वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › २. अयोध्याकाण्ड - अध्याय १८ › १६. श्रीराम, सीता व लक्ष्मण यांचे अयोध्येतून प्रयाण

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088202 · अभंग क्र. १६

16.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

अयोध्याकाण्ड

॥ अध्याय सोळावा ॥
श्रीरामांकडून पिंडदानविधी

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

आघ्राय रामस्तं मूर्घ्नि परिष्वज्य च राघवं ।
अंके भरतमारोप्य पर्यपृच्छत सादरं ॥१॥
क नु तेऽभूत्पिता तात यदरण्यं त्वमागतः ।
नहि त्वं जीवतस्तस्य वनमागतुमर्हासि ॥२॥
किंनु वीर महारण्ये तवागमनकारणं ।
कच्चिदॄशरथो राजा कुशली सत्यसंगरः ॥३॥
तात कच्चिच्च कौसल्या सुमित्रा च प्रजावती ।
सुखिनी किच्चदार्या च देवी नंदती कैकेयी ॥४॥

श्रीराम भरतास अयोध्येचे कुशल विचारतातः

अति प्रीती रघुनंदन । भरत आणि शत्रुघ्न ।
हृदयी धरिले आलिंगोन । सुखसंपन्न तेणे दोनी ॥१॥
हृदया हृदय एक जाले । तेणे सुखाचे भरते आले ।
दुख निःशेष निमाले । सागर भरिले स्वानंदे ॥२॥
परमानंदे तृप्ति गाढी । द्वंद्वदुःखे देशोधडी ।
होत हरिखाचिया कोडी । जोडिला जोडी श्रीराम ॥३॥
मग भरतासी रघुनंदन । मस्तकी करोनि अवघ्राण ।
अंकी बैसवोनि जाण । काय आपण पूसत ॥४॥
तुज राज्याचें अभिषिंचन । न व्हावया काय कारण ।
तेथे पडिले कोण विघ्न । तेंही संपूर्ण मज सांगे ॥५॥
दशरथ आमुचा पिता । सुखी आहे की स्वस्थचित्ता ।
मज वनवासा निघतां । बहु अवस्था तेणे केली ॥६॥
मज निघतां वनस्थळी । तू तेव्हा नव्हतासी जवळी ।
जळावेगळी मासोळी । तैसी तळमळी मजलागी ॥७॥
देखोनि रायाच्या दुःखकोटी । मी निघालों उठाउठी ।
नाही घेतली पुरती भेटी । नाही गोष्टी सांगितली ॥८॥
ऎसा राजा दुःखाभिभूत । तू सांडोनि वना आलासी येथ ।
हे तंव तुझे गा अनुचित । बुद्धिवंत तू नव्हेसी ॥९॥
दुःखित राजा स्वये सांडून । दूरी पंथ अतिक्रमोन ।
तुम्हि का दोघे आलेति जाण । तेंही कारण मज सांगा ॥१०॥
एक एकल्यावेगळे नव्हतां जाण । तुम्ही का दोघीं घेतलें रान ।
का राहीले राज्याभिषिंचन । तेंही कारण मज सांगा ॥११॥
माझी तुझी सखी माता । आहेत की सुखे स्वस्था ।
सुमित्रा जे पतिव्रता । ते सुखरूपता आहे की ॥१२॥
स्वामी वसिष्ठ असता तेथ । तुम्ही का आलेति येथ ।
हा तुमचा निजवृत्तांत । इत्यंभूत मज सांगा ॥१३॥

भरत दिङमूढ झाल्यामुळे शत्रुघ्नाकडून वृत्त निवेदन :

ऎसे पुसतां रघुनंदन । ऎकतां भरता आले रुदन ।
कांही नेदवे प्रतिवचन । मूर्छापन्न तो पडिला ॥१४॥
शत्रुघ्न सांगे दुःखावस्था । आम्ही अयोध्येसी न येता ।
तुज वनवासासी जाता । प्राणांतव्यथा रायासी ॥१५॥
सुमंते आणिला रिता रथ । देखोनि अति दुःखी दशरथ ।
श्रीरामा तुझी वार्ता पुसत पुसत । पडे मूर्छित धरणिये ॥१६॥
श्रीरामी नव्हेचि गोष्टी भेटी । श्रीरामा न देखेचि दृष्टी ।
श्रीराम आठवितां कंठी । पडिला सृष्टी मूर्छित ॥१७॥
मूर्छेमाजि म्हणॆ आपण । श्रीरामा दाखवी का वदन ।
श्रीराम स्मरतां संपूर्ण । स्मरणे प्राण सांडिला ॥१८॥
राम नयनी राम वदनी । राम मनी राम ध्यानीं ।
श्रीराम धरोनि अनुसंधानीं । देह त्यजोनि गेला राव ॥१९॥
तुवा केले वनप्रयाण । आम्ही जवळी नसतां जाण ।
करिता श्रीरमस्मरण । राये प्राण सांडिला ॥२०॥

रामलक्ष्मण, सीता व सर्वांचा शोक :

ऎसे सांगता शत्रुघ्न । दुखे मूर्छित पडिला पूर्ण ।
ऎकोनि पितयाचे मरण । मूर्छापन्न श्रीराम ॥२१॥
दुःखे सीता रुदनपर । दुःखे मूर्छित सौमित्र ।
चवघेही राजाचे राजपुत्र । जाले पात्र अति दुःखा ॥२२॥
पडता श्रीरामाचे अश्रुबिंदु । दशरथासी सुखस्वानंदु ।
श्रीरामासी सुखवबोधु । परमानंदु दशरथा ॥२३॥
श्रीराम सुखरुप स्वतंत्र । करुणारुप उद्धरी पितर ।
दशरथ सुखी गेला साचार । सुखसागर श्रीराम ॥२४॥
श्रीराम जाला सावधान । त्यांसी सांगती भरत शत्रुघ्न ।
आम्ही केले रायाचे विधान । स्नान पिंडदान तू करी ॥२५॥
तुवा करावे शीघ्र स्नान । पिंडदान तिळतर्पण ।
सपिंडी करोनिया जाण । कर्म पूर्ण करावे ॥२६॥
तुझी आवडी रघुनाथा । अत्यंत होती गा दशरथा ।
तुझेनि हातें पिंड देता । सुखरुपता पावेल ॥२७॥
श्रीरामे करिता रुदन । समस्त पितर सनातन ।
अवघे जाले सुखसंपन्न । हे गुह्यज्ञान कळेना ॥२८॥

दशरथाची उत्तक्रिया :

श्रीरामाचे गुह्यज्ञान । नेणती कर्मवादी सज्ञान ।
त्यासी सांगती कर्मविधान । स्नान पिंडदान करी श्रीरामा ॥२९॥
अगाधज्ञानी श्रीरघुपती । कर्मी ब्रह्मनिजप्रतीती ।
कर्मक्रिया जे वेदिक्तीं । ब्रह्मस्थिती प्रतिपाळी ॥३०॥
कर्मीं ब्रह्म ब्रह्मी कर्म । ऎसे बोलती ते मूर्ख परम ।
कर्म तेंच निखिल परब्रह्म । ते जाणे वर्म श्रीराम ॥३१॥
श्रीरामे कर्मीं कर्मगती । श्रीरामे कर्मी ब्रह्मस्थिती ।
श्रीरामे कर्मी नित्यमुक्ती । श्रीराम निश्चिती परब्रह्म ॥३२॥
ऎसा स्वये श्रीराम ब्रह्ममूर्ती । तोहीं स्वधर्म पाळी वेदोक्ती ।
ऎकता दशरथनिधनोक्ती । मंदिकिनीप्रति स्नानार्थ आला ॥३३॥
राम लक्ष्मण सीतेसहित । सर्वे श्तुघ्न आणि भरत ।
दशरथक्षयविधानार्थ । आले समस्त स्नानासी ॥३४॥
वसिष्ठ अत्यंत निजज्ञाता । तेणे कौसल्यासुमित्रादि श्रीरामाच्या माता ।
तेथे आणिल्या समस्ता । दुःखस्नानार्था एकत्‍न ॥३५॥
तिही देखता रघुनाथा । दीर्घ रुदने आक्रंदतां ।
श्रीरामा भेटलिया समस्ता । दुःखाभिभूत अति दुःखी ॥३६॥

कौसल्या वगैरे मातांच्या भेटी :

कौसल्येसी केले नमन । तिणें दिधले दीर्घ आलिंगन ।
अश्रुधारा स्रवती नयन । प्रेम संपूर्ण मातेसी ॥३७॥
सुमित्रेचे चरणी माथा । तितेंहि आलिंगिलें श्रीरघुनाथा ।
तैसीयाचि माता समस्ता । होय वंदित श्रीराम ॥३८॥
कौसल्येसी नमितां लक्ष्मण । तिणें सप्रेम दिधले आलिंगन ।
तुझे केशीं झाडीन चरण । तू संरक्षण करी श्रीरामा ॥३९॥
सांडोनिया निजमातापिता । सांडोनि स्वभोग सुंदर कांता ।
वनी रक्षीसी श्रीरघुनाथा । दासी सर्वथा मी तुझी ॥४०॥
श्रीरामी अर्पिसी स्वादिष्ठ फळे । नित्य मस्तकी वाहसी जळे ।
काष्ठें पुरविसी प्रबळें । दासी केवळ मी तुझी ॥४१॥
लक्ष्मण म्हणे अवो माते । मी तंव तुझे पोसणे येथे ।
मज उद्धरिले श्रीरघुनाथें । पुढती चरणांतें वंदिले ॥४२॥
सौमित्रे वंदिली सुमित्रा । तिणें आलिंगिले निजपुत्रा ।
म्हणे तुवा उद्धरिले उभय पितरां । श्रीरामचंद्रा सेवोनी ॥४३॥
सौमित्रे निजमाता । स्वये वंदिल्या समस्ता ।
कौसल्यें आलिंगिली सीता । पतिव्रता होसी सर्वथा तू माये ॥४४॥
सीतेने घातले लोटांगण । वंदिले सुमित्रेचे चरण ।
तिणें दिधले आलिंगन । आक्रंदे रुदन त्या करिती ॥४५॥
आलिंगिता श्रीरघुनाथा । दुःख विसरल्या निजमाता ।
देखोनि वल्कलें जटा माथा । अति विस्मिता तटस्थ ॥४६॥
देखता श्रीरामाचे मुख । विसरोनियां सकळ दुःख ।
माता पावल्या परम सुख । सुखदायक श्रीराम ॥४७॥
वसिष्ठ म्हणे श्रीरघुनंदना । शीघ्र करोनिया स्नाना ।
द्यावे दशरथासी पिंडदाना । जेष्ठविधान पितृप्रिय ॥४८॥
चवघे बंधु समस्त माता । सवे घेवोनिया सीता ।
श्रीराम झाला स्नान करिता । श्रीदशरथा उद्धरावया ॥४९॥

पिंडदान, गयागदाधरदर्शन :

श्रीरामे करावया पिंडदान । तिळ तांदूळ यव तूर्ण ।
भरतें आणिले आपण । ते रघुनंदन न घेची ॥५०॥
मी नाही सेवीत अन्न । करितो वनफळांचे भक्षण ।
त्या फळांचे पिंडदान । करीन आपण पितरार्थ ॥५१॥
मज वनवासाचें दृढव्रत । अन्न हाती नाही स्पर्शित ।
इंगुदी पुन्नाग अति पवित्र । पिंड पितरार्थ देईन ॥५२॥

स्मृति-यदन्नाः पुरुषा लोके तदन्नास्तस्य देवताः ॥

जे काळी पुरुषासी जे जे अन्न । तेणे करावे देवतायजन ।
तेणेंचि पितरांसी पिंडदान । स्मृतिवचन वेदोक्त ॥५३॥
सौमित्रे इंगुदीफळे मर्दून । सीता दे पिंड वळून ।
श्रीराम करी पिंडदान । कुशास्तरण याम्याग्र ॥५४॥
आणोनियां आरण्य तिळीं । अवघी दिधल्या तिळांजुळी ।
तर्पण करिता कृष्णतिळीं । जाले ते काळी अपूर्व ॥५५॥
आब्रह्मादिभुवन । सर्व ऋषि पितृ मानव ।
ऎसे उच्चारिता राघव । अति अपूर्व तेथे जाले ॥५६॥
पिंड देता श्रीरघुनाथ । गयागदाधर ओढवी हात ।
आब्रह्मादि कुळ समस्त । जाले नित्यतृप्त श्रीरघुनाथें ॥५७॥
तुवा देता तिळोदक । अब्रह्मभुवनींचे लोक ।
तेहि झाले नित्यमुक्त । परम सुख पावले ॥५८॥
ऎसे बोलोनि उत्तर । अदृश्य जाला गदाधर ।
वसिष्ठें केला जयजयकार । तारिले पितर श्रीरामे ॥५९॥
श्रीराम स्वये आत्माराम । त्याचे कर्म ते परब्रह्म ।
तो उच्चारी जयाचे नाम । विश्रामधाम तो पावे ॥६०॥
जपता रामनामोक्ती । चारी पुरुषार्थ पाया लागती ।
चारी मुक्ती आंदण्या येती । एवढी ख्याती नामाची ॥६१॥
श्रीरामाचे वनप्रयाण । करावया दीनोद्धारण ।
एका विनवी जनार्दन । पितृतर्पण सिद्ध जाले ॥६२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकायां
श्रीरामदशरथसपिंडीकरण नाम षोडशोऽध्यायः ॥१६॥
॥ ओंव्या ६२ ॥ श्लोक ४ ॥ एवं ६६ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग