वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

कृपेचे सागर हे साधुज

🙏 3. संत तुकाराम · ABH-080436 · अभंग क्र. ३१९२

3192.
कृपेचे सागर हे साधुजन । तिही कृपादान केले मज ॥१॥
बोबडे वाणीचा केला अंगीकार । तेणे माझा स्थिर केला जीव ॥धृपद॥
तेणे सुखे मन स्थिर झाले ठायी । संती दिला पायी ठाव मज ॥२॥
नाभी नाभी ऐसे बोलिलो वचन । ते माझे कल्याण सर्वस्व ही ॥३॥
तुका म्हणे झालो आनंदेनिर्भर । नाम निरंतर घोष करू ॥४॥

अर्थ :
हे साधूजण कृपेचे सागर आहेत त्यांनी मला कृपेचे दान दिले आहे. माझा अंगीकार करा असे मी बोबड्या शब्दात त्यांना विनंती केली तर त्यांनी माझा अंगीकार केला व माझा जीव स्थिर केला. संतांनी मला त्यांच्या पायाच्या ठिकाणी जागा दिली त्यामुळे माझे मन त्यांच्या पायाच्या ठिकाणी स्थिर झाले व त्यामुळे मला आत्मसुख प्राप्त झाले. संतांनी मला भिऊ नको भिऊ नको असे अभयवचन दिले त्यामुळे माझे सर्वस्व कल्याण झाले. तुकाराम महाराज म्हणतात, मी आता आनंदाने पूर्णपणे भरुन गेलो आहे त्यामुळे मी निरंतर हरीच्या नामाचा घोष करीन.

3193
भक्तीचे ते वर्म जयाचिये हाती । तया घरी शांती क्षमा दया । ।
अष्ट महासिध्दी वोळंगती द्वारी । न वजती दुरी दवडिता । ।
तेथे दुष्ट गुण न मिळे निःशेष । चैतन्याचा वास झाला माजी । ।
संतुष्ट हे चित्त सदा सर्वकाळ । तुटली हळहळ त्रिगुणांची । ।
तुका म्हणे त्याचा देव सर्व भार । चालवी कामार होऊनिया । ।

अर्थ :
तुकाराम महाराज म्हणतात ज्यांना भक्तीचे वर्म सापडले आहे, गवसले आहे त्यांच्या घरी दया, क्षमा, शांती अखंड वास करतात. तसेच त्यांच्या दारात अष्टमहासिद्धी रेंगाळत असतात आणि त्यांना कितीही हाकलून द्यायचा प्रयत्न केला तरी त्या काही काढता पाय घेत नाहीत.
ते म्हणतात अशा लोकांच्यात शोधूनही दुष्ट गुण सापडत नाही कारण त्यांच्यात चैतन्याचा वास झालेला असतो म्हणजेच त्यांची आत्मस्थितीशी गाठ पडलेली असते. तसेच त्यांच्या ठायी असलेला त्रिगुणांचा लय होऊन त्यांचे चित्त सदा सर्वकाळ संतुष्ट आणि समाधानी असते.
तुकोबाराय म्हणतात अशा भक्ताचा देहासकट सर्व भार नारायण आपल्या शिरी घेऊन एखाद्या दासासारखा त्यांची सेवा करतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग