कथा त्रिवेणीसंगम देव
2246.
कथा त्रिवेणीसंगम देव भक्ती आणि नाम । तेथींचे उत्तम चरणरज वंदिता ॥१॥
जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर । गाती ऐकती सादर जे पवित्र हरीकथा ॥धृपद॥
तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया । पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा ॥२॥
अनुपम्य हा महिमा नाही द्यावया उपमा । तुका म्हणे ब्रह्मा नेणे वर्णु या सुखा ॥३॥
अर्थ :
कथेमध्ये देवभक्त आणि नाम असा त्रिवेणी संगम असतो. कथेमध्ये असणाऱ्या हरी भक्तांचे चरणरज वंदन करणे हे फारच उत्तम आहे. शुद्ध आणि पवित्र हरी कथा ऐकल्यानंतर अनेक महा पापाचे महा दोषाचे डोंगर जळून जातात आणि त्याने नर नारी हे सर्व शुद्ध होतात. पण जे पवित्र हरी कथा करतात आणि हरी कथा चालू असताना हरी चे गीत गातात हरीचे वर्णन ऐकतात आणि कथेमध्ये जे आदराने बसतात तेच खरे शुद्ध होतात. हरिकथा ज्या ठिकाणी चालू असते तेथे सर्व प्रकारचे तीर्थ पवित्र होण्यासाठी येतात. हरिकथा करणारे वैष्णवांच्या पायाच्या तळाखाली पर्वकाळ नेहमी असतात. तुकाराम महाराज म्हणतात हरी कथेचा महिमा अनुपम्य आहे आणि हरी कथेला जगामध्ये कोणतीही उपमा देता येत नाही. ब्रम्हृदेव देखील हरी कथेच्या सुखाचे वर्णन करू शकत नाही.
