हा गे हाचि आता लाहो
2865.
हा गे हाचि आता लाहो । माझा अहो विठ्ठला ॥१॥
दंडवत दंडवत । वेगळी मात न बोले ॥धृपद॥
वेगळाल्या कोठे भागे । लाग लागे लावावा ॥२॥
तुका म्हणे केल्या जमा । वृत्ति क्षमा भाजूनि ॥३॥
अर्थ :
अहो विठ्ठला आता मला एकच छंद लागला आहे तो म्हणजे, माझ्यासमोरुन कोणीही चालले तरी मी त्याला दंडवत करुन नमस्कार करेन. त्याच्याशी वेगळे काहीही बोलणार नाही. अहो कुठे वेगवेगळया गोष्टींच्या मागे लागत बसावे ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी सर्व वृत्ती क्षमा भाजून अंत:करणात जमा करुन ठेवले आहे त्यामुळे मला कोणाचाही व्देष राग येत नाही.
