तुझा दास ऐसा म्हणती
2276.
तुझा दास ऐसा म्हणती लोकपाळ । म्हणऊनि सांभाळ करी माझा ॥१॥
अनाथाचा नाथ पतितपावन । हे आता जतन करी नाम ॥धृपद॥
माझे गुण दोष पाहाता न लगे अंत । ऐसे माझे चित्त मज ग्वाही ॥२॥
नेणे तुझी कैसी करावी हे सेवा । जाणसी तू देवा अंतरीचे ॥३॥
तुका म्हणे तू या कृपेचा सिंधु । तोडी भवबंधु माझा देवा ॥४॥
अर्थ :
देवा माझी जगात तुझा दास म्हणून कीर्ती झाली आहे म्हणूनच तुझी लोकलज्जा राखण्याकरता माझा सांभाळ कर. देवा जगामध्ये तुझी ख्याती आहे तुला ब्रीद आहे की तु अनाथांचा नाथ आहेस पतितपावन आहेस आता तुझी ब्रीदे तूच जतन कर. देवा तु जर माझे गुणदोष पाहू लागलास तर त्याला अंत नाही याविषयी माझे चित्तच मला ग्वाही देते आहे. देवा तुझी सेवा कशी करावी हे मला कळत नाही परंतु तु सर्वांच्या अंतकरणातील जाणतो हे मला माहित आहे त्यामुळे मी कसा आहे हे तुला वेगळ्या प्रकारे सांगण्याची गरजच नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तु कृपेचा समुद्रच आहेस तु कृपासिंधू आहेस त्यामुळे तु माझा भावबंधन तोडून टाक.
