प्रेमाचा जिव्हाळा ना
118.
प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखाशी आले ।
सार्थक पै झाले संसाराचे ॥
केशव नाम सार विठ्ठल उच्चार ।
राम निरंतर हृदयी वसे ॥
पाहाता हा भाव लीळा तो विग्रह ।
तेथींचा अनुभव विरळा जाणे ॥
बापरखुमादेविवरू पाहता विस्तारू ।
नामाचा बडिवारू न बोलवे ॥
अर्थ :
ह्रद्यात प्रेम व जिव्हाळा असल्यामुळे माझ्या मुखात नाम आले व त्यामुळे माझ्या संसाराचे सार्थक झाले. केशव व विठ्ठल हे नाम साररुप असल्याने तो श्रीराम माझ्या ह्रदयी निरंतर वास करतो. सगुण रुपाने भक्तासाठी लीला करणारा परमात्मा पाहणारे व अनुभवणारे विरळच आहेत. रखमादेवीचे पती व माझे पिता यांचा विस्तार व त्याच्या नामाचा मोठेपणा वर्णन करता येत नाही असे माऊली सांगतात.
