वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 266. चिरंजीव पद ३९६५

चिरंजीव पद ३९६५

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085479 · अभंग क्र. ३९६५

3965.
चिरंजीव पद ३९६५

एकनाथ महाराज कृत
ओव्या : ४२
चिरंजीव पद पावावयासी
चिरंजीव पद पावावयासी ।आन उपाय नाही साधकासी।
किंचित बोलू निश्चयेंसीं।कळावयासी साधका ॥१॥
येथे मुख्य पाहिजे अनुताप।त्या अनुतापाचे कैसे रूप।
नित्य मृत्यू जाने समीप।न मानी अल्प देह सुख ॥२॥
म्हणे नरदेह किमिर्थ निर्मिला।तो मी विषय स्वार्थी लाविला।
थिता परमार्थ हातीचा गेला।करी वाहिला विचार हा॥3॥
ऐसा अनुतापनित्य वाहता।तंव वैराग्य ये तयाच्या हाता।
त्या वैराग्याची कथा।ऐक आता सांगेन ॥३॥ ४
ते वैराग्य बहुता परी।आहे गा हे अवधारी।
सात्विक-राजस-तामस त्रिप्रकारी।योगीश्वरी बोलिजे॥५॥
नाही वेदविधी आचार।नेणे सत्कर्म साचार।
कर्म धर्मी भ्रष्टाकार।तो अपवित्र तामस॥६॥
त्याग केला पूज्यते कारणे।सत्संग सोडूनी पूजा घेणे।
शिष्यममता धरोनी राहणे।ते जाणणे राजस॥७॥
हे वैराग्य राजस तामस।ते न मानेच संतास।
तेणे न भेटे कृष्ण परेस।अनर्थास मुळ ते॥८॥
आंता वैराग्य शुध्द सात्विक।जे मी जगद्वंद्द मानी यदुनायक।
ते तु सविस्तर ऐक।मनी निष्टंक बैसावया॥९॥
भोगेच्छा विषयक।ते तो सांडी सकळीक।
प्रारब्धे प्राप्त होता देख।तेथोनी निष्टंक अंग काढी॥१०॥
का जे विषय पांच आहेती।ते आवश्य साधका नाडिती।
म्हणोनी लागो नेदी प्रीती।कवणे रिती ऐक पां॥११॥
जेणे धरिला शुध्द परमार्थ।त्यासी जनमान हा करी अनर्थ।
तेणे वाढे विषय स्वार्थ।ऐक नेमस्त विचार हा॥१२॥
वैराग्य पुरुष देखोनी।त्याची स्तुती करिती जनीं।
ऐक सन्माने करोनि।पुजेलागोनी पै नेती॥१३॥
त्याचे वैराग्य कोमल कंटक।नेट न धरिच निष्टंक।
देखोनी मानस्तुती अलौकिक।भुलला देख पै तेथे॥१४॥
जनस्तुती लागे मधुर।म्हणती उद्धरावया हा हरिचा अवतार।
आम्हीलागी जाहला स्थिर।तेणे तो घरी फार शब्दगोडी॥१५॥
ह्या पांच विषयामाजी प्रथम।शब्द विषय संभ्रम।
मग स्पर्श विषय सुगम।उपक्रम तो ऐसा॥१६॥
नाना मृदू आसने घालिती।विचित्र पर्यंक निद्रेप्रती।
नरनारी शुश्रुषा करिती।तेणे धरी प्रिती स्पर्शाची॥१७॥
रूप विषय कैसा गोंवी।वस्त्रे भूषणे देती बरवी।
तेणे सौंदर्य करी जीवी।देह भावी श्लाघ्यता॥१८॥
रूप ऐसा जडला।रस विषय कैसा झोंबला।
जे जे आवडे तयाला।त्या त्या पदार्थाला अर्पिती॥१९॥
ते रस गोडी करिता।घडी न विसंबे धरी ममता।
मग गंध विषय ओढीता।होय तत्वता त्या कैसा॥२०॥
आवडे सुमन चंदन।बुका केशर विलेपन।
ऐसे पांचही विषय जाण।जडले संपूर्ण सन्माने॥२१॥
मग जे जे जन वंदिती।तेची त्याची निंदा करिती।
परी अनुताप नुपजे चिती।ममता निश्चिंती पूजकांची॥२२॥
म्हणालविविके जो आहे।यासी जनमान करील काये।
हे बोलणे मूर्खाचे पाहे।जया चाड आहे मनाची॥२३॥
ज्ञात्यांसी प्रराब्धगता।मान झाला तरी नेघो म्हणती।
परी तेथेच गुंतोनी न राहती।उदास होती तत्काळ॥२४॥
यापरी साधकाच्या चिता।मानगोडी न संडे सर्वथा।
जरी कृपा उजपेल भगवंता।तरी होय मागुता विरक्त॥२५॥
तो विरक्त कैसा म्हणाल।जो मानले सांडी स्थळ।
संत्सगी राहे निश्र्चीळ।न करी तळमळ मानाची॥26॥
मानीना स्वंतत्र फड।अंगा येईल अंहता आड।
धरुनी जीविकेची चाड।न बोले गोड मनधरणी॥२७॥
नावडे प्रपंची बैसणे।नावडे कोणासी बोलणे।
नावडे योग्यता मिरवणे।बरवे खाणे नावडे॥२८॥
नावडे लैकिक परवडी।नावडती लेणी लुगडी।
नावडे परान्न गोडी।द्रव्य जोडी नावडे॥२९॥
नावडे स्त्रियांत बैसणे।नावडे स्त्रियांते पाहणे।
नावडे स्त्रियांचे रगडणे।त्यांचे बोलणे नावडे॥३०॥
नको नको स्त्रियांचा सांगात।नको नको स्त्रियांचा एकांत।
नको नको स्त्रियांचा परमार्थ।करिती आघात पुरुषासी॥३१॥
म्हणाल गृहस्थ साधके।स्त्री सांडोन जावे के।
येची अर्थी उत्तर निके।ऐक आता सांगेन॥३२॥
तरी स्व-स्त्रीयेवाचुनी।नातळावी अन्य कामिनी।
कोणे स्त्रियेसी संनिधवाणी।आश्रयो झणी न द्यावा॥३३॥
स्वस्त्रीयेसाही कार्यापुरते।बोलावे स्पर्शावे निरुते।
परी आसक्त होऊनिया तेथे।सर्वथा चित्ते नसावे॥३४॥
नरनारी सुश्रुषा करिती।भक्ती ममता उपजविती।
परी शुध्द जो परमार्थी।तो स्त्रियांचे संगती न बैसे॥३५॥
अखंड एकांती बैसणे।प्रमदासंगे न राहणे।
जो निसंग निराभामाने।त्याने बैसणे सर्वदा॥३६॥
कुंटब आहारा करणे।आकल्पिता न मिले तरी कोरान्न करणे।
ऐसे स्थिती जे वर्तने।ते जाणणे शुध्द वैराग्य॥३७॥
ऐसी स्थिती नाही ज्यासी।तव कृष्णप्राप्ती कैची त्यासी।
यालागी कृष्ण भक्तांसी।ऐसी स्थिती असावी॥३८॥
या स्थिती वेगळा जाण।कृष्णी मिळू पाहे तो अज्ञान।
तो सकळ मूर्खाचे अधिष्ठान।लटिके तरी आन देवाची॥३९॥
हे बोल माझिया मतीचे।नव्हती गा साचे।
कृष्णे सांगितले उध्द्व हिताचे। ते मी साचे बोलिलो॥४०॥
साच न मानी ज्याचे मन।तो विकल्पे न पावे श्रीकृष्णचरण।
माझे काय जाईल जाण।मी बोलेन उतराई॥४१॥
साधावया वैराग्यज्ञान।मनुष्य देही करावा प्रयत्न।
सांगे एका जनार्दन।आणिक प्रयत्न असेना॥४२॥
श्री संत एकनाथ महाराज कृत चिरंजीव पद संपूर्णम
चिरंजीव पद समाप्त

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग