॥ श्रीएकनाथमहाराजकृत
70.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय सत्तरावा ॥
कैकेयीला लंकादर्शन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
जानकीसहित श्रीरघुपती । सुखस्वानंदें अयोध्येप्रती ।
राज्य करिता स्वधर्मस्थिती । पापवदंती राज्यीं नाही ॥१॥
देशींचे लोक पुण्यशील । स्वधर्मीं रत द्विज सकळ ।
अग्निहोत्रे करोनिया काळ । श्रीरामनामीं कंठिती ॥२॥
घरोघरी तुळसीवृंदावनें । नित्य करिती हरिकीर्तनें ।
ठायी ठायी होती पुराणे । शास्त्रव्याख्यानें घरोघरी ॥३॥
आणिक जे इतर लोक । तेही नगरी स्वधर्मरक्षक ।
भूतदयासुत दीनपाळक । उपकारीं अत्यंत पुढिलांसी ॥४॥
भरतशत्रुघ्न कैकेयीनंदन । सुमित्रेचा लक्ष्मण ।
श्रीरामसेवे अनुदिन आसक्त । जाण मन त्यांचे ॥५॥
प्रधानवर्ग सकळिक । नगरींचे नगरलोक ।
बंदिजन सर्व सेवक । श्रीरामउपासक अनुदिनी ॥६॥
अष्टदळकमळकळिकेमाझारीं । जनकीसमवेत कनकमृगारी ।
नीळवर्ण छत्र शोभे शिरी । बंधु परिवारी उभे तेथे ॥७॥
ऐसा सुंदर राजीवलोचन । श्यामसुंदर धनुष्यबाण ।
ठाण मांडोनि विराजमान । त्याचे ध्यान करिताती ॥८॥
योगी दिगंबर तापसी । सिद्ध साधक महंत ऋषी ।
आश्रयोनी श्रीरामासी । अयोध्येसी राहिले ॥९॥
ऐसिये अयोध्याभवनीं । दुःख दारिद्र्य न देखिजे स्वप्नीं ।
पाप कैसे ते नेणेती मनी । समाधानी चित्सुखें ॥१०॥
कित्येक काळपर्यंत । राज्य करी श्रीरघुनाथ ।
पुढे कथा वर्तली अद्भूत । सावधानचित्त अवधारा ॥११॥
लंका पहावयाची कैकेयीला इच्छा, विमानातून ती लंकेला निघाली :
कैकेयी म्हणे श्रीरामासी । रावणाची लंका आहे कैसी ।
ते मज सांगावी परियेसीं । समुद्राचा जिसी परिघ असे ॥१२॥
लंका कैसी सुवर्णाची । कैसा त्रिकूट किती उंची ।
लांब रुंद गृहें राक्षसांची । कोणेपरीचीं आहेत कैसीं ॥१३॥
निकुंभिळा शोभायमान । जेथे वसे रावणनंदन ।
जेणे विबुध केले दीन । शचीपति इंद्रपदाहून उतरविला ॥१४॥
सुवेळेसी कैसी रचना । जेथे होतासि रघुनंदना ।
जेथोनि पहाता लंकाभवना । सर्व रचना दिसे स्पष्ट ॥१५॥
कैसे ते संग्रामस्थळ । जेथे रावणादि राक्षस प्रबळ ।
दीर्घ विकटमुखाचे विशाळ । कुंभकर्णादि थोर थोर ॥१६॥
अशोकवनाची रचना । जेथे होती पद्मनयना ।
परिवारित राक्षससेना । त्रिजटा आदिकरोनि ॥१७॥
ते लंका पाहो निजदृष्टीं । ऐसी कैकेयीस उत्कंठा मोठी ।
हे श्रीरामे जाणोनिया पोटी । मातेप्रति बोलता झाला ॥१८॥
अवो जननीये अवधारी । लंका पहावया उत्कंठा थोरी ।
वर्ततसे तुमचे जिव्हारीं । तरी प्रधानासमवेत जाइजे ॥१९॥
पाहोनिया लंकाभवन । शीघ्रवत यावे आपण ।
ऐसे श्रीरामे आज्ञापून । पुष्पकावरी बैसविली ॥२०॥
सवे देवोनि नाना मंत्री । लंके निघाली कैकेयीपुत्री ।
घेतली मंथरा अपवित्री । कलहकारिणी पुनरपि ।
मायेसवें पूर्ण अविद्या । तेंवी कैकेयीपासीं मंथरा कुविद्या ।
जेंवी अधमा आवडे अविद्या । परापवादालागूनी ॥२२॥
तेंवी कैकेयी निजविमानी । पाहे चालली लंका भवनी ।
मार्गी आकाशा पाहे नयनी । दश दिशा अवलोकित ॥२३॥
ऐसे चलत विमान । नाना देश दुर्गे लंघून ।
पुढे देखिले लंकाभवन । कनककळशी विराजित ॥२४॥
देखोनिया लंकाभवना । पारणे झाले कैकेयीनयनां ।
म्हणे धन्य धन्य दशानना । नांदणूक ये ठायी ॥२५॥
प्रसन्न करोनि उमापती । शिरी पूजिला कैलासपती ।
धन्य धन्य रावणाची भक्ती । उपमा त्रिजगती असेना ॥२६॥
धन्य पौलस्तीचें तप । धन्य पौलस्तीचा जप ।
धन्य पौलस्तीचा प्रताप । बंदी सुरवर जयाचे ॥२७॥
धन्य रावणाची संपत्ती । धन्य रावणाची संतती ।
जेणे समरांगणीं शचीपती । जिंतोनि कामारा पै केला ॥२८॥
बिभीषणाला भेटीस येण्यास कळविले; त्याचे आगमन :
ऐसे आश्चर्य करी श्रीराममाता । संज्ञेनें पाठविले दूता ।
मात जाणविली लंकानाथा । दशरथवनिता आलीसे ॥२९॥
भ्रूलतासंज्ञेनें सेवक । प्रवेशले जेथे लंकानायक ।
भोवते राक्षसांचे कटक । रत्नसिंहासनी बिभीषण ॥३०॥
दूतीं बिभीषण कैसा देखिला । जैशा शशी गगनी मिरविला ।
की उत्तानचरणाचा तान्हुला । अढळ पदी शोभतसे ॥३१॥
की पातलिया वसंत । वनश्रीमाजी विराजत ।
श्रीरामाचा शरणागत । सिंहासनी शोभतसे ॥३२॥
की गगनामध्ये दिनकरु । की कुळाचळांमध्यें मेरु ।
की पक्षियांमाजी खगेश्वरु । तैसा लंकेश्वरु राजसांमध्ये ॥३३॥
की तारागणामाजी धुरु । अब्धिमाजी क्षीरसागरु ।
की दैत्यांमाजी कश्यपकुमरु । तैसा नैऋतेश्वरु तयांमाजी ॥३४॥
ऐसा बिभीषण धर्ममूर्ती । दूतीं देखोनि प्रणिपात विनंती ।
कर जोडोनि आदरे स्तुतीं । करिती झाला मुखकमळें ॥३५॥
म्हणे राजाधिराजा लंकापती । अति श्रेष्ठ धर्ममूर्ती ।
कैकेयीने पठविलें तुम्हांप्रती । आशीर्वाद देवोनी ॥३६॥
कैकेयी म्हणाल आहे कोण स्थळीं । तरी प्रधानांसहित नगराचे पाळीं ।
तेणे पाठविले तुम्हांजवळी । बोलवावाया तुम्हांतें ॥३७॥
दूतमुखींचें ऐकोनि वचन । बिभीषणाचे उल्हासे मन ।
सेना सेवक राक्षसजन । कैकेयीभेटी निघाला ॥३८॥
सहपरिवारें शरणागत । भरतमातेच्या भेटी उल्हासत ।
चालिला जैसा आनंदभरित । चकोर चंद्राचियें प्रीती ॥३९॥
ऐसियापरी बिभीषण । श्रीराममातेस भेटोन ।
करोनि साष्टांग नमन । आनंदें पूर्ण निवाला ॥४०॥
बिभीषण जोडल्या करी । कैकेयीस प्रणिपात करी ।
म्हणे स्वामिनी मज दीनावरी । येवोनि कृपा थोर केली ॥४१॥
आता चलावें मंदिरा । मज दीनावरी कृपा करा ।
ऐसी प्रार्थोनि नृपसुंदरा । परिवारेंसीं गृहा नेली ॥४२॥
दीर्घ उपचार करोनी । पूजिली ते भरतजननी ।
समस्ते भोजन सारोनी । विडे दिधले सकर्पूर ॥४३॥
कैकेयीस देवोनि दिव्यांबरे । मग प्रार्थिली मधुरोत्तरें ।
म्हणे माते कोण कार्यार्थ श्रीरघुवीरें । तुम्हा येथे पाठविले ॥४४॥
किन्निमित्त आगमन । ते मजप्रति कृपा करोन ।
विदित करावे स्वामिनीनें । शरणागत म्हणोनी ॥४५॥
ऐकोनि बिभीषणाची विनंती । कैकेयी बोले तयाप्रती ।
म्हणे समस्त लंका पहावयार्थी । येथे येणे राजेंद्रा ॥४६॥
मारोनि रावण कुंभकर्ण । लंक तुज दीधली दान ।
ऐसे ऐकोनि उत्कंठित मन । पहावया आले लंकेतें ॥४७॥
बिभीषणाचा, कैकेयीला संपूर्ण लंका दाखविण्याचा प्रधानांना आदेश :
कैकेयीची ऐकोनि वचनावळी । बिभीषण सांगे प्रधानांजवळी ।
भरतमातेतें लंका समूळी । दाखवा सकळ भवनादिक ॥४८॥
निकुंभळा सुवेळा पडलंका । त्रिकूटादिकरोनि दावा लंका ।
जेथे मारिले रावणादि सैनिकां । तींही स्थळें दावावीं ॥४९॥
समस्त प्रधानांची भवने । आणि निद्रा केली कुंभकर्णे ।
ती स्थळें आणि नाना उपवनें । अशोकवनें दाखवावीं ॥५०॥
बिभीषणआज्ञा वंदोनि शिरी । बैसे विमानी जिचा पुत्र लवणारी ।
लंकादि स्थळें पहावया ते अवसरी । निघती झाली ते काळी ॥५१॥
प्रधान म्हणती राजमाते । पडलंका पाहे जाण निरुते ।
प्रथम क्रौंचा हनुमंते । ये स्थळीं मारिली ॥५२॥
तेथोनि प्रवेशला लंकापुरीं । वळंघला गृहावरी ।
ते हे राजभवन निर्धारी । राघवारी वसे येथे ॥५३॥
हे रावणाचे होमस्थान । तेथे करीत होता शयन ।
हे सभास्थळ हे सिंहासन । विराजमान येथ राक्षसेंसीं ॥५४॥
ही प्रहस्तादि प्रधानांची मंदिरे । येथे नाना जोशी भट वेव्हारें ।
ही अग्निहोत्र्यांचीं होमस्थळें अपारे । हे हाटबाजार लंकेचे ॥५५॥
दाखविली शक्रजिताची पुरी । जेथे होम करित होता सुरारी ।
सौमित्रे साधोनि रणचत्वरीं । मारिला पशूसारिखा ॥५६॥
तेथोन पुढे चालिलें विमान । देखिले सुवेळेचें वन ।
कैकेयी म्हणे शिखर मनोरमण । याचे नाम काय असे ॥५७॥
प्रधान म्हणती राजमातें । वानरांसहित श्रीराम येथे ।
राहोनिया राक्षसांते । निर्दाळिलें समरांगणीं ॥५८॥
पैल रुद्रकूटपर्वत । येथोनि उडाला वायुसुत ।
लंका जाळोनि अशोकवनांत । पादप उपडोनि पै गेला ॥५९॥
ऐसी पाहोनी स्थळांतरें । मागुतीं प्रवेशला लंकापुर ।
तंव देखिले मंदिर । कुंभकर्णवीराचें ॥६०॥
प्रधान म्हणती राजबाळें । येथे शयन केले कुंभकर्णे विशाळें ।
हे तयाचे अंतःपुर स्त्रिया बाळें । ये भवनी वसती माते ॥६१॥
मग ते दशरथसुंदरी । प्रवेशली कुंभकर्णमंदरीं ।
तंव त्या कुंभकर्णाची अंतुरी । कैकेयीदर्शना पै आली ॥६२॥
भेटोनियां कैकेयीतें । अति सन्मानिले आदरे बहुते ।
भरतमात म्हणे वज्रसारेते । कैसा काळ प्रवर्तला ॥६३॥
विपरीत समयो पातला । तै जंबुकीं सिंह साधिला ।
पिपीलिकीं मिळोनि वेढिला । कद्रुतनयो ॥६४॥
तैसे झाले लंकेआंत । श्रीरामे वेधिला तुझा कांत ।
इतकियास मूळ शरणागत । राक्षसा अंत त्याचेनि ॥६५॥
श्रीरामा भेदोनि बिभीषण । मारविलें राक्षस दारुण ।
बंधुपुत्रासहित दशानन । समरांगणीं पाडिला ॥६६॥
आपण झाला राज्याधिकारी । निराक्षस केली पुरी ।
तंव बोलता ते अवसरी । अष्टशतवर्षी कुमार आला ॥६७॥
मूळकासुराची माहिती :
तयासी देखोनि कैकेयी । वज्रसारेसि पुसे पाही ।
हा कुमार कोणाचा ये समयी । अतिसुंदर दिसताहे ॥६८॥
रुपे ठाणें अति सुंदर गुण । पराक्रमें दिसे पंचानन ।
याची जननीजनक कोण । मजप्रती संपूर्ण सांगावे ॥६९॥
ऐकोनि कैकेयीच्या वचनासी । वज्रसारा सांगे सर्व वृत्तांतासी ।
सांगों आदरिलें परियेसीं । सावकाशीं अवधारिजे ॥७०॥
वज्रसारा म्हणे कैकेयीमाते । ऐके याचिया कथनातें ।
मूळकासुर नाम यातें । प्रसिद्ध सर्वांते विदित असे ॥७१॥
हा पितयाचे मूळी लागला । म्हणोनि याचा त्याग केला ।
परी बाहेर वाढिन्नला । येरा पोराचिये घरी ॥७२॥
मूळीं लागोनि पितयातें । ममरण झाले राघवहस्तें ।
क्षयो झाला सर्व राज्यातें । रावणादिकरोनि ॥७३॥
मूळनक्षत्रें शांति केली । राक्षससेना निर्दाळिली ।
रावणाची कुळवल्ली । आहाळली राघवाग्नीनें ॥७४॥
इतुकियासरी कारण हा मूळकासुर । हा जाणिजे माझा कुमर ।
यासि देखता तप्त शरीर । होत आहे साजणी ॥७५॥
वंशा झाली सर्व शांती । मूळ नक्षत्रासी ऐसी गती ।
हे होणार अनादि निश्चिती । भविष्य वाल्मीकी वदलासे ॥७६॥
मूळकासुराला तपश्चर्येला पाठविण्याचा कैकेयीचा उपदेश :
भरतमाता म्हणे कुंभकर्णप्रिये । यासी तपा पाठवावे सये ।
तप केलिया फळ प्राप्त होये । लंकेचिया राज्याचें ॥७७॥
प्रसन्न केलिया कैलासपती । लंकाराज्य ऐश्वर्यसंपत्ती ।
बिभीषणाची याप्रती । देईल निश्चिती साजणी ॥७८॥
नाही तरी संतोषोनि विश्वनाथ । सामर्थ्य देईल अद्भूत ।
आपुले बळे लंका प्राप्त । होईल निश्चित साजणी ॥७९॥
ऐसे संवादोनि कैकेयी । निघाली बिभीषणमंदिरा पाही ।
बिभीषणे भेटोनि ते समयी । अति आदरे पूजिली ॥८०॥
पूजोनिया श्रीराममाते । समर्पिलीं नाना वस्त्रे ।
कैकेयी म्हणे बिभीषणाते । अशोकवन पाहू पा ॥८१॥
बिभीषणासमवेत कैकेयी । प्रवेशली अशोकवनाचे ठायी ।
पाहती झाली ते समयी । नाना परींच्या वृक्षांते ॥८२॥
कैलासींच्या संपत्तीतें । रावणे मागोन आणिले येथे ।
इंद्र गांजोनि नंदनवनींच्या वृक्षांते । बळे लंकानाथे आणिले ॥८३॥
नाना परींच्या वापी पोखरणी । जेथील अमूप नाटोपे पाणी ।
देवालयें गोपूरें ऊर्ध्व गगनी । उंच ऐसी रत्नकळशीं ॥८४॥
बिभीषण म्हणे रावणारिमाते । या वृक्षातळीं रावणे सीतेते ।
भोवतीं राक्षसी ठेविल्या होत्या येथे । एक वस्त्रेसीं षण्मास ॥८५॥
भोंवत्या राक्षसी दारुण । सीतेसी करिती रक्षण ।
हनुमंत या वृक्षवरुन । जानकीस भेटला ॥८६॥
ऐसी विवंचना लंकानाथे । सांगितली कैकेयीतें ।
सुखावोनि अत्यंत चित्ते । परमानंद पावली ॥८७॥
कैकेयी म्हणे बिभीषणा । मी जाईन अयोध्याभवना ।
तुम्ही क्षेम कल्याण लंकाभवना । राज्य करावे स्वस्थानीं ॥८८॥
आज्ञा घेवोनि बिभीषणाची । अयोध्ये निघाली जननी भरताची ।
पुढील कथा सुरस रुची । वाढावी मनाची करुन सेवा ॥८९॥
एका जनार्दना शरण । अवलोकूनि लंकाभवन ।
कैकेयी प्रवेशली अयोध्ये जाण । श्रीरघुनंदन जेथे वसे ॥९०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
कैकेयीलंकावलोकनं अयोध्यागमनं नाम सप्ततितमोऽध्यायः ॥७०॥ ओंव्या ॥९०॥
