॥ श्रीएकनाथमहाराजकृत
84.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय चौर्याऐंशींवा ॥
श्रीरामस्वरूपवर्णन -
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
जयजयाजी श्रीजनार्दना । एकानेका परिपूर्णा ।
जनी असोनि अभिन्ना । अलिप्त जगासी ॥१॥
जनी आहेसी तत्वता । म्हणोनि तेथे भाव धरिता ।
ते तुझी माया गा अच्युता । तेथे सर्वथा तू नससी ॥२॥
जेंवी उदकाचा निखळ फेन । तो केन पितो नवचे तहान ।
तेंवी तुजपासून जहाले जन । ते जना जाणी भेटसी ॥३॥
फेन निरसोनि उदक घेणे । जन निरसोनि तूतें देखणे ।
सोनटकाहूनि सोने पहाणें । अन्यथा शिणणे वायांचि ॥४॥
हे अभेददर्शनहातवटी । तूंचि गुरूचे कृपादृष्टीं ।
अवलोकिसी संवसाटी । तै दिठी पैठी तुजमाजी ॥५॥
त्या तुझे स्वरूप चिद्धन । नामरूपे अवतारचिन्ह ।
धरिले त्याचे निजवर्णन । कर्ता जाण तू स्वामी ॥६॥
देव साक्षात् नारायण । ऐसा सांगताही वेदचि जाण ।
तैसे माझेनि वदने जाण । कर्ता जाण तूंचि तू ॥७॥
विनटोनि अहंरावण । राज्याभिषेकविराजमान ।
सिंहासनी रघुनंदन । शोभायमान निजतेजें ॥८॥
सकळा श्रीरामी प्रीति गहन । निजाधिकारे देखिला जाण ।
परिस तयाचे लक्षण । एका जनार्दन वदवित ॥९॥
सनकादिक मुनिवृंद । वसिष्ठादि मुनि प्रसिद्ध ।
नारदादि महासिद्ध । आत्मत्वें शुद्ध जाणितला ॥१०॥
सुष्टीपूर्वी जे सनातन । सृष्टिरूपे विराजमान ।
जेथे सृष्टीसीं लयो जाण । तेंही रघुसंदनस्वरूप ॥११॥
दुःख न रिघे अळुमाळ । जेथे सुखमयचि केवळ ।
उत्पत्तिस्थितिप्रळयकाळ । जेथे सकळ मृगजळत्वें ॥१२॥
जेथे दृश्य द्रष्टा दर्शन । ध्येय ध्याता आणि ध्यान ।
ज्ञेय ज्ञाता निजज्ञान । अभाव पूर्ण त्रिपुटीचा ॥१३॥
जे शुद्ध चैतन्य एकवट । जे अंतर्बाह्म निघोट ।
आदि मध्य आणि शेवट । न कळे स्पष्ट जयाचा ॥१४॥
ते हे श्रीरामाचे रूपडें । सिद्धीं देखिले वाडेंकोडें ।
दृष्टी पाहता जयाकडे । सुखसुरवाडीं बुडाली ॥१५॥
अवलोकिता रघुनंदन । देखणे झाले नयन ।
देखणे देखती देखणे होऊन । देखणे नयन श्रीरामी ॥१६॥
ब्रह्मादि इंद्रप्रमुख । तिही विराटमूर्ति अशेख ।
स्वये देखिला रघुकुळटिळक । ऐका विवेक तयाचा ॥१७॥
भूलोकादि सप्तपाताळ । ते रामाचे चरण कोमल ।
भूवर्लोक जघनयुगुल । सांग सकळ विराजे ॥१८॥
स्वर्लोक ते रामजघन । तेथे विराजे स्वर्गभुवन ।
महर्लोक नाभिस्थान । जाण संपूर्ण रामाचे ॥१९॥
जनलोक हृदय देख । कंठी विराजे तपोलोक ।
श्रीरामाचा मुखमयंक । तेथे सत्यलोक विराजे ॥२०॥
असो किती सांगों भिन्न भिन्न । ॐतत्सत् ऐसे वचन ।
ते सर्वात्मक रघुनंदन । अनवच्छिन्न एकत्वे ॥२१॥
जेंवी सूत्री मणिगण । ओतप्रोत संपूर्ण ।
तेंवी चराचरी रघुनंदन । विबुधी जाण देखिला ॥२२॥
कौसल्यादि माता समस्तीं । जन्मकाळी चैतन्यमूर्ती ।
पूर्वी जैसी देखिली होती । त्याच स्थितीं देखिली ॥२३॥
चैतन्यघन अतिलावण्य । पाहोनि मदनमोहन ।
जानकी झाली लजायमान । रघुनंदन देखती ॥२४॥
भरत श्रीरामाचा भक्त । विरक्त आणि अनुरक्त ।
नित्यानुवर्त प्रेमयुक्त । कैसा रघुनाथ देखिला तेणे ॥२५॥
भरत देखणा विचक्षण । श्रीरामाचे देखणेपण ।
सर्वस्वेंसी आकळून । देखणेन देखणे श्रीराम ॥२६॥
स्वप्रकाशे स्वलीला । दिव्य तेजाचा उमाळा ।
निजतेजीं अति सोज्ज्वळा । भरतें डोळा देखिला ॥२७॥
तेणे निजतेजें विलासे । मीतूंपणाचा ठाव पुसे ।
जग आत्मत्वें प्रकाशे । अति उल्लासे निजानंदें ॥२८॥
ज्या तेजानेचि निधरि । अहंसोहं समूळ विरे ।
ब्रह्मत्वे त्रैलोक्या अवतरे । सर्वांगी भरे स्वानंदकंद ॥२९॥
ज्या तेजाचेनि निजनिष्ठें । विषयांचे विषयत्व आटे ।
बंधमोक्षांचें बिरडे फिटे । स्वसुखे कोंदाटे आब्रह्म मुवन ॥३०॥
ज्या तेजाचिये दीप्ती । रवि चंद्र स्वये हरपती ।
जेणे प्रकाशें ब्रह्मस्फूर्ती । निर्विषयस्थितीं सूख कोंदे ॥३१॥
ऐसे स्वाभाविक सहज । तेजाचे जे निजतेज ।
त्याची चिन्मूर्ति पै द्विभुज । भक्तराज देखे भरत ॥३२॥
श्रीरामाची निजस्थिती । चिन्मात्रैकचैतन्यमूर्ती ।
अव्यक्त आला व्यक्ती । भक्तभावाथीं साकार ॥३३॥
ऐसा श्रीराम स्वभावेंसीं । आला साकार दशेसी ।
सगुण मूर्ति भासे कैसी । चिद्विलासी श्रीराम ॥३४॥
जन्मला कौसल्येच्या उदरी । ऐसी लोकवंदतीची परी ।
त्या श्रीरामाच्या उदरी । भरत निर्धारी विश्व देखे ॥३५॥
श्रीरामाचे पूर्णपण । भक्त जाणती अकिंचन ।
जे भावोर्थे परिपूर्ण । ते स्वरूप जाण जाणती ॥३६॥
श्रीरामाची निजमूर्ती । वर्णिता मौनावल्या श्रुती ।
शास्त्रें थोटावलीं थाती । राम शब्दार्थी अर्थवेना ॥३७॥
चाटु नाना रस मधुर वाढी । तो चाटू चाखता न लभे गोडी ।
तेंवी सांडोनि शब्दार्थ ओढी । पहावी निर्वडी! श्रीराममूति ॥३८॥
आकाश बांधतां मोटेंसी । चौपालवी ये बांधे त्यासी ।
शब्दे वर्णिता श्रीरामासी । वैखरीसी दशा तैसी ॥३९॥
राम सगुण तोचि निर्गुण । राम परमात्मा परिपूर्ण ।
चिन्मात्रैक चैतन्यघन । विश्वविश्राम जाण श्रीराम ॥४०॥
त्या श्रीरामाचे वर्णन । वर्णावया मी अति दीन ।
कृपाकु एका जनार्दन । अर्थवी कथन यथार्थ ॥४ १ ॥
धन्य भाग्य त्या भरताचे । स्वरूप देखत त्या रामाचे ।
श्रुतिशास्त्रांगुह्य ज्याचे । भरत त्याचे चिन्ह लक्षी ॥४२॥
राम सर्वांगी निर्मळ । ते निर्मळी बिंबले नभ सुनीळ ।
यालागी श्यामता सुनीळ । भासे निर्मळ श्रीरामासी ॥४३॥
राम श्यामता मेघश्याम । त्या श्यामता गर्जवी आब्रह्म ।
यालागी राम मेघश्याम । बोलती परम श्रुतिशास्त्रे ॥४४॥
राम निर्मळ परात्पर परम । हेंचि श्रुतिशास्त्रां न कळे वर्म ।
अंगी बिंबलें देखोनि व्योम । मेघश्याम राम म्हणती ॥४५॥
यापरी स्वये श्रीराम । शोभा शोभवी मेघश्याम ।
त्याच्या पदीचा पदाक्रम । त्रिविक्रम आक्रमे ॥१४६॥
सहस्त्र जिव्हा शेषासी । तेणे बळे निजावेशीं ।
प्रवर्तला चरणवर्णनासी । शीक त्यासी लागली ॥४७॥
वर्णिता अचिंत्याच्या रूपासी । जिव्हा चिरली क्षणार्धेर्सी ।
लाजां दडाला शेजेसीं । श्रीरामचरणासी न वर्णवे ॥४८॥
त्या श्रीरामाचे श्रीचरण । वर्णावया कैंचें वदन ।
साधु कृपाकु दीन जन । त्यांचे अवधान बोलवित ॥४६॥
चरणांतळीं शोभा आरक्त । बाळादित्यातें लाजवित ।
क्षणे जगाते भुलवित । ते चरणी निश्चित भुलली रमा ॥५०॥
सुरासुरा अतर्क्य माया । जे श्रुतिशास्त्रीं न ये आया ।
ते रमा माया लवलाह्मा । श्रीरामपायां भुलली ॥५१॥
लक्ष्मीचें चपळ लक्षण । नित्य चित्त भोगायतन ।
चरणी सुख अत्यंत गहन । रमेसी मोहन नवल नव्हे ॥५२॥
सनकादिकां अति विरक्ती । देहसंग न धरिती हाती ।
तेही भुलले अत्यंत प्रीती । क्षणही न विसंबती श्रीरामचरणा ॥५३॥
सनकादिक महासज्जन । भ्रमर होवानियां जाण ।
चरणकमलीं आमोदसेवन । अहर्निशी जाण करिताती ॥५४॥
चरणींचिया सामुद्रिका । न वर्णवे वेदा शेषा ।
ध्यजवजांकुश ऊर्ध्व रेखा । पद्य देखा यवांकित ॥५५॥
तया चिन्हांचे महिमान । श्रोते परिसोत सावधान ।
अलक्ष्य तयांचे लक्षण । कांही सांगेन संक्षेपे ॥५६॥
चहू मुक्ती देवोनि लाज । चरणी शोभे भक्तीचा ध्यज ।
वज्रें निर्दळी कर्मबीज । स्मरणाचा सहज नित्यांकुश ॥५७॥
शोधितसत्वाचेनि आक्रमे । युग्मचरणीं तळपती पद्यें ।
पादतळें अनुरागप्रेमें । त्या शोभा कुंकुमें लाजिजे ॥५८॥
तळी आरक्त श्यामता देख । जेंवी नभीं इंद्रधनुष्य ।
शोभा शोभवी अलौकिक । रघकुळटिळकनिजचरणीं ॥५९॥
क्षयरोगें नित्य पीडिला । त्या श्रीरामचरणा शरण आला ।
नखचंद्रीं जडोनि ठेला । अक्षयी झाला चंद्रमा ॥६०॥
नखचंद्रींचे जे चंद्रकर । सनक सनंदन सनक्तमार ।
भक्त होवोनि सत्वर । नित्य चरणामृतसार सेविती ॥६१॥
नखी भेदलें आवरणजीवन । गंगेचे ते जन्मस्थान ।
त्रिपथगामी हे अभिधान । विश्व पावन जियेचेनि ॥६२॥
त्रिगुण जडजाड्या उबगले । श्रीरामचरणा शरण आले ।
त्रिकोणघोटी होवोनि ठेले । चरणी मुकले जीवभावा ॥६३॥
जैसे शुद्ध उपासनायंत्र । तैसी घोटी त्रिकोणसुंदर ।
कळाविया अति मनोहर । चित्कळा सार भासती ॥६४॥
श्रुति आणि स्मृती । दोही बाही वांकी वाजती ।
अंदुवा जाण निश्चिती । उपवेदस्थितिविभागें ॥६५॥
भक्ताची ते जीवनकळा । साधकाचा निजजिव्हाळा ।
तोडराचा नाद आगळा । प्रळयघंगाळ नाम ज्याचे ॥६६॥
वेदान्त शुद्ध शास्त्र । चरणी गर्जती तोडर ।
धन्य धन्य दैत्यांचे शरीर । तोडर निरंतर रुळती चरणी ॥६७॥
तोडरांची नादशैली । ऐकता कळिकाळ कापे चळीं ।
पोटरियांची नव्हाळी । अति कोंवळी सुकुमार ॥६८॥
यंत्रपीठीं वर्ण प्रबळ । तेंवी पोटरिया सरळ ।
अक्षररसें त्या मांसळ । अति निर्मळ निजतेजे ॥६९॥
जानुचक्र अति वर्तुळ । जैसे आरिसे निजनिर्मळ ।
निजात्मतेजें स्वरूप तत्काळ । तेथे सकळ आभासे ॥७०॥
अथवा आणिक एक भावो । मज गमताहे पहाहो ।
ऐका तेथींचा नवलावो । अभिप्रावो तो ऐसा ॥७१॥
चक्र शिणले कंदन करिता । ते शरण आले रघुनाथा ।
जानुचक्रीं जडोनि जाता । वंद्य तत्वता सुरसिद्धा ॥७२॥
श्रीरामजानुचक्र देखता । काळचक्र वंदी हरिभक्ता ।
रामचरणांची सामर्थ्यता । श्रुतिशास्त्रां न वर्णवे ॥७३॥
लागता श्रीरामचरणी । शिळा उद्धरली तत्क्षणी ।
सद्भावे सेविता अनुदिनी । लागती चरणी कळिकाळ ॥७४॥
श्रीरामाचा चरणमहिमा । शास्त्रा न करवे सीमा ।
श्रुति पावल्या उपरमा । त्या श्रीरामा केंवी वर्णवे ॥७५॥
ऊर मृदु सरळशोभा । तेणे लाजविले कर्दळीस्तंभा ।
तिच्या पोटी वक्रगाभा । अवक्र शोभा रामांकीं ॥७६॥
गगनाहूनि अति सुकुमार । श्रीराममांडिया अरुवार ।
लागलिया खुपती चंद्रकर । सुकुमारा सुकुमार श्रीरामचंद्र ॥७७॥
जगाचे गुह्य श्रीरघुनाथ । पावावया तयाचा गुह्यार्थ ।
इतरां कैचें सामर्थ्य । भावार्थे सेवीत जानकी ॥७८॥
त्यजोनि वासनावासासी । जे निर्बुजले लोकलाजेसी ।
ते पावती श्रीरामगुह्यासी । अहर्निशी सुखरूप ॥७९॥
स्वये अच्छिद्रत्वें मनोहर । आणि पुढिलाचे आच्छादी छिद्र ।
तोचि कांसे पीतांबर । तेज दुर्धर देदीष्य ॥८०॥
उदयअर्स्ते विजु शिणली । ते श्रीरामा शरण आली ।
पीतांबरत्वे कांसे जडली । त्यजोनि वहिली उदयास्त ॥८१॥
कांस कसिली सुरेख । पालवीं२ मुक्तलग देख ।
लागता कांसे एकाएक । भवभय देख होय वाव ॥८२॥
श्रीराम सांपडे सगळा । ते भक्तिभावार्थमेखळा ।
मध्ये शोभे घननीळा । अलोकिक कळा तेजाची ॥८३॥
किंकिणी आणि ज्वाळमाळा । भद्धि सिद्धि झाल्या सकळा ।
क्षुद्रघंटिकाचा मेळा । सद्विद्या तत्काळ पै होती ॥८४॥
अति सूक्ष्म मध्य साना । होता अभिमान पंचानना ।
देखोनी राममध्यरचना । लाजा राना तो गेला ॥८५॥
सावकाश श्रीरामासी । पाहावयां अवस्था पंचाननासी ।
येवोनि जडले रामकांसेसी । मित्रत्वेंसीं मेखळे ॥८६॥
लागता श्रीरामकांसेसी । विसरले गमनागमनासी ।
श्रीरामाची ख्याति ऐसी । कांसे लागी त्यासी उद्वार ॥८७॥
निजभक्तांच्या आर्तीच्या ठायी । अखंड रामासी रमणे पाही ।
आर्तीवेगळें सर्वथा कांही । जाणे नाही श्रीरामा ॥८८॥
आर्ती सर्वेद्रियांचा अर्थ । भक्त श्रीरामी अर्पित ।
श्रीराम एकपत्नीव्रत । आर्ती रमत स्वधर्म ॥८९॥
म्हणोनि भक्तांसी निश्चित । प्राप्त श्रीरामगुह्यार्थ ।
आर्तीवेगळा रघुनाथ । नव्हे प्राप्त सुरसिद्धा ॥९०॥
लेखणी चुकी पडली मोठी । सांडोनि श्रीरामगोष्टी ।
पीतांबरीं बैसली दृष्टी । संती कृपादृष्टीं सहावे ॥९१॥
सखोल श्रीरामाची नाभि जाण । ब्रह्मा सहस्राब्द बुडता आपण ।
ठाव व लागे अणुप्रमाण । झाला खेदक्षीण निजमनी ॥९२॥
तेणे कृपा आली रघुनाथा । देवोनि नाभिकारता ।
नाभिकमळीं राखिला धाता । लोककर्ता करोनिया ॥९३॥
उपदेशिलें गुह्यज्ञान । ऐका तयाचे लक्षण ।
सकळ लोक स्रजितां पूर्ण । न ये कर्माभिमान सर्वथा ॥९४॥
उदरी त्रैलोक्य सांठोवा । विश्रांति या सकळ जीवा ।
जेंवी मातुकांचा सांठोवा । दिसे अवघा प्रणवोदरीं ॥९५॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञाननव्हाळी । हेचि उदरी त्रिवळी ।
सत्कर्म रेखिल्या रोमावळी । हृदयकमळीं शोभती ॥९६॥
श्रीरामाचे हृदयावकाशी । आकाश लोपलें स्वकार्येंसीं ।
घनानंद निरवकाशीं । सज्जनांसी विश्रांति ॥९७॥
निवांत समाधीचें सुख । तैसे श्रीरामहृदयीं पदक ।
संत माणकुळी सुरेख । अलौकिक झळकती ॥९८॥
सत्कोंदणे अलौकिकी । संत चिद्रत्ने जडलीं पदकीं ।
कौस्तुभाची शोभा निकी । लोकालोकी दुर्लभ ॥९९॥
उदयअस्ते सूर्य शिणला । तो श्रीरामा शरण आला ।
कौस्तुभ होवोनि कंठी जडला । मुक्त झाला त्रिविध तापा ॥१००॥
अनन्यगतीच्या सद्वृत्ती । तेचि रामी वैजयंती ।
सुमनमनाच्या निजवृत्ती । माळा शोभती समिश्रतुळसी ॥१०१॥
श्रीरामाचा कंबुकंठ । वेदाचें ते मूळ पीठ ।
स्वरवर्णांची ते वाहती वाट । तेथोनि प्रकट त्रिकांडी ॥१०२॥
मुख्यत्वे श्रीराम अबाहु । तेथेंचि शोभती आजानुबाहू ।
बाईंचा पराक्रम बहु । द्वैताचा ठाऊ उरो नेदी ॥१०३॥
अहंरावण महाबळी । त्याची केली रांगोळी ।
वैर नाही जगतीतळी । आयुधे ठेविली यालागी ॥१०४॥
श्रीरामाचे शुद्ध ज्ञान । निहृदयीं असे संपूर्ण ।
तेथे न होवोनि निमग्र । वृथा अज्ञान भ्रममाती ॥१०५॥
निरसोनि बाह्य साधन । हृदयी घ्यावया समाधान ।
ज्ञानमुद्रा दावी आपण । दक्षिण हस्ते श्रीराम ॥१०६॥
आपुली माया आपुल्यावरी । अलिप्तपणे धरी हरी ।
राम पाहतो निर्धारी । बाधा न करी हरिमाया ॥१०७॥
ऐसे करावया निर्धारी । निजमाया निजकरीं ।
वामांकी जानकी सुंदरी । दक्षिणकरीं धरियेली ॥१०८॥
शुद्ध चैतन्याचे सुघटे । अहं सोहं निःशेष आटे ।
श्रीरामाचे बाहुवटे । कीर्तिमुख चोखटे उपनिषदे ॥१०९॥
वीर्यधैर्या धैर्य जेणे । श्रीरामाची वीरकंकणें ।
करी बाणलीं पूर्णपणे । लेणया लेणें श्रीराम ॥११०॥
श्रीराममुद्रा बाणलिया हाती । तो वंद्य होय त्रिजगती ।
कळिकाळ पाया लागती । चारी मुक्ती आंदण्या ॥१११॥
ऐशा दशांगुळी दशमुद्रा । करी प्रतिपाळी दशावतारा ।
हस्तीं धरिली सीता सुंदरा । दशशिरा निर्दाळूनी ॥११२॥
गाळींव आनंदाची मूस देख । की सोलींव सुखाचेंही सुख ।
ते श्रीरामाचे श्रीमुख । नित्य निर्दोष देखिजे ॥११३॥
श्रीरामाचा मुखमयंक । पूर्णत्वे नित्य निष्कलंक ।
देखोनिया शशांक । लाजा अधोमुख तो झाला ॥११४॥
पक्षीं वाढे पक्षीं मोडे । हे चंद्रासी दुःख गाढे ।
तेणे दुःखे अंगुष्टीं जडे । जग पायी पडे नखचंद्रीं ॥११५॥
जडतो श्रीरामअंगुष्टीं । चंद्रासी झाली पुष्टितुष्टी ।
रामचरणी सुखाच्या कोटी । देखता दृष्टी आल्हाद ॥११६॥
करिता राममुखावलोकन । निःशेष द्वंद्वदुःखा बोळवण ।
परानंदहप्ति गहन । हरिखें पूर्ण कोंदाटे ॥११७॥
अकार उकार मकारस्थितीं । ॐकारीं कर्म निष्कर्मप्राप्तीं ।
तैशा मुखी दोभागी दंतपंक्ती । चतुर्वेदस्थिती चौक मिरवे ॥११८॥
जगाचा आधार ते अधर । श्रीरामअधरें ते सधर ।
परमामृतासी निजमाहेर । निजजिव्हार सीतेचे ॥११९॥
श्रीरामाची हनुवटी । देखता सुख वोसंडे सृष्टी ।
धन्य देखत्याची दृष्टी । ते जाणे हातवटी हनुमंत ॥१२०॥
देखोनि गंडस्थळांची प्रभा । लाजा सूर्य लोपला उभा ।
तेथे उदय अस्तांची वालभा । उदय स्वयंभ गंडस्थळी ॥१२१॥
श्रवणीं कुंडले मकराकार । हा लौकिक बाह्यविचार ।
ती आकारीं शुद्ध निर्विकार । श्रवणें विकार निर्दाळिती ॥१२२॥
नवल शोभा त्या श्रवणासीं । नित्य मिळणी निजात्मअंशी ।
श्रवणें देखणे देखण्यासी । अंशाअंशीं समरसे ॥१२३॥
निःशेष निरसोनि नास्तिक । अवक्र जे का आस्तिक ।
निरपेक्ष शुद्ध चोख । तेंचि नासिक राममुखी ॥१२४॥
अल्प अपेक्षा धरिता देख । साधन तितुके निर्नासिक ।
नकटा झाला तो साधक । राम सन्मुख भेटेना ॥१२५॥
चळता जितुका वायु जाण । तो श्रीरामाचा मुख्य प्राण ।
श्रीरामाच्या प्राणें जाण । जगाचा प्राण जीतसे ॥१२६॥
श्रीरामाचा निजप्राण । तेणे वसंता समाधान ।
सुवासासी निजजीवन । विश्वजीवन श्रीराम ॥१२७॥
चैतन्याचें देखणेपण । श्रीरामनेत्रा आले शरण ।
सबाह्य देखणे होवोनि पूर्ण । आपण आपणा देखत ॥१२८॥
देखता श्रीरामाची दृष्टी । अक्षयानंदे जीव उठी ।
दृश्य द्रष्टा न दिसे त्रिपुटी । हेलावे सृष्टी निजानंदें ॥१२९॥
दीपामागे पडसाई । तैसी डोळ्यामागें भिंवई ।
व्यंकटी सांडोनिया पाही । श्रीरामदेहीं निवटल्या ॥१३०॥
श्रीरामाची भ्रुकुटी । रची ब्रह्मांडाच्या कोटी ।
भ्रूविक्षेप केलिया काळ घोंटी । छेदी गांठी चौदेहां ॥१३१॥
जैसे अधिष्ठान निर्मळ । तैसे श्रीरामाचे विशाळ भाळ ।
सच्चिदानंदपद केवळ । त्रिवळी प्रबळ ललाटी ॥१३२॥
उगाळोनि अहं कठिण । सोहं काढिले शुद्ध चंदन ।
तेंही केले रामार्पण । गंधार्चन रामभाळी ॥१३३॥
प्रेमकुशरसमेळा । टिळक रेखिला पिवळा ।
अनुरागद अक्षतारंग बहळा । श्रीरामनिढळा शोभत ॥१३४॥
मुकुटवर्धनां मुकुटमणी । राम शिरोरत्न राजस्थानीं ।
श्रीरामाचा मुकुट वर्णी । ऐसा त्रिमुवनीं कोणी असेना ॥१३५॥
श्रीराममस्तकावरते । कांही रितें उरले असतें ।
तरी मुकुट वानावया पुरते । अवकाश वाचेतें पै होता ॥१३६॥
श्रीरामाचे स्वरूपवर्णन । करिता चौ वाचां पडिले मौन ।
वेद परतले नेति म्हणोन । तेथे मशक मी कोण वर्णावया ॥१३७॥
ऐसा साकार तोचि निराकार । निराकार तोचि साकार ।
रूपासी आला रघुवीर । भासे चराचर निजतेजें ॥१३८॥
त्या रामाच्या स्वरूपीं देख । तद्रूपचि अलोलिक ।
चिद्रत्नमंडित विराजे सुरेख । श्रीरामअंका आरूढोनि ॥१३९॥
जैसी नाथिलीचि व्योमा । भिन्न भासे नीळिमा ।
तेंवी रामांकी विराजे रमा । नहोनि श्रीरामावेगळी ॥१४०॥
जेंवी स्वाद आणि साकर । दृति आणि कापूर ।
रस आणि जैसे नीर । सीता सुंदर तेवी रामी ॥१४१॥
जेंवी कनक आणि कांती । की प्रभा आणि ज्योति ।
भानु आणि दीप्ती । सीता सती तेंवी रामी ॥१४२॥
राम आत्मा हे आत्यज्योति । राम चैतन्य हे चिच्छक्ती ।
राम पर हे प्रकृती । अभिन्नस्थिती पै दोघे ॥१४३॥
राम सष्टा हे सृष्टिस्थिती । राम कर्ता हे कार्यवृत्ती ।
राम वक्ता हे वचनोक्ती । अर्थप्राप्तिसमवेत ॥१४४॥
ऐसे विचारिता तत्वता । विचार ठाके पै मागुता ।
परा वैखरीसीं वर्णिता । श्रीरामी सर्वथा बुडाला ॥१४५॥
सीता आणि रघुनंदन । स्वरूप एक नामे भिन्न ।
तैसाचि बंधु लक्ष्मण । तदात्मक पूर्ण श्रीरामे ॥१४६॥
जैसा अभिषेक रामासी । राज्योपचार आनंदेंसी ।
तैसाचि केला सौमित्रासी । व्रतविसर्जनेंसीं आल्हादे ॥१४७॥
श्रीरामाचे धनुष्यबाण । स्वये घेवोनि आपण ।
पाठीसी उभा लक्ष्मण । सन्नद्ध जाण सर्वदा ॥१४८॥
कनकदंड छत्रचामर । सहित जानकी सुंदर ।
भद्रीं विराजित रघुवीर । जोडोनि कर सन्मुख ॥१४९॥
राज्याभिषेकी अति मंडित । भद्रीं देखोनि रघुनाथ ।
आनंदभरित पै समस्त । त्रैलोक्यांत उत्साहो ॥१५०॥
ऋषिसंधैस्तदाकाशे देवैश्व समरुद्गणैः ।
स्तूयमानस्य रामस्य शुश्रुवे मधुरध्वनिः ॥१॥
प्रजगुर्देवगंधर्वा ननृतुश्चाप्सरोगणाः ।
अभिषेकं तदर्हस्य रामस्याक्लिष्टकर्मणः ॥२॥
रामराज्याभिषेकामुळे आनंदित होऊन
गंधर्वांचे गायन व स्वर्गातील अप्सरांचे नृत्य :
वेदोक्त मंत्रघोषण । ऋषीश्वरी मांडिलें स्तवन ।
श्रीरामराज्य सुखैकघन । करिती गर्जन जयशब्दीं ॥१५१॥
स्वर्गी आनंदले सुरगण । मिळोनिया सहित मरुद्गण ।
सुरदुंदुभि त्राहाटिल्या पूर्ण । पुष्पवृष्टि जाण तिही केली ॥१५२॥
गंधर्व मिळोनि समग्र । मृदु मंजुळ मधुर स्वर ।
गायन मांडिले परिकर । श्रीरधुवीरनिजराज्यें ॥१५३॥
रंभा मेनका तिलोत्तमा जाण । उर्वशीसहित अप्सरागण ।
श्रीरामराज्ये आनंदमग्न । येवोनि नर्तन मांडिलें ॥१५४॥
श्रीरामाचे अभिषिंचन । पहावया अति प्रीतीकरून ।
मंडळपति राजे जाण । आले त्वरेनें समकाळे ॥१५५॥
नानाविध उपासन । आणोनि पूजिला रघुनंदन ।
घालोनिया लोटांगण । श्रीरामचरण वंदिले ॥१५६॥
विजयकार जयजयकार । ऋषिवरांचे मंत्रस्वर ।
वैष्णवांचा नामोच्चार । झणत्कार दुंदभींचा ॥१५७॥
वानरांचा भुभुःकार । गंधर्वांचा उच्च स्वर ।
अप्सरांचा आलापस्वर । नादें अंबर कोंदले ॥१५८॥
नभ झाले सुखैकघन । दिशा दुमदुमती संपूर्ण ।
नादें कोंदलें त्रिभुवन । सुख संपूर्ण सर्वांसी ॥१५९॥
शून्यत्व सांडोनि गगन । झाले चिदानंदैकघन ।
परमामृताचे रजःकण । वृष्टी रधुनंदननिजसुखें ॥१६०॥
श्रीरामाच्या राज्यसुखें । आकाश वोळले चिदाकाशें ।
वसवूनि सकळांची मानसें । अलिप्त सर्वांसी सर्वदा ॥१६१॥
घटकाश मठाकाश । प्राणिमात्राचें हृदयावकाश ।
वसवूनि सर्वत्र उदास । अलिप्त आकाश श्रीरामे ॥१६२॥
श्रीरामी सुखावला पवन । सर्वांतरीं प्रवेशोनि पूर्ण ।
प्राणवृत्ती करी चळण । आसक्त नव्हे जाण सर्वथा ॥१६३॥
प्राणी परस्परांतील वैरभाव विसरले :
परस्परें प्राणिमात्र । जीवघाते करिती वैर ।
चाळोनि तयांचे अंतर । प्राणी निर्वैर सर्वदा ॥१६४॥
गाईव्याघ्रां सदा वैर । गजसिंहा वैराकार ।
नकुळसर्पांसी खडतर । स्वाभाविक वैर सर्वदा ॥१६५॥
मूषकबिडाळांसी वैर । श्येनबकांसीं वैराकार ।
ऐसे सांगता अपार । सर्वत्र वैर प्राणिमात्रां ॥१६६॥
जीवशिवांचा आहार । येणे सकळा बद्धवैर ।
तितुकीं चाळोनि सर्वत्र । प्राणी निवैर सर्वदा ॥१६७॥
श्रीरामराज्यें वायूसी । निवैरता आली त्यासी ।
मंद शीतळ सुखस्पर्शाशी । बाह्य जगासी निववित ॥१६८॥
श्रीरामराज्यतेजासीं । निर्विकारता बाणली कैसी ।
सांडोनि अहंममतेसी । स्वप्रकाशीं देदीष्य ॥१६९॥
स्नेहसूत्रअधिष्ठान । गृहीं प्रयासे मेळवोन ।
जेणे दीप उजळिला आपण । अमर्याद जाण प्रकाश त्यासी ॥१७०॥
हे प्रयास कांही न करिता । चोर सुखें चोरी करिता ।
त्यासीही प्रकाश आइता । स्वभावता निजतेजें ॥१७१॥
स्वामी यत्न करी निजवित्ता । चोर सिंतरोनि स्वये नेता ।
दीपरूपें साक्षी पाहतो । न म्हणे तत्वता माझे तुझे ॥१७२॥
आणिक श्रीरामराज्यासीं । तेजासीं कळा बाणली कैसी ।
जे जे भेटो येती त्यासी । करी आपणाऐसीं तत्काळ ॥१७३॥
सव्य येवोनि भेटे चंदन । अपसव्यें घुरे आपण ।
दोहींचा वास निरसोनि पूर्ण । देदीध्यमान करी अग्नि ॥१७४॥
श्रीरामराज्यें जीवन । स्वये झाले सुखैकघन ।
सर्वा भूतीं रघुनंदन । निजभजन करितसे ॥१७५॥
भूतां परस्परे वैर । वैर स्वभावतां निरंतर ।
असता आपण निवैर । जीवन करी सर्वांते ॥१७६॥
श्रीरामराज्येकरोनि जाणा । अति संतोष झाला जीवना ।
विसरोनि अधोगमना । सुखस्वादना जग निववी ॥१७७॥
भूमि: सत्यवती चैव फलवंतश्व पादपाः ।
गंधवंति व माल्यानि बुभूवु राघवोत्सवे ॥३॥
धरणीमाता प्रमुदित झाली :
श्रीरामाचे अभिषिंचन । देखता धरा सुखैकघन ।
ऐका त्याचेंही लक्षण । निजलक्षण धरेचें ॥१७८॥
येथोनि हे भोय माझी । तेथोनि ते मर्यादा तुझी ।
सीमाभेदें जुंझती जुंझी । निजपैजीं दिव्य करिती ॥१७९॥
दिव्य उतरोनि सुखी होती । एक असत्य ते दिव्य धरिती ।
तितुके करोनि अभेदस्थिती । धरा वर्तती अखंडर्त्वे ॥१८०॥
विषमत्व सांडोनि चित्ता । संपादी दोहींच्या अर्था ।
माझी माझी म्हणता भूतां । न मोडे अखंडता धरेची ॥१८१॥
हे श्रीरामराज्याचें सुख । धरेसी बाणले आत्यंतिक ।
वनस्पती वोहल्या देख । अलोलिक रसभारें ॥१८२॥
सुवासित पुष्पी सुपक्व फळी । वृक्ष लगडले तत्काळी ।
जीवमात्री सुख सकळीं । रसकछोळीं वोळली मही ॥१८३॥
श्रीरामराज्य ऐसे देख । सकळ सुख अलोलिक ।
भाट गर्जती असंख्य । रघुनायक निजराजा ॥१८४॥
मंत्रस्वर जयजयकार । वानरांचा भुभुःकार ।
माजी नामाचा उच्चार । श्रीरघुवीर निजविजयी ॥१८५॥
नामे प्रायश्चित्ता धाक । यमलोक ओस निःशेख ।
श्रीरामराज्येंकरोनि देख । यमप्रमुख कांपती चळीं ॥१८६॥
एका जनार्दना शरण । श्रीरामाचे अभिषिंचन ।
आणि स्वरूपाचें वर्णन । आपलें आपण संपविलें ॥१८७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
श्रीरामस्वरूपवर्णनं नाम चतुरशीतितमोऽध्याय : ॥८४॥
॥ ओंव्या ॥१८७॥ श्लोक ॥३॥ ॥एवं ॥१९०॥
