तंव पुडलिक पुढारला ।
392.
तंव पुडलिक पुढारला । कर जोडिनिया वदला । म्हणे वेदादिका अबोला । तुझिया स्वरूपाचा ॥१॥
तो तू प्रगट श्रीरंगा । येऊनि आमुच्या लोभा । स्थिर राहूनि चंद्रभागा । भक्तजना तारीसी ॥२॥
नेणो कोण भक्तपण । नेणो तुमचे महीमान । कोणे जन्मी साधन । कोण केले हे नेणवे ॥३॥
नीरे भीवरे संगमी । चंद्रभागेचे उगमी । वेणुनाद परब्रह्मी । गोपाळ गजरे गर्जती ॥४॥
तरी स्वामी दीनदयाळा । महाविष्णु गा गोपाळा । भक्तालागी कृपाळा । तारावया तयासी ॥५॥
माझे करोनिया मीस । वास केला युगे अठ्ठावीस । करूनिया रहीवास । माझे भक्ति लाधलासी ॥६॥
तू नीयंता ईश्वरमूर्ती । सकळा गोसांवी श्रीपती । तुजवांचूनि नेणे मती । दयामूर्ति परब्रह्म ॥७॥
नामा म्हणे पुंडलिके । ऐसे स्तवन केले निके । तंव म्हणितले पुण्य श्लोके । पुरे पुरे करी आता ॥८॥
