॥ श्रीएकनाथमहाराजकृत
87.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय सत्त्याऐंशींवा ॥
हनुमंताचे लीलाचरित्र -
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
श्रीरामांकडून सर्वांचा सन्मान :
ब्रह्मादि लोकपाळांसी । रामे गौरविले सकळांसी ।
पुढे बिभीषण सुग्रीवादिकांसी । राम निजगणांसी पूजित ॥१॥
निजगणांची प्रीति पूर्ण । आवडी त्याचे पूजाविधान ।
स्वये करीत रघुनंदन । ऐका विवंचन तयाचे ॥२॥
देवभक्तांचें प्रेम गहन । त्यांचे पूजेचे विधान ।
वदावयामज कैचे वदन । हीन दीन मतिमंद ॥३॥
तथापि श्रीरामकृपेची ख्याती । वनचर मर्कट हाती ।
धरोनिया अपांपती । बांधिला निश्चिती पाषार्णी ॥४॥
निरायुधें माकडें । ती पाडिती लंकेचे हुडे ।
दशमुख केले वेडें । घेतलें कैवाडें त्रिकूट क्षणे ॥५॥
सागरी दगड तरती । पालेखाईर सुरकार्यार्थी ।
तिही राक्षय नेले भस्मांती । त्रिजगती उत्सावो ॥६॥
तोचि मजलागी कळवळोन । अवतरला एका जनार्दन ।
दुर्लभ जे रामायण । ते सुगम करोन दाविले ॥७॥
अति सूक्ष्म भावार्थ । अति गुह्य जो सिद्धांत ।
करतळामळकवत । कृपान्वित दाविला ॥८॥
बाळकाची अति प्रीती । माउली शीचाशौच न विचारिती ।
प्रेम उचलोनि खांदी घेती । मळ क्षाळिती निजकरीं ॥९॥
परी तेथेंही एक नवल । जननीजनकें धुतले मळ ।
ते पुनरपि होय कश्मळ ।
सजनांचे करकमळ । सबाह्य मळ क्षाळित ॥१०॥
सजनांचा हात माथा । पडता झाली पवित्रता ।
ब्रह्मादिक निजमाथां । वंदिती तत्वता पूज्यत्वें ॥११॥
भावार्थे धरिता सत्संगती । कोण अर्थाची अप्राप्ती ।
सर्वथा मुरे निश्चिती । दृष्टी वोळंगती सकळार्थ ॥१२॥
असो आता कवितार्थ । झणें कोपतील संत ।
सांडोनिया निजकार्यार्थ । स्तुतिवादार्था काय काज ॥१३॥
ऐका स्वामी सावधान । तुम्हांसी न साहे स्तवन ।
तरी माझे लोटांगण । रामकथन अवधारा ॥१४॥
सुग्रीवाचा सत्कार :
सुग्रीव जो का वानरनाथ । बिभीषण लंकानाथ ।
प्रीती बोलावोनि रघुनाथ । पूजा करित निजप्रेमें ॥१५॥
वस्त्रे भूषणे अलंकार । चिद्रत्नांचे मनोहर ।
ब्रह्मदत्त माळा परिकर । बाणली सत्वर बिभीषणा ॥१६॥
येरे घातले लोटांगण । श्रीरामे धरिला आलिंगून ।
आनंद उथळला पूर्ण । रघुनंदननिजकृपा ॥१७॥
तैसीच सुग्रीवाची पूजा । श्रीरामे केली अति वोजा ।
बाप कृपाळू रघुराजा । निजगणफौजा गौरवित ॥१८॥
ब्रह्मयाचा पणतू बिभीषण । ब्रह्मदत्त माळा जाण ।
त्यासी अर्पी रघुनंदन । चतुरानन सुखमय ॥१९॥
सुग्रीव सूर्याचा पुत्र । सूर्यदत्त विचित्र हार ।
स्वये अर्पिता रघुवीर । तेणे दिनकर सुखमय ॥२०॥
अर्करश्मिप्रतीकाशां कांचनीं मणिभूषितामू ।
सुग्रीवाय स्रजं दिव्यां प्रायच्छद्रघुपुंगवः ॥१॥
सूर्यप्रकाशाची घडली । विचित्र रत्नी परिवारिली ।
हेममणींमाजी ओविली । तेणे माळ शोभली अनुपम्य ॥२१॥
वस्त्रे भूषणे परिकर । चिद्रत्ने तेजाकार ।
रामे पूजिला सुग्रीव वीर । सूर्यदत हार देवोनि ॥२२॥
तेणे सुग्रीव शोभला । ब्रह्मादिकांपरीस वहिला ।
श्रीरामे प्रीती आलिंगिला । निमग्र झाला निजानंदीं ॥२३॥
तैसेच इतर वानरवीर । पूजिता झाला रामचंद्र ।
वस्त्रे भूषणे अति परिकर । आश्वासन पै केले ॥२४॥
कंगळटोप राघावळी । रामे लेवविले गोळांगूळी ।
सुरसिद्ध विस्मित सकळी । नावरदळी अति शोभा ॥२५॥
ते पुसाल कोण म्हणोन । तितके सांगों शके कोण ।
संक्षेपे नांवे सांगेन । कृपा करून परिसावे ॥२६॥
ततो द्विविदनीलाभ्यां भूबणानि परंतप; ।
सर्वार्वान्वानरमुख्यांश्व प्रददौ वसुधाथिपः ॥२॥
सर्वे वानरवृद्धाश्व ये चान्ये वानरोत्तमाः ।
वासांसि भूषणैश्चैव यथार्हं प्रतिपूजिताः ॥३॥
सर्व वानरप्रमुखांचा सत्कार :
नळ नीळ जांबवंत । मैंद द्विविद विख्यात ।
सुषेणदधिमुखादि तेथ । वानर समस्त गौरविले ॥२७॥
लहान थोर वृद्ध बाळ । पुरुषार्थी रणशार्दूळ ।
सर्वस्वेंसी रघुकुळपाळ । निजांगें अढळ सेविला ॥२८॥
विचित्र भूषणे विचित्र माळा । विचित्र वस्त्रे विचित्र लीळा ।
रामे पूजिला वानरपाळा । सुरा सकळा देखता ॥२९॥
सर्वस्वेंसी भजलेति माते । तुमचा ऋणी मी निश्चिते ।
काय उत्तीर्ण होऊं मी येथे । कांही वरातें अंगीकारा ॥३०॥
कोणेहि काळी निश्चित । हीन दीन नव्हे चित्त ।
सदा पूर्ण मनोरथ । नित्य तृप्त सर्वदा ॥३१॥
जेथे असती वानरवीर । सुपक्व फळे निर्झरनीर ।
सांद्र पल्लव कोमलांकुर । सुखनिर्भर सर्वदा ॥३२॥
संभाविले पै सकळांसी । अंगद आणि हनुमंतासी ।
राम विसरला मानसी । झणें चित्तासी मानाल ॥३३॥
तया दोघांचें पूजन । अति प्रेमाचें कारण ।
सुखातीत सुख जोडे पूर्ण । समाधान जीवशिवां ॥३४॥
हनुमंत व अंगदाच्या पूजेविषयी श्रीराम सर्व वानरांना प्रश्न करतात :
गौरवोनियां सकळांसी । राम पुसे अति प्रीतीसी ।
कांही उत्कंठा मानसी । सकळांपासीं मागतसे ॥३५॥
अंगद हनुमंत दोघे जण । यांचे करावे पूजन ।
यांच्या उपकारा जाण । ऋणी संपूर्ण आहें मी ॥३६॥
याकारणें या दोघांसी । अंकी बैसवावें अति प्रीतींसी ।
तेणे उत्तीर्ण कांही यांसी । निजमानसीं वांटेल ॥३७॥
तुम्हा सकळांचे आज्ञापन । जरी होईल कृपेंकरून ।
तरी मी ऐसेंचि करीन । सुखसंपन्न जरी तुम्ही ॥३८॥
वानरांकडून हनुमंताची प्रशंसा :
श्रीरामाचे निजवचन । ऐकतांच सकळ जन ।
होवोनियां सुखसंपन्न । लोटांगण घालिती ॥३९॥
हनुमंताचेनि धर्में पूर्ण । आम्हा स्वामी रघुनंदन ।
रामे पावन वानरगण । ख्याति पावन त्रिलोकीं ॥४०॥
वाळीचे भेणे पळता । कोठे नाही विश्रांतता ।
हनुमान भेटोनि रघुनाथा । निर्भयता केली आम्हा ॥४१॥
देवो वाळी दैत्या वाळी । असुरां सुरदानवां वाळी ।
रावण ज्याते कांपे चळीं । तेणे होळी केली त्याची ॥४२॥
क्षणे वधुनियां वाळीसी । दुःख निरसोनि स्त्रीपुत्रांसी ।
भेटविलें ऐक्यतेसीं । निजराज्यासी देवोनी । ४३ ॥
सीताशुद्धीची दुर्घट कथा । समुद्रउल्लंघनाची वार्ता ।
लंका जाळोनि तत्वता । लंकानाथा गांजिलें ॥४४॥
पुत्र प्रधान समग्र । मारोनियां वीरे वीर ।
हनुमान अंगद झुंजार । सीता सुंदर संबोखिली ॥४५॥
सीता शुद्धि पै आणून । अंगद विजयी केला पूर्ण ।
प्रीति मानी रघुनंदन । यासी कारण हनुमंत ॥४६॥
हनुमंते अंगदाची कीर्ती । हनुमंते अंगदाची ख्याती ।
हनुमंते आम्ही रामी सरतीं । बहुत किती अनुवादों ॥४७॥
आम्हांसी स्थिति गति हनुमंते । आम्ही जीवंत वायुसुते ।
पावन वनचरे समस्त । कीर्तिमंतें त्रिलोकीं ॥४८॥
आम्हा गति मति शरण । स्वामी जो का रघुनंदन ।
हनुमंताच्या धर्मे जाण । सद्गुरु जाण हनुमंत ॥४९॥
ज्याचेनि पाविजे रघुपती । ज्याचेनि त्रैलोक्यांत ख्याती ।
त्याचे पूजेचे विषम चिंती । तो आत्मघाती निश्चित ॥५०॥
अंगदाची स्तुती :
अंगद आम्हा निजजीवन । अंगद आम्हा निजप्राण ।
अंगदे सकळिक पावन । आम्ही धन्य अंगदे ॥५१॥
कुळींचा पै भलता कोणी । जरी विनटे रामचरणी ।
पतित पितर यमयातनीं । ते त्याचेनि पै सुटती ॥५२॥
अंगद आवडता श्रीरामी । त्याचेनि पावन सकळ आम्ही ।
त्याची पूजा करिता स्वामी । सुखसुंगमीं संतुष्ट ॥५३॥
सुग्रीवादि सकळ जन । निजहरिखें रघुनंदन ।
विनवितांचि आनंदमग्न । भक्तपूजन करी राम ॥५४॥
हनुमंताचा परम आप्त । भक्त अनुरक्त विख्यात ।
अंगद वीर परम दैवत । बैसवी रघुनाथ दक्षिणांकी ॥५५॥
सीतने रामांची डावी मांडी मारुतीसाठी सोडली,
अंगद मारुती यांना दोन बाजूस बसवून त्यांची पूजा :
ते देखोनि जनकदुहिता । जाणोनि स्वामीच्या मनोगता ।
रामांक सांडोनि सीता । तळी तत्वता उतरली ॥५६॥
बैसावया हनुमंता । ठाव दिधला जनकदुहिता ।
तेणे आनंद रघुनाथा । अंकी तत्वता बैसविला ॥५७॥
दोघे आलिंगोनि प्रीती । अंकी बैसवितां रघुपती ।
आनंदल्या सुरपंक्ती । कपिपती आनंद ॥५८॥
वस्त्रे भूषणे परिकर । चिद्रत्नांचे अलंकार ।
निजहस्ते रघुवीर । दोघे वीर गौरविले ॥५९॥
अंगद हनुमंताचा शिष्य । त्याचे पूजेचा संतोष ।
अतिशये हनुमंतास । हे राघवेश जाणतसे ॥६०॥
रामांनी कुबेराने दिलेली माळ अंगदाच्या गळ्यात घातली :
कुबेरदत्त रत्नमाळा । अतिशर्येसीं सुढाळा ।
अति प्रीती घननीळा । घाली गळा अंगदाच्या ॥६१॥
वैदूर्यमणिसंबद्धे वररत्नपरिष्कृते ।
प्रायच्छद्वालिपुत्राय चांगदायांगदे विभु: ॥४॥
वैडूर्यादि विचित्र रत्ने । मध्ये मध्ये मणिकांचने ।
प्रभा फांकतसे गगनें । सविता तेणे लाजिला ॥६२॥
निजबाहूंचीं वीरकंकणें । प्रीती करोनि रघुनंदने ।
दिधली अंगदाकारणे । शोभे तेणे अनुपम्य ॥६३॥
करी कंकणें बाणली । कंठी माळा पै घातली ।
श्रीरामअंकावरी भली । शोभा आली अंगदा ॥६४॥
तैसीचि हनुम्याची पूजा । रामे केली अति वोजा ।
बाप कृपाळू रघुराजा । भक्त फौजा गौरवित ॥६५॥
ते देखोनि जानकीसी । प्रीती दाटली मानसी ।
पूजावया हनुमंतासी । अति प्रीतीसी विचारी ॥६६॥
रत्नमाळा वायुदत्ता । रामे पूजिली जनकदुहिता ।
तिणें पूजावया हनुमंता । आला इच्छित रामाची ॥६७॥
अवमुच्यात्मनः कंठाद्वारं जनकलंदिनी ।
वानरान्प्रेक्ष्य तान्सर्वान्वान्भर्तारं च पुन: पुन: ॥५॥
तामिंगितज्ञ संप्रेक्ष्य बभाषे जजकात्मजाम् ।
वदस्व सुभगे हारं यस्य तुष्टासि भामिनि ॥६॥
एवमुक्ता तु वैदेही राघवेण महात्मना ।
प्रददौ वायुपुत्राय तं हारमसितेक्षणा ॥७॥
सीतेने रामांच्या अनुज्ञेने तिच्या गळ्यातील हार
मारुतीच्या कंठात घातला. त्यामुळे सर्वांना आनंद :
कंठींचा काढोनि हार । हाती घेवोनि वेगवत्तर ।
चंद्रवदना मृगनेत्र । पाहे वक्त्र रामाचे ॥६८॥
सीता मर्यादेची राशी । उच्छ्रंखळता नाही तिसी ।
सुरवानरसभेसीं । केंवी रामासी पुसावे ॥६९॥
अंतरात्मा रघुनंदन । चिन्ह तियेचे जाणोन ।
निजकृपा कळवळोन । काय आपण बोलत ॥७०॥
हार काढोनियां हाती । तुवा घेतला अति प्रीती ।
कोणावरी तुझी स्नेहस्थिती । त्यासी निश्चिती अर्पावा ॥७१॥
शंका न धरावी मानसी । हार अर्पी आवडे त्यासी ।
ऐकोनि रामाज्ञेंसीं । निजमानसीं हरिखेली ॥७२॥
प्रीती उचलोनियां माळा । घाली हनुमंताचिया गळा ।
तै आनंद सुरा सकळा । घनसांवळा सुखमय ॥७३॥
जानकी अति प्रीतीसी । माळ देता हनुमंतासी ।
आनंद झाला श्रीरामासी । पुष्पवृष्टीसी सुर करिती ॥७४॥
या घटनेमुळे हनुमंत दुःखित :
ते जाणोनि वायुनंदन । झाला अत्यंत उद्विग्न ।
बाह्यपूर्जा ते मज विघ्न । अभिमान जनघातकी ॥७५॥
ऐसे विचारोनिपूर्ण । आदरिले वानरचिन्ह ।
तेणे विस्मित सुरगण । रघुनंदन विस्मित ॥७६॥
ऐसे साधोनि विंदान । वेगे उडाला आपण ।
वृक्षी बैसला वळघोन । मर्कटचिन्ह निजचेष्टा ॥७७॥
मर्कटचेष्टा वाडेंकोडें । डोळे घुलकावी सीतेकडे ।
वाकुल्या दावी सौमित्राकडे । नाचे उडे तडतडा ॥७८॥
मारुतीने माळेंतील एक एक मणी तोडून टाकला :
माळ काढोनि झडकरी । रत्ने तोडित तडकरी ।
वेगे घालोनि मुखाभीतरीं । टाकी दुरी चावोनी ॥७९॥
ते तंव लागे अति कठिण । चावितां नये संपूर्ण ।
आणिक पाहे तोडून । तंव तेही जाण तैसेंचि ॥८०॥
देखोनि हनुमंताचे चिन्ह । आवेशले वानरगण ।
करू आदरिलें त्राण । तंव अश्वगण पै उडती ॥८१॥
डहाळें धरोनि वृक्षांसीं । झोंबू धांवती फळासी ।
घोडी गोविलें वानरांसी । हात फळासी पावेना ॥८२॥
तेणे क्रोध वानरांसी । खांवो न लाहों फळांसी ।
घोडीं गोविले आम्हांसी । धरोनि पुच्छी झुगारिती ॥८३॥
करिता उलटे किराण । अत्यंत तडतडी अंगत्राण ।
मग तोडतोडो जाण । वानरगण टाकिती ॥८४॥
बरे गौरविलें रघुनंदने । गोवोनि सांडिली वानरगणें ।
करू न लाहती किराणे । फळ खाणे अंतरले ॥८५॥
या अंगत्राणा पै हाती । हाली चाली खुंटली गती ।
कायसा कृपाळु रघुपती । वानरपंक्ती खिळलिया ॥८६॥
पायी घोडीं बेडी जोडली । अंगें अंगत्राणें खिळिलीं ।
उड्डाणाची गति खुंटली । भली गौरविली रघुनाथे ॥८७॥
तेणे हांसती सुरगण । वसिष्ठादि ऋषिजन ।
सुमंतादिक प्रधान । अट्टाहास्यें पूर्ण हांसती ॥८८॥
अंगद सुग्रीव बिभीषण । हांसते झाले गदगदोन ।
मुखी पालव धरोन । रघुनंदन हांसत ॥८९॥
जंव जंव सकळही हांसती । तंव तंव वानर अधिकें उडती ।
चेष्टा करीत अपरिमिती । विटाऊं लागती सुरसिद्धा ॥९०॥
पृथ्वीमोलाची रत्ने फोडल्याबद्दल मारुतीला लक्ष्मणाचा प्रश्र :
ते देखोनि अनुचरित । सौमित्र आदरे पूसत ।
सकळा अग्रणी हनुमान भक्त । काय अद्भुत मांडिले ॥९१॥
श्रीरामभजनप्रीतीसी । तुझी दीक्षा सकळांसी ।
राम ऋणी तुझिया भजनासी । उत्तीर्णता त्यासी दिसेना ॥९२॥
यालागी श्री रघुपती । अंकी बैसवोनि अति प्रीती ।
आदरे तुझी पूजा करिती । ते तुझ्या चित्ती मानेना ॥९३॥
एक एक रत्नासी । द्वीपांतरींचें मोल परियेसीं ।
उपायनें श्रीरामासी । अति प्रीतीसी आणिली ॥९४॥
तेणेकरी तुझे पूजन । स्वये करीत रघुनंदन ।
तेंही न माने तुजलागून । हे अंतर गहन कळेना ॥९५॥
अंगीकारोनि वानरवृत्त । स्वये दाविसी अनुचरित ।
रत्ने तोडतोडू टाकित । आणि उपमत द्रुमशिखरीं ॥९६॥
याचा काय अभिप्राय । राउळें सांगावा स्वयमेव ।
पुसतसे बंधु राव । महाबाहो हनुमंत ॥९७॥
ऐकोनि सौमित्रवचन । मर्कटचेष्टा अंगीकारून ।
विटावण दाखवून । बोले वचन ते ऐका ॥९८॥
हनुमंताचे मार्मिक उत्तर :
आम्ही मर्कट वनचरें । अंकी बैसविलें प्रेमे थोरे ।
जेणेंकरोनि पोट भरे । ऐसे आदरे देईल ॥९९॥
ऐसी धरोनि थोर आस । अंकी बैसलो सावकाश ।
तंव ते झाली निराश । अंतर राघवेश जाणेना ॥१००॥
अंतरी तळमळ गहन । बाह्य पूजेचे कार्य कोण ।
अंतर तृप्त न होता पूर्ण । विटंबन बाह्यपूजा ॥१०१॥
चुकवोनिया निजमुखासी । क्षीरलेप देता सर्वांगासी ।
नव्हे सुधानिवारणासी । तळमळ कैसी जाईल ॥१०२॥
अंतरी न विझेचि तळमळ । वरी गोड गाणीं प्रबळ ।
गात्रे जाती विकळ । कृपाकळवळ ते ऐशी ॥१०३॥
टक पडिले सुरसिद्धांसीं । टक पडिले नरवानरांसी ।
अंकी बैसवोनि हनुम्यासी । श्रीराम त्यासी काय देईल ॥१०४॥
तंव गौरविलें रघुनाथे । वरिवरी अंलकारीं बहुते ।
अंतर अवघे तैसेंचि रितें । जेंवी का प्रेते कानड्यांची ॥१०५॥
मांडी घालोनि प्रेतातें । अलंकारिती प्रेमे बहुते ।
तैसेंचि केले रघुनाथे । बाह्य आमुतें पूजोनी ॥१०६॥
श्रीरामाचे कृपादान । दगडाहुनि अति कठिण ।
खातां पडतील दशन । सुधाहरण तेथे कैचे ॥१०७॥
रत्ने सुढाळें दिसती । खातां बहु गोड असती ।
म्हणोनि तोडोनियां प्रीती । मुखाप्रती पातली ॥१०८॥
ज्यांच्यात ’राम’ नाही ती रत्ने मला दगडासारखी आहेत
म्हणून मी ती फोडली असे मारुतीने सांगितले :
फोडोनि पाहिले एकएक । तंव ती अवघी तैसींच देख ।
मग म्या सांडिली निःशेख । मर्कटवेशें साचार ॥१०९॥
रामरत्नमहं वंदे कौसल्याकुक्षिसंभवम् ।
जानलीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम् ॥८॥
तुमची अनर्ध्य रत्ने स्वामी । त्याते दगड मानू आम्ही ।
हे अति उच्छृंखळता दुर्गमी । क्षमा तुम्ही करावी ॥११०॥
ऐकता हनुम्याचे उत्तर । सौमित्र झाला विस्मयपर ।
कांही न देववे प्रत्युत्तर । सकळ सुर तटस्थ ॥१११॥
यक्ष किन्नर गंधर्वगण । सिद्ध चारण मुनिजन ।
ब्रह्मादिक सुरगण । आश्चर्ये पूर्ण हांसती ॥११२॥
इतर वानरांचा हैदोस :
देखोनि हनुम्याची चर्या । सकळ वानरी तेचि क्रिया ।
अश्व सुगारिती पुच्छी धरूनियां । त्राणें तोडोनियां सांडिती ॥११३॥
माळा तोडिती तडतडां । मणि फोडिती कडकडां ।
आवेश आलासे माकडा । उडती झाडां आवेशें ॥११४॥
हाती धरोनिया पुच्छी । अश्व झुगारिती आवेशी ।
भीति नाही कन्हीयासी । शिबिका सुखासनांसी त्यागिती ॥११५॥
एक वानर आनंदातें । कांखे घेवोनि गजाते ।
एक कांखे घेती कन्हीयातें । एक अह्यातें घेवोनि फळे खाती ॥११६॥
सकळ सभा पै हांसत । वसिष्ठ राम आश्चर्य करित ।
समस्त देव पाहत । विपरीतार्थ वानरांचा ॥११७॥
हांसतां मुरकुंडी वळती । एक एकाकडे पाहती ।
ऐसियाची सहजस्थिती । बाप रघुपति कृपाळू ॥११८॥
श्रीरामांची उद्विग्नता :
ते देखोनि रघुनंदन । झाला अति उद्विग्न ।
हनुमंतासी समाधान । उपाय कोण तदर्थी ॥११९॥
संतोषावया वानरा । अंकी बैसविलें आदरा ।
ते न माने याचिया विचारा । रघुवीरा अति चिंता ॥१२०॥
देश दुर्ग देऊं यासी । तेंही न माने हनुमंतासी ।
निःस्पृह सर्वथा मानसी । देशदुर्गासी पे न घे ॥१२१॥
माझ्या अंकावरी पूजन । स्वये न मानी वायुनंदन ।
रत्ने टाकितसे तोडून । माळा जाण विखुरल्या ॥१२२॥
आता यासी उपाय एक । सवे जेवोनि आवश्यक ।
घ्यावे हनुमंताचे शेख । उपाय आणिक दिसेना ॥१२३॥
ऐसा करोनि विचार । कृपापूर्वक रघुवीर ।
बोलावोनि हनुमान वीर । काय उत्तर बोलते ॥१२४॥
श्रीरामांची मारुतीला विनंती :
पवनात्मजा परिस विनंती । तुझी पूजा निजनिश्चतीं ।
स्वये नेणेंचि मी मूढमती । क्षमा ये अर्थी करावी ॥१२५॥
क्षमा करोनि सकळिक । जेणे तुज वाटे सुख ।
तेंचि सांगावे आवश्यक । करणे निःशेख ते मज ॥१२६॥
म्हणोनि वंदोनिया चरण । हृदयी धरिला आलिंगून ।
हृद्गत सांगावे संपूर्ण । करणे जाण तेंचि मज ॥१२७॥
येचविषयीं सर्वथा । आन करणे नाही चित्ता ।
मज आन नाही पढियंता । आण तत्वता पै तुझी ॥१२८॥
तुझी आण वाहिली जाण । हे परमात्म्यावरील प्रमाण ।
अन्यथा न मानावे आपण । आत्मा जाण तू माझा ॥१२९॥
हनुमंताचे उत्तर :
ऐकोनि श्रीरामाचे वचन । हनुमान घाली लोटांगण ।
श्रीरामवचन अप्रमाण । मानी तो पूर्ण आत्मघाती ॥१३०॥
राम अवतारा अवतारु । तोचि जगाचा जगद्गुरु ।
त्याचे वचनी विकल्प थोरु ।धरी तो नरु आत्मघाती ॥१३१॥
गुरुवचनीं विकल्पात्मक । न चुकती त्याचे आकल्प नरक ।
आत्मघाती तो आवश्यक । सुटका देख त्या कैंची ॥१३२॥
आता एक विज्ञापन । जरी दिधले अभयदान ।
तरी जै आम्ही घेऊ मागोन । कृपा करोन ते द्यावे ॥१३३॥
द्वारा याचक आले असता । न व्हावे पराङ्मुख सर्वथा ।
औदार्यें तू अगाध दाता । दीन मागता मी तुझा ॥१३४॥
तू स्वामी अर्थसंपन्न । मी याचक मागता दीन ।
जे मागेन प्रीतीकरोन । ते आपण अर्पावे ॥१३५॥
ऐकोनि हनुमंताचे वचन । श्रीराम झाला सुखैकघन ।
संकट निरसिले हनुमेन । मागेल आपण ते देऊ ॥१३६॥
आम्हांसी होती परम चिंता । काय अर्पावे हनुमंता ।
ते निरसिले तत्वता । झाला मागता स्वयेंचि ॥१३७॥
ऐसे विचारोनि निश्चयेसी । आला केली हनुमंतासी ।
जे जे अपेक्षा मानसी । ते प्रीतीसी मागावें ॥१३८॥
त्याची नैवेद्य-प्रसादाची मागणी :
ऐकोनि श्रीराम वचन । हनुमान झाला आनंदघन ।
दिधले अभय वरदान । तरी ऐक मागेन ते स्वामी ॥१३९॥
असता वनांतरीं । उपवासी फळाहारी ।
पारणाविधीची परी । आम्ही डोळेभरी पहावी ॥१४०॥
पारणाविधीचें शेख । आम्हा पावल्या आवश्यक ।
संभावना सकळिक । एक एक पावली ॥१४१॥
येविषयीं शिष्टांचें । वचन ऐकिलें साचे ।
बळ धरोनिया त्याचे । करू याचनेतें स्वामिया ॥१४२॥
येचविषयींचा श्लोकार्थ । स्वामी ऐका सावचित्त ।
निजप्रेमे कृपायुक्त । ऐका निश्चित कृपानिधी ॥१४३॥
महाप्रसाद इत्युक्त्वा ग्राह्यमंजीलीभिर्बुधेः ।
पादोदकं व निर्माल्य नैवेद्यं च विशेषत: ॥९॥
नैवेद्य प्रसादाचा महिमा :
झालिया पूजाविधान । तीर्थ प्रसाद निर्माल्य जाण ।
स्वामीपासीं प्रार्थन । करोनि आपण मागावे ॥१४४॥
प्राप्त होय नैवेद्यशेख । तरी भाग्य अलोलिक ।
आगमी निर्वचन देख । श्रुति सम्यक् गर्जती ॥१४५॥
निजदासाचा धर्म पूर्ण । शेष मागावें प्रार्थून ।
ते हाता आलिया जाण । सकळ संभावना पावली ॥१४६॥
होते श्रीरामाचे मनी । तेंचि मागितले हनुमेनी ।
एके अन्ययें वर्तती दोनी । देव भक्त होवोनी श्रीराम ॥१४७॥
ते अपूर्व निरूपण । निजभक्तासी आपण ।
निजशेष देवोनि पूर्ण । रघुनंदन सुखावेल ॥१४८॥
एका जनार्दना शरण । निजभक्ताचे प्रेम पूर्ण ।
कृपापूर्वक सावधान । निजनिरूपण परिसावे ॥१४९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
हनुमद्विनोदचरितं नाम सप्ताशीतितमोऽध्यायः ॥८७॥
ओंव्या ॥१४९॥ फ्लोक ॥९॥ एवं १५८ ॥
