नित्यानंदे घोषे करित
1097.
नित्यानंदे घोषे करिता हरीचे कीर्तन ।
श्रोते आणि वक्ते होती परम पावन ॥१॥
आणिकहि लोक तरती त्यांच्या सहवासे ।
भाळया भोळया भाविकासी लाभ अनायासे ॥२॥
जेथे नित्य नामघोष टाळिया गजर ।
तेथे रंगी नृत्य करी रुक्मिणीवर ॥३॥
निळा म्हणे तोचि प्रसन्न होउनी दासासी ।
भुक्ति आणि मुक्ति ठेवी त्यांच्या सहवासी ॥४॥
