शिखा सूत्र तुझा गुंत
3062.
शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तववरी तू जाण श्रुतिदास ॥१॥
त्याची तुज काही चुकतांचि नीत । होसील पतित नरकवासी ॥धृपद॥
बहु झालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुको नको ॥२॥
शिखा सूत्र याचा तोडी तू संबंध । मग तुज बाध नाहींनाही ॥३॥
तुका म्हणे तरि वर्तूनि निराळा । उमटती कळा ब्रम्हीचिया ॥४॥
अर्थ :
अरे तू जोपर्यंत शेंडी आणि जानवे यांच्यामध्ये गुंतला आहेस तोपर्यंत तू वेदाचा दास आहेस हे तू समजून घ्यावे. मग वेदाने जी धर्मनीती सांगितली आहे त्याप्रमाणे तू जर वागला नाहीस तर तुझ्या वागण्यात काही चूक घडली तर तू पतित होऊन नरकवाशी होशील. अरे तू कितीही मोठा पंडित शहाणा किंवा चतुर झालास तरी देखील शुध्द आचरण करण्यास चुकू नकोस. अरे तू शेंडी आणि जानवे यांचा संबंध तोडून टाक मग तुला कोणत्याही प्रकारची बाधा मुळीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तू संसारात राहून देखील संसारापेक्षा अलिप्त राहा व भक्ती कर मग तुझ्यामध्ये ब्रम्हानुभवाच्या कळा उमटतील.
