतात, मला हित काय आहे, उचित काय आहे, अनुचित काय आहे याचा नित्य म्हणजे नेहमीच विचार करावा लागतो.
