तुझी संगती नाही कामा
153.
तुझी संगती नाही कामाची । मी सुंदरा कोवळ्या मनाची ।
मज दृष्टी होईल साची । मग तुझी घेइन चर्या ॥१॥
कसे वेड लाविले कान्हो गोवळिया ॥धु ॥माझा वंश आहे मोठ्याचा । तु तंव यातीहीन गौळ्याचा ।
ऐक्य जालीया नांवरुपाचा । ठावचि पुसलिया ॥२॥
तुझ्या अंगेची घुरट घाणी । तनु काय दिसती वोंगळवाणी ।
मुरली वाजविसी मंजुळवाणी । मनमोहन कान्हया ॥३॥
तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा । चोरी करुनी भरिसी पोटा ।
व्रजनारी सुंदरा चावटा । अडविसी अवगुणीया ॥४॥
सर्व सुखाची कृष्णसंगती । वेणुनादे गाई गोप वेधती ।
एका जनार्दनी हरिरुपी रमती । त्या व्रज सुंदरीया ॥५॥
